स्वतःचे मरण ठरवणारा महापुरुष

      नुकताच एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या भाषणाचा व्हिडिओ ऐकला त्यात ते म्हणाले की लाखांमध्ये एखाद्याला शांतपणे मरण येते. त्यावेळी मनात विचार आला की असे मरण कोणाला बरे आले होते बरे? ते अचानकपणे आले की ठरवून आले? विचार करायला लागल्यानंतर लक्षात आले की स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण याबाबत देता येईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींनी ठरवून मरण स्वीकारले. याबाबत त्यांचे गुरुबंधू , शिष्य यांनी आठवणी लिहून ठेवल्या आहेत त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते.



( छायाचित्र सौजन्य https://vedantaprov.org/swami-vivekananda/ )

       स्वामीजींच्या एक पाश्चात्य शिष्या होत्या. त्यांचे नाव जोसेफाईन मॅकलाऊड. स्वामीजींच्या मृत्यूच्या आधी काही महिने त्या म्हणाल्या , " स्वामीजी मी आपल्याला दर महिन्याच्या खर्चासाठी ५० डॉलर्स देईन. आता मी तुम्हाला एकदम चार महिन्यांसाठी दोनशे डॉलर्स देते. " स्वामीजी म्हणाले की , "एवढे सगळे खर्च होण्याची वेळ येणार नाही." आणि तसेच झाले तीनच महिन्यांनी स्वामीजींचे निधन झाले. 

      स्वामीजी अनेक वेळा म्हणत असत, " मी चाळीशी पूर्ण करणार नाही. स्वामीजी ३९ वर्षे सहा महिने आणि २० दिवस जगले.

   ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌मृत्युपूर्वी काही दिवस स्वामीजींकडे त्यांचा लहानपणचा एक मित्र आला. स्वामीजींकडे त्याने २ रुपयांची मदत मागितली. स्वामीजींनी बोधानंदांना सांगितले की त्याला दोन रुपये दे.‌ तेव्हा बोधानंद म्हणाले, " आता फक्त दोन रुपये आणि काही पैसेच शिल्लक आहेत. " स्वामीजी उत्तरले, " तुला वाटते का मी याची फिकीर करतो आहे." स्वामीजींनी त्या मित्राला दोन रुपये आणि काही पैसे द्यायला लावले.

     स्वामीजींच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाबाबत त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस अनेकवेळा त्यांच्या अन्य शिष्यांबरोबर चर्चा करत असत. रामकृष्ण एके दिवशी म्हणाले, " जेव्हा नरेनला तो कोण आहे हे समजेल तेव्हा तो देहाचा त्याग करेल." हा संवाद अनेक वर्षांपूर्वी झाला होता. स्वामीजींच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या एका शिष्याने बोलताना सहजपणे विचारले, " स्वामीजी तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजले आहे का?" " होय," मंदपणे स्मितहास्य करत स्वामीजी म्हणाले. त्यांच्या गुरूबंधूंना पूर्वीचा संवाद आठवला आणि मनात शंकेची पाल चुकचुकली.

    मृत्युपूर्वी एक आठवडा स्वामीजींनी स्वामी शुद्धानंदांना बंगाली पंचांग आणण्यास सांगितले. ते बराच वेळ त्या पंचांगाचा अभ्यास करीत होते नंतर त्यांचे समाधान झाले असे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ते पंचाग परत दिले.

     २ जुलै १९०२ रोजी स्वामीजींच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांना भेटायला आल्या. स्वामीजींनी त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांना प्रेमाने जेवू घातले. जेवण झाल्यानंतर स्वामीजींनी भगिनी निवेदितांच्या हातावर पाणी घातले. त्यांचे हात स्वतः पुसून कोरडे केले. स्वामीजींनी यापूर्वी असे कधीच केले नव्हते. तेव्हा भगिनी निवेदिता संकोचल्या.त्यांनी स्वामीजींना विचारले, "स्वामीजी आपण काय करता आहात?" स्वामीजी म्हणाले, " येशू ख्रिस्ताने नाही का त्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते." निवेदितांच्या मनामध्ये येऊन गेले , " ते त्याच्या आयुष्यातील अखेरचे जेवण होते." पण त्या काहीच बोलल्या नाहीत.दोनच दिवसानंतर ज्यावेळी स्वामीजींच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा भगिनी निवेदिता यांना या प्रसंगाची संगती लागली.  

       हे सर्व प्रसंग लक्षात घेतले की स्वामीजींनी स्वतःच्या मृत्यूचा दिवस ठरवला होता हे समजते. स्वामीजींचा मृत्यू ४ जुलै १९०२ रोजी झाला. त्यांच्या सोबत असणारे त्यांचे गुरूबंधू, शिष्य यांनी त्या दिवसाचे तपशीलवार वर्णन करून ठेवले आहे. स्वामीजी त्या दिवशी अतिशय आनंदात होते. सर्व दिवस त्यांनी नियमित कामात घालवला. पूजेत सहभाग घेतला, ध्यान धारणा केली, शिष्यांना शिकवले, कार्यमग्नतेत पूर्ण दिवस घालवला. रात्री ९ च्या सुमाराला स्वतःच्या बिछान्यावर देहत्याग केला. तो करताना आपले जीवितकार्य पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना होते. या महापुरुषाचे विचार आणि कृती सदैव प्रेरणादायक आहे.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. नमस्कार,
    खूप छान, माझ्या वाचनाय हे आले होते. शेवटच्या दिवशी रात्री झोपताना सुद्धा स्वामींजींच्या चेहऱ्यावर समाधानी भाव, आनंद व इप्सित कार्याचा आनंद होता.
    सुधीरजी परत एकदा छान लेखन केले आहे.

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिले आहे , आत्मसाक्षात्कार झाला की देहाची आसक्ती संपते, आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू होते निर्वाणीचा वाटचाल

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहे . सर तुमचे ब्लॉग कायमच प्रेरणादायक आणि वाचनीय असतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख