हुतात्मा हेमू कालाणी

        ही गोष्ट आहे देशासाठी मरण पत्करणाऱ्या एका युवकाची! आता पाकिस्तानात असणाऱ्या सिंध प्रांतामध्ये सक्कर नावाचे एक गाव आहे. त्या गावात एक छोटा मुलगा तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत गावभर फिरत होता. 'राष्ट्रीय झेंडा फडकतो आहे. शत्रू भयाने थरथर कापत आहे.'अशा अर्थाचे ते गीत होते. एके दिवशी हा मुलगा आपल्या घरी गळ्याभोवती फास लावून बघत होता. तेवढ्यात त्याच्या आईचे तिकडे लक्ष गेले आणि तिने विचारले, " बाळा हे काय करतो आहेस?" त्यावेळी हसतच तो मुलगा म्हणाला , " आई मी काही एवढ्यात मरणार नाही. परंतु हुतात्मा भगतसिंग जेव्हा हसत हसत हसावर गेले त्यावेळी त्यांना काय वाटले असेल हे समजून घेण्यासाठी मी हे करतो आहे." आईला जरा हायसे वाटले. पण तेवढ्यात तो मुलगा पुढे म्हणाला, " आई पण एके दिवशी मलादेखील भगतसिंगांसारखे देशासाठी मरण पत्करायचे आहे". बाळाचे हे बोलणे ऐकून आईच्या हृदयात धस्स झाले. कोण होता हा मुलगा? 

( चित्रकार  श्री.निलेश जाधव  सौजन्य मन:शक्ती बालकुमार )

'सिंध प्रांताचे भगतसिंग' म्हणून ओळखले गेलेले हे होते हुतात्मा हेमू कालाणी. भगतसिंग हे अगदी लहान वयापासूनच हेमू यांचे आदर्श होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म भगतसिंगांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी म्हणजे २३ मार्च १९२३ या दिवशी झाला. माता जेठीबाई आणि पिता पेसुमल यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. हेमंतदास असे त्यांचे नाव ठेवण्यात आले. परंतु प्रेमाने त्यांना हेमू असे म्हटले जात असे. बालपणापासूनच देशभक्ती या मुलाच्या मनामध्ये वास करत होती. त्यामुळे फेऱ्यांमध्ये भाग घेऊ तिरंगा झेंडा घेऊन तो प्रसंगी इंग्रजांच्या छावणीमध्ये देखील जात असे. 

एके दिवशी इंग्रजांनी त्यांचे वडील पेरूमल यांना अटक केली. आपल्या वडिलांना इंग्रजांनी विनाकारण पकडले आहे हे कळल्यानंतर लहानगा हेमू अतिशय संतापला. घरामध्ये असलेले पिस्तूल घेऊन तो आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीकडे निघाला. परंतु त्यावेळी त्याच्या गुरुजींनी त्याला समजावले की , " अशी कामे तडकाफडकी करता येत नाहीत. त्यासाठी योजना आखावी लागते. संघटना उभी करावी लागते. हे केल्याशिवाय इंग्रजांचा पराभव करणे शक्य नाही." आपल्या गुरुजींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर हेमूच्या मनात विचारचक्र सुरू झाले. त्याचे काका गंगाराम कालाणी आहे हे स्वराज्य सेना या क्रांतिकारक संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेत होते. याच स्वराज्य सेनेच्या माध्यमातून हेमू स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेऊ लागला. अत्याचारी इंग्रजांच्या वाहनांना आग लावणे, त्यांच्यावरती छापा मारणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो चळवळ करू लागला. केशवाणी, हरी,आशू, प्रकाश, टीकम, नंद हे सगळे खास मित्र होते. याच मित्रांच्या मदतीने हेमूने इंग्रजांना भंडावून सोडले होते.

याच दरम्यान महात्मा गांधीजींचा कराचीमध्ये दौरा होता. हेमू आणि केशवाणी या दोघांवरही गांधीजींचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे या दोघांनी गांधीजींना भेटायचे ठरवले गांधीजींच्या सभेमध्ये व्यासपीठावरती बसलेल्या सर्वांना वारा घालण्याचे काम आपले रंगमल गुरूजी करत आहेत हे केशवाणीने बघितले. तो चतुराईने गुरुजींच्या जवळ गेला आणि म्हणाला, " गुरुजी, तुम्ही वारा घालून दमला असाल तर वारा घालण्याचे काम मी करू का?" गुरुजींनी कौतुकाने वारा घालण्याचे काम केशवाणीला दिले. तो आनंदाने वारा घालू लागला. सभा संपल्यानंतर केशवाणी चपळाईने गांधीजींच्या जवळ गेला आणि संवाद साधू लागला. गांधीजी म्हणाले, " तुमच्यासारख्या युवकांनी नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करण्यासाठी खटपट केली पाहिजे." गांधीजींचा हा संदेश जेव्हा केशवाणीने आपल्या सर्व मित्रांना सांगितला त्यावेळी सर्वजण उत्साहात आले.

१९४२ मध्ये इंग्रजांच्या विरोधात 'भारत छोडो' हे आंदोलन सुरू करण्यात आले. आपल्या क्रांतिकार्यातील सहभागामुळे हे यापूर्वीच प्रसिद्ध झाला होता. १८ वर्षांचा हेमू आपल्या सर्व सहकाऱ्यांसह 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झाला. हेमूच्या प्रयत्नांनी सिंध प्रांतात आंदोलनाचा वणवा पेटला. लोक ठिकठिकाणी इंग्रजविरोधी कारवाया करू लागले. त्याच्या प्रयत्नाने विदेशी कापडांच्या होळ्या पेटू लागल्या. इंग्रजांच्यामध्येदेखील हेमूच्या नावाचा दरारा निर्माण झाला. इंग्रजांच्या अत्याचारांपासून आपल्या देशबांधवांना वाचवण्यासाठी हेमू सर्वत्र संचार करू लागला. जेव्हा हेमू 'इनक्लाब झिंदाबाद' अशा घोषणा देत असे तेव्हा लोकांमध्ये इंग्रजांना प्रतिकार करण्याची चेतना निर्माण होत असे.

एकदा हेमूच्या मित्रांना इंग्रजांनी पकडले. तेव्हा आपल्या मित्रांना सोडवण्यासाठी हेमूने विराट मोर्चाचे आयोजन केले. माणसांचा जणू समुद्रच उसळला. 'इंग्रज सरकार मुर्दाबाद ' अशा घोषणा लोक देऊ लागले. खवळलेला हा जनसमुदाय पाहून इंग्रजांना तर घामच फुटला. त्यांनी मोर्चावर गोळीबार केला. अनेक लोक जखमी झाले, अनेकजण मृत्युमुखी पडले. हेमू तिथून कसेबसे निसटण्यात यशस्वी झाला.

इंग्रजांच्या निर्दयी अत्याचारामुळे हेमू अतिशय संतापला. सभा, मोर्चे यासारख्या गोष्टींचा इंग्रजांवर काही परिणाम होणार नाही असा निष्कर्ष त्याने काढला. लहानपणापासूनच भगतसिंग हे त्याचा आदर्श होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इंग्रजांना धडकी भरली पाहिजे अशी कृती करण्याचे त्याने ठरवले. आता स्वराज्य सेनेचे नेतृत्व त्याच्याकडे आले होते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एके दिवशी अचानक छापा मारून शहराच्या मुख्य अधिकाऱ्याच्या कचेरीवर फडकणारा इंग्रजांचा झेंडा काढून टाकून तेथे तिरंगा झेंडा लावून हे सर्वजण तेथून निसटले.

हेमूच्या या कृत्याने इंग्रजांच्यामध्ये मोठी खळबळ माजली. 'भारत छोडो' आंदोलनाच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर इंग्रजांनी धरपकड केली. त्यामुळे हे आंदोलन दिशाहीन झाले होते. लोकांचा संताप विविध मार्गांनी बाहेर पडत होता. हेमूने सिंध प्रांतामध्ये क्रांतिकार्याची मशाल पेटवण्याचा निर्णय घेतला. तुरुंगावरती बॉम्बहल्ला करून आपल्या मित्रांना त्याने सोडवले. आता इंग्रजांच्या ठाण्यावर बॉम्बहल्ला करण्याचे ठरवले. यासाठी लागणारे बॉम्ब मंगारामकाकांनी उपलब्ध करून दिले. हा हल्लादेखील यशस्वी ठरला. असाच हल्ला अजून एका पोलीस ठाण्यावर करण्यात आला. आता न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याचे ठरले. शिताफीने न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आला. परंतु शेवटच्या क्षणी एका लिपिकाचे लक्ष गेले. हा बॉम्ब पोलिसांनी निकामी केला. यामुळे हेमू आणि सहकारी थोडे निराश झाले. परंतु अजून काही धाडसी प्रयत्न करायचे त्यांनी ठरवले.

मंगारामकाकांनी एक महत्त्वाची माहिती आणली. बलुचिस्तानमध्ये चाललेली स्वातंत्र्याची चळवळ चिरडून टाकण्यासाठी सिंध प्रांतातील रोहिडी या स्थानकावरून दारूगोळा , सैनिकी तुकड्या यांनी भरलेली एक आगगाडी क्वेटा स्थानकाकडे जाणार होती. २३ ऑक्टोबर १९४२ च्या रात्री ही रेल्वेगाडी सक्कर स्थानकात येणार होती. ही आगगाडी उडवून देण्याचा निश्चय हेमू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला. २२ ऑक्टोबरला चित्रपटगृहात भेटून त्यांनी योजना नक्की केली. परंतु त्यांच्याकडे आवश्यक अशी हत्यारे नव्हती. हत्यारांच्या अभावी ही योजना पुढेदेखील ढकलता येत नव्हती. शेवटी हातोडा आणि पान्हा घेऊन ही मंडळी रात्रीच्या अंधारात रेल्वे रुळाजवळ पोहोचली.

 त्यांनी रूळ उखडून टाकण्याची खटपट सुरू केली. परंतु रूळाचे नट एवढे घट्ट बसलेले होते की ते सहज निघू शकत नव्हते. शेवटी हेमूने हातोड्याने प्रहार करून ते नट तोडण्याची खटपट सुरू केली. रात्रीच्या शांततेत हा आवाज जवळच्या बिस्किट कारखान्याच्या रखवालदारापर्यंत गेला. त्याने पोलिसांना बोलावले. पोलीसांची तुकडी लवकरच तेथे दाखल झाली. पोलीस येत आहेत हे पाहून हेमूने आपल्या चार मित्रांना तिथून निघून जाण्यास सांगितले आणि स्वतः मात्र तिथेच उभा राहिला. अंधाराचा फायदा घेऊन हे चार मित्र सहजच निसटून गेले. पोलिसांनी हेमूला अटक केली. हेमूला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावरती निर्दयपणे अत्याचार होऊ लागले. आपल्या साथीदारांचे नाव त्याने सांगावे असा पोलिसांनी दबाव आणायला सुरुवात केली. हेमू सांगू लागला, " माझे दोनच साथीदार होते एक म्हणजे हातोडा आणि दुसरा म्हणजे पान्हा." शारीरिक अत्याचाराला हेमू बधत नाही हे पाहून पोलिसांनी प्रलोभन दाखवायला सुरुवात केली. " तू साथीदारांची नावे सांग. तुला या खटल्यातून सोडून देतो "असे ते म्हणू लागले परंतु हेमू त्यालाही बळी पडला नाही.

शेवटी मार्शल ला कोर्टामध्ये खटला उभा राहिला. हेमूच्या वकिलांनी साथीदारांची नावे सांगून सुटका करून घ्यावी असा सल्ला दिला. परंतु हेमू हा भगतसिंगांचा अनुयायी होता. तो अभिमानाने म्हणाला, " मी जे केले त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. मी कोणत्याही साथीदाराचे नाव सांगणार नाही." खटला पूर्ण होऊन हेमूला आजीवन कारावासाठी शिक्षा झाली. या शिक्षेला मान्यता घेण्यासाठी सिंध मधील हैदराबाद येथील लष्करी तुकडीचा प्रमुख रिचर्डसन याच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. हेमू हा ब्रिटिश सत्तेचा मोठा विरोधक आहे असे म्हणून रिचर्डसनने आजीवन करावासाऐवजी फाशीची शिक्षा नक्की केली.

हेमूच्या शिक्षेची बातमी सिंध प्रांतात वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक अतिशय दु:खी झाले. काही प्रतिष्ठितांनी व्हाइसरॉयकडे दयेचा अर्ज केला. साथीदारांची नाते सांगावीत या अटीवर दया दाखवली जाईल असे कळवले गेले. हेमूने साथीदारांची नावे सांगायचे पुन्हा एकदा नाकारले. काही वकिलांनी ' माझी चूक झाली. मला क्षमा करावी.' असा अर्ज तयार केला. पण त्यावर स्वाक्षरी करायचे हेमूने नाकारले. आता फाशी अटळ होती.

फाशीच्या आदल्या दिवशी हेमूचा भाऊ टेकचंद हेमूला भेटायला आला. त्याला हेमू म्हणाला, " दादा मला आशीर्वाद दे की मी पुनर्जन्म घेऊन पुढच्या जन्मी परत स्वातंत्र्यासाठी चळवळ करू शकेन." २१ जानेवारी १९४३ यादिवशी हेमू भारतमातेचा जयघोष करत धीरोदात्तपणे फासावर चढला. हेमूचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी दुष्ट इंग्रजांनी मातापित्यांकडून एक हजार रुपये आणि अंत्यसंस्काराच्या वेळी कोणतीही गडबड झाल्यास त्याची जबाबदारी आमची राहील असे हमीपत्र लिहून घेतले. हेमूच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला माणसांचा सागर उसळला. ' हेमू कालाणी अमर रहे' अशा जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु भारताची दुर्दैवी फाळणीदेखील झाली. सिंध प्रांत पाकिस्तानात सामील करण्यात आला. तेथील असुरक्षित वातावरण लक्षात घेऊन हेमूचे आई-वडील भारतात आले. ते दिल्लीत राहू लागले. नंतर एकदा भगतसिंग यांच्या मातेची हेमूच्या मातेशी गाठ पडली. त्यावेळी भगतसिंग यांच्या आई मोठ्या मनाने म्हणाल्या, "तुमचा मुलगा माझ्या मुलापेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्याने माझ्या मुलापेक्षा लहान वयातच देशासाठी मरण पत्करले."

 या दोन्ही हुतात्म्यांना, त्यांच्या परिवाराला आपण विनम्रतापूर्वक अभिवादन करूया आणि त्यांच्या स्मृती कायम जतन करूया. या स्मृती आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील.

सुधीर गाडे, पुणे ९८६०३६६४३३


( पूर्व प्रसिद्धी मन:शक्ती बालकुमार जून २०२३)

Comments

  1. धन्यवाद सर
    मला तरी आज पर्यंत हुतात्मा आहे हेमु कलाणी यांच्या बद्दल अजिबात माहिती नव्हती. माझ्याप्रमाणेच अनेक जणांना ते अपरिचितच असणार.अशा असंख्य मराठी बांधवांना आपण इतिहासातील या शूर वीरा शबद्दल माहिती करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद

    ReplyDelete
  2. नवीन प्रेरणा दायक माहिती मिळाली

    ReplyDelete
  3. Unlocking the history by bringing real heroes in limelight

    ReplyDelete
  4. नवीन माहिती मिळाली सर.
    Thanks 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख