घड्याळाची टिकटिक
मध्यंतरी एकदा रस्त्याने जात होतो. निघायला तसा थोडासा उशीर झाला होता. आता किती वाजले असतील याचा अंदाज घ्यायचा म्हणून मनगटाकडे बघायला लागलो. पण लक्षात आलं की आपण रेनकोट घातलाय. त्यामुळे घड्याळ दिसणार नाही. आजूबाजूला नजर गेली पण जवळपास कुणाच्या हातावर घड्याळ दिसलं नाही. नंतर जिथे पोहोचायचं तिथं पुरेसा वेळेवर पोहोचलो.
( एका समारंभाच्या निमित्ताने आप्तांनी भेट दिलेली घड्याळे 🙂)
यानिमित्ताने मनात विचार चक्र सुरू झाले आमचे वडील कै. बापू यांना घड्याळाचे फार वेड होते. वेळेचेही तसे ते खूप पक्के होते. साखरवाडीसारख्या छोट्या गावातही वेळ सांगताना १० वाजून २४ मिनिटे अशा प्रकारे ते वेळ सांगायचे. एक चावीचे घड्याळ भिंतीवर त्यांनी लावलं होतं. अनेक वर्ष ते घड्याळ आमच्या दुकानाच्या भिंतीवर होते. दररोज ठराविक वेळेला त्याला चावी देणे, ते आपल्या जागेपासून हललं नाही ना याची खात्री करणे असा त्यांचा नेहमीचा क्रम होता. घरातून बाहेर पडताना हातावरही ते घड्याळ बांधल्याशिवाय कधीच बाहेर पडत नसत. मनगटावर घड्याळाची डायल न बांधता ते विरुद्ध बाजूला बांधायचे. जाता येता बोलता सारखं त्यांचं घड्याळाकडे लक्ष असायचं. त्यांच्या मृत्यूपूर्वी जवळपास त्यांना तीन महिने आधी त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि पुण्यातील रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यावेळी त्यांना बोलता येत नव्हतं. बहुधा समजतही नव्हतं. पण सतत ते आपल्या हातावर घड्याळ बांधले आहे आणि त्यात किती वाजले आहेत अशा प्रकारे बघत होते.
वडिलांचे हे घड्याळाचे प्रेम माझ्यातही उतरले आहे. माझ्या आठवणीनुसार दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला पहिल्यांदा घड्याळ मिळाले. ते बरीच वर्ष मी वापरले नंतर १९९७ मध्ये मी संघचा प्रचारक म्हणून काम करायचे ठरवले. त्यावेळी आमच्या नगराचे कार्यवाह असलेल्या कै. रवींद्र महाबळेश्वरकर यांनी मला एक घड्याळ भेट दिले. छ. संभाजीनगरला गेल्यानंतर ते घड्याळ एक-दोन महिन्यातच गहाळ झालं.
घड्याळावरच हे प्रेम आमच्या शंतनूमध्येही उतरलं आहे. लहानपणापासून त्याला घड्याळाची आवड आहे. खेळातल्या घड्याळापासून सुरुवात करून आतापर्यंत जवळपास सात आठ घड्याळे त्याला आम्ही घेतली, काही नातेवाईकांनी दिली. आता त्याच्याकडे स्मार्ट वॉच आहे.
साखरवाडीमध्ये वेळ कळण्याची अजून एक सोय होती. ती म्हणजे साखर कारख्यानाचा वाजणारा भोंगा. दिवसभरात हा भोंगा अनेकवेळा वाजायचा आणि वेळ कळायची. रात्री शांतता असे. या शांततेत कारखान्यातील रक्षकांनी वाजवलेले टोल आमच्या घरात ऐकू यायचे आणि वेळ समजायची. त्याकाळी आमच्या काकांच्या घरात मंगसुळीकर कुटुंब भाड्याने राहत असे. त्या काकू जवळपास दिवसभर रेडिओ ऐकत असत. त्यांचे एक वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे, ' रेडिओवर पुन्हा पुन्हा वेळ सांगितली जाते त्यामुळे मला वेगळं घड्याळ बघावं लागत नाही.'
घड्याळ लावण्याच्या लोकांच्या आपापल्या पद्धती असतात.काही जण घड्याळ अगदी प्रमाणवेळेप्रमाणे लावतात. माझ्या लहानपणी ही प्रमाण वेळ आकाशवाणीच्या घोषणांवरून ठरवली जात असे. आता जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन असल्याने त्याच्या आधारे ही वेळ लावली जाते. काहीजण घड्याळ पाच मिनिटे पुढे लावतात, तर काहीजण पंधरा-वीस मिनिटेदेखील पुढे लावतात. त्याप्रमाणे काम वेळेवर पूर्ण करायला त्यांना मदत होते म्हणून ते असे लावतात.
काही वेळा घड्याळ वेगवेगळ्या कारणाने मागे किंवा पुढे पडते. हे जर लक्षात आले नाही तर घोटाळा होतो. काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमात असताना माझ्याकडील घड्याळ अचानक खूप मागे पडले. कार्यक्रमाही तसा लांबला. कार्यक्रम संपल्यानंतर जिथे जायचे होते त्यांचा फोन आल्यानंतर लक्षात आलं की घड्याळ खूपच मागं पडलं आहे. माझंदेखील साधारणपणे सारखं घड्याळाकडे लक्ष जातं. कधी एखाद्यावेळी घड्याळ नसेल तर आजूबाजूच्या लोकांच्या हातावरील घड्याळाकडे लक्ष जाते. पण मग अशावेळी प्रश्न पडतो की त्या व्यक्तीची घड्याळ लावण्याची पद्धत काय ? ती व्यक्ती प्रमाणवेळेनुसार घड्याळ लावते की थोडे पुढे लावते हे लक्षात येत नाही. त्यामुळे थोडा अंदाज करावा लागतो.
अनेक वर्षांपूर्वी एका बस स्थानकावर लिहिलेले वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे ते म्हणजे, ' एसटीच्या गाड्या एसटीच्या घड्याळाप्रमाणे धावतात '. आता एसटीचे घड्याळ आणि त्याच्या गाड्या एक वेगळाच विषय होईल. असो.
काही जणांना मात्र घड्याळ ही अनावश्यक गोष्ट वाटते. 'हम घडी के गुलाम नहीं हैं ' असं ते म्हणतात. परंतु ज्यांना घड्याळ आवश्यक गोष्ट वाटते त्यांना तंत्रज्ञानामुळे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. एकदा सकाळी फिरायला गेलो असतांना समोरच्या एका माणसाचे वाक्य ऐकू आले की, ' जेव्हापासून पेजर आले तेव्हापासून मी घड्याळ घालायचे बंद केले'. सुरुवातीला पेजर, नंतर मोबाईल , स्मार्टफोन , स्मार्टवॉच असे वेगवेगळे पर्याय आता उपलब्ध झाले आहेत.
घड्याळावर कविता, गाणी लिहिली गेली आहेत. प्र.के.अत्रे यांनी केशवकुमार या नावाने ' आजीचे घड्याळ' ही कविता लिहिली. त्यांनी लिहिले.
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
असे चमत्कारिक घड्याळ आणि त्यातली वेळ हा आपल्या आयुष्याचा अनिवार्य भाग आहे.
सुधीर गाडे, पुणे
सुधीर गाडे, पुणे
Sir when I got my first salary I remember that I have gifted watch to my father. Nicely written and made me nostalgic
ReplyDeleteहोय मॅडम. असे प्रसंग कायम लक्षात राहतात.
Deleteखूपच छान
ReplyDeleteमनोवेथक लिखाण,ई.सन २००० पर्यंत भारतातील खेडे आणि निमशहरी भागातील सर्वांचे जीवन जवळजवळ सारखेच होते. आपल्या या आठवणीने आमच्या सुद्धा लहानपणीच्या आठवणी जागरूक झाल्या धन्यवाद सर.
ReplyDelete