मानसिक गुलामगिरीच्या खुणा

      मध्यंतरी एका भारतीय व्यक्तीचे भाषण ऐकत होतो. इंग्रजीमध्ये हे भाषण होते.‌ बोलत असताना त्यांनी 'जगरनॉट' हा शब्द वापरला. मला लक्षात आले की 'जगन्नाथाचा रथ' यावरून इंग्रजी भाषेत हा शब्द घेण्यात आला आहे. इंग्रजांना जगन्नाथ हा शब्द उच्चारायला अवघड जात असे त्यामुळे जगरनॉट असा शब्द त्यांनी तयार केला. परंतु भारतीयांना जगन्नाथ हा शब्द उच्चारणे सहज जमते. इंग्रज या देशातून गेले याला ७५ पेक्षा जास्त वर्षे झाली. तरीदेखील आपला शब्द आपल्या पद्धतीने न ऊच्चारता तो इंग्रजांच्या पद्धतीने उच्चारतो. 

   असेच उच्चारले जाणारे आणखी काही शब्द आहेत. उदाहरणार्थ योगा, आयुर्वेदा, रामा, गॅंजेस, इ. इंग्रजांनी  हे शब्द जरी भारतीय असले तरी त्यांच्या सोयीसाठी ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने उच्चारायला सुरुवात केली. आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना एका अर्थाने पर्याय नव्हता.  स्वातंत्र्यानंतर आपल्यावर इंग्रजांचे कोणतेही बंधन नाही त्यामुळे हे शब्द भारतीय पद्धतीने उच्चारणे सुरू व्हायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. याचे कारण काय तर 'इंग्रज गेले पण इंग्रजीपणा इथे सोडून गेले'. यालाच मानसिक गुलामगिरी असे म्हणता येईल. 

   या पद्धतीच्या मानसिक गुलामगिरीच्या अजून काही खुणा सांगता येतील. उदाहरणार्थ वेशभूषा. प्रसिद्ध मराठी साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या 'असामी असामी' या पुस्तकात उल्लेख येतो की मिळण्याच्या सुमारास पुस्तकाचा नायक ज्या कंपनीत ( हा शब्द नाईलाजाने वापरला आहे.😔) नोकरी करत असतो त्या कंपनीची मालकी इंग्रजी व्यक्तीकडून भारतीय व्यक्तीकडे येते. आतापर्यंत त्या कंपनीत धोतर, सदरा, कोट अशा वेशात कंपनीत जाणारे लोक हळूहळू पॅन्ट शर्ट घालून कंपनीत जाऊ लागतात. इंग्रजांच्या राज्यात टिकून राहिलेली भारतीय वेशभूषा इंग्रज गेल्यावर मात्र बदलून जाते.  वापरण्याची सुलभता लक्षात घेऊन शर्ट पँट हा पोशाख जास्त लोकप्रिय झाला आहे. याबाबत स्वामी विवेकानंद यांची एक आठवण आहे. एकदा स्वामीजींचे त्यांच्या मित्राशी याबाबत बोलणे चालू होते. त्यावेळी मित्र म्हणाला , "राज्यकर्त्यांचा आग्रह म्हणून तो पोशाख घालावा लागतो". त्यावेळी स्वामीजी म्हणाले, " घरी असताना तर तू आपला पोशाख घालू शकतोस ना." स्वामीजींची आठवण लक्षात घेऊन आपण आपल्या सणावारांच्या, समारंभाच्या वेळी आपण आवर्जून भारतीय पोशाख घालू शकतो.

    असेच शिक्षणाच्या क्षेत्रात देखील दिसून येते. इंग्रजांचे राज्य असता शिक्षणाचे प्रमाण कमी होते परंतु त्यापैकी शालेय शिक्षण बहुसंख्येने मातृभाषेतून होत असे. मात्र गेल्या सुमारे पंचवीस तीस वर्षात हे चित्र झपाट्याने बदलले आहे. आता शालेय शिक्षण इंग्रजी भाषेतून घेणाऱ्या मुला मुलींची संख्या जास्त आहे. मराठी शाळा मोठ्या बंद पडत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी 'माझा मराठाचि बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके' या शब्दांत आत्मविश्वास व्यक्त केला.  तो आत्मविश्वास मराठी माणूस हरवून बसला की काय असा प्रश्न पडतो. अशीच परिस्थिती बहुतेक सर्व भारतीय भाषांची झाली आहे. 

   काही चालीरीतींबाबतदेखील विचार करावा लागेल. उदाहरणार्थ वाढदिवस समारंभ. परंपरेने वाढदिवसाच्या निमित्ताने औक्षण करण्याची रीत आहे. परंतु आता सर्वत्र वाढदिवसाला केक कापण्याची पद्धत रुढ झाली आहे. काही ठिकाणी औक्षण, केक अशा दोन्ही गोष्टी दिसतात. पण केकचा वापर वाढताना दिसतो. यातून काय लक्षात येते.

   या सर्व मानसिक गुलामगिरीच्या खुणा आहेत असे वाटते. जोपर्यंत समाजाचे आंतरिक स्वत्व पूर्णपणे जागृत होऊन प्रकट होत नाही तोपर्यंत या खुणा बदलणार नाहीत. जोपर्यंत असे स्वत्व प्रकट होत नाही तोपर्यंत आपला प्रिय भारत देश त्याचे नियतीने दिलेले कर्तव्य पार पाडू शकणार नाही. स्वतः जागृत होऊन समर्थ होऊन सर्व जगाला मार्गदर्शन करणे हीच भारताची नियती आहे असे भाकीत स्वामी विवेकानंद, योगी अरविंद या महापुरुषांनी स्पष्टपणे सांगितले आहे. यादृष्टीने काही सफल प्रयत्न झाले आहेत. परंतु तेवढे पुरेसे नाहीत हे लक्षात घेऊन महापुरुषांचे हे भाकीत लवकरात लवकर प्रत्यक्षात यावे यासाठी आपण सतत प्रयत्न करत रहायला हवे.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख