टोपणनावे

      मी शाळेत शिकत असताना वेगवेगळ्या लेखक , कवी यांची टोपणनावे माहिती झाली. शाळेत माहिती होण्यापूर्वीच टोपणनाव ही संकल्पना माहिती होती. कारण नातेवाईक, मित्र यांच्यात काही जणांना टोपणनावाने ओळखले जात असे. पण या दुसऱ्या नावाला टोपणनाव म्हणतात हे मात्र शाळेत गेल्यावर कळाले.


      शाळा सोडून आता इतकी वर्षे होऊन गेली पण अजूनही काही जणांची नावे आणि टोपणनावे माझ्या लक्षात आहेत. राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज आचार्य अत्रे म्हणजे केशवकुमार, वि.वा.शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज . तर काही जणांची फक्त टोपणनावेच लक्षात आहेत ती म्हणजे केशवसुत, अनिल, बी यांची.

      टोपणनावे का पडली असावीत. तर आपल्या मुलामुलींना आपणच ठेवलेल्या नावांऐवजी लाडीक किंवा आणखी सोप्या नावाने बोलावता यावे म्हणून. बंडू, पिंटू, विकी, सोन्या,‌मोन्या, बेबी, पिंकी यासारखी अनेक नावे या कारणांमुळे ठेवली जातात.‌ तर लेखक कवी यांना स्वतःच्या कायदेशीर नावाने लिखाण करणे अडचणीचे वाटते किंवा काही कारणाने टोपणनाव सोयीस्कर वाटते. काही पुरूष लेखक, कवी यांना स्वतःच्या नावाने केलेले लिखाण अनेकदा साभार परत आल्याचे अनुभव आलेले आहेत. अशावेळी टोपणनावाचा वापर केल्यावर त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाल्याचे अनुभव आहेत. अशा टोपणनावांमध्ये बहुधा महिलांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याचे अनुभव जास्त आहेत. अशा प्रकरणात संपादक अथवा प्रकाशकांच्या स्त्रीदाक्षिण्याला मानले पाहिजे. 

      पूर्वी चित्रपटसृष्टीतदेखील टोपणनावांचे प्रचलन होतो. दिलीपकुमार, मधुबाला ही नावे त्याची उदाहरणे आहेत. सी.रामचंद्र, डी. दत्ता हा एक वेगळा प्रकार. गायक कै.अरूण दाते यांना 'अरूण' हे टोपणनाव उद्घोषकाला त्यांचे घरगुती 'अरू'हे नावच माहिती होते. पण कायदेशीर 'अरविंद' हे नाव माहिती नव्हते. त्यामुळे अरूण दाते यांच्या पहिल्या गाण्याच्या प्रसारणाच्यावेळी अपघाताने ' अरूण' हे नाव सांगितले गेले. याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

     वापरली जाणारी अनेक टोपणनावे मुलेमुली लहान असताना चांगली वाटतात. गोडही वाटतात. पण हीच मुलेमुली मोठी झाल्यानंतर ती नावे चांगली वाटत नाहीत. मग अशा नावांना दादा,‌ काका, ताई, आत्या अशी जोड देऊन त्यांना जरा भारदस्तपणा आणला जातो.

  टोपण नावे सांगताना पूर्वी उर्फ, तथा या शब्दांचा वापर केला जाई. सुधीर उर्फ दादा, गजानन तथा महेश, अशा रीतीने नाव‌ सांगितले जाई.

   आताही टोपणनावांचा उपयोग होतो असे मध्यंतरी माझ्या लक्षात आले. त्याचे कारण वेगळे होते. सध्या तरूण पिढीत इन्स्टाग्राम हे समाज माध्यम अतिशय लोकप्रिय आहे. त्यावर मीदेखील माझे खाते उघडले. अनेकांच्याकडून जोडून घेण्यासाठी विनंती येऊ लागल्या. त्या बघताना टोपणनावे आहेत हे लक्षात आले. ही नाव जरा वेगळी, आताच्या पद्धतीची असतात. त्यांना टोपणनाव असेच म्हटले पाहिजे. पण आताच्या तरूण पिढीसाठी 'टोपणनाव' हा शब्ददेखील जुनाट किंवा कालबाह्य झाला आहे. 

    एकूण काय पर्यायी नावाचे किंवा टोपणनावाचे प्रचलन वेगळ्या पद्धतीने सुरू आहेच. एखाद्या व्यक्तिला वेगळ्या नावाने संबोधण्याची मानवी वृत्ती काही बदलणार नाही. त्यामुळे टोपणनावे ही राहणारच.


सुधीर गाडे,  पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख