मानवी भावभावनांमधील सीमारेषा
मानवी मन ही अतिशय गुंतागुंतीची गोष्ट आहे. आपल्या भावनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे, त्यांचे वर्गीकरण करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे कारण मुळातच मानवी भावभावना या साधारणपणे वस्तुनिष्ठ असू शकत नाहीत तर त्या व्यक्तिनिष्ठ असतात. त्यामुळे पाहणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनानुसार त्या भावभावना ठरत असतात. एकाच प्रकारची घटना प्रतिक्रिया प्रसंग वेग-वेगळ्या व्यक्तिंच्या मनात वेगवेगळी स्पंदने निर्माण करतात. त्यामुळे या भावभावनांमध्ये सीमारेषा ठरवणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे.
काही भावनांचे उदाहरण घेता येईल. स्वाभिमान आणि अहंकार ही भावनांची अशीच एक जोडी आहे. एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान प्रकट झाला की अहंकार दिसून आला हे ठरवणे अवघड आहे. ज्या व्यक्तीने तीव्र प्रतिक्रिया दिली त्याला ती आपण स्वाभिमानी असल्यामुळे दिली असे वाटते. तर ती प्रतिक्रिया एखाद्या व्यक्तीच्या विरोधात असेल तर त्या व्यक्तीला प्रतिक्रिया देणाऱ्याचा तो अहंकार वाटतो. इतिहासामध्ये हे नोंदलेले आहे की महाराणा प्रताप यांनी अकबराशी कोणतीही तडजोड करण्याचे नाकारले. महाराणा प्रताप यांना ती तडजोड म्हणजे आपल्या स्वाभिमानाशी तडजोड वाटत होती. परंतु त्याचवेळी मानसिंग अकबराच्या बाजूला होते आणि त्यांना तो महाराणा प्रताप यांचा अहंकार वाटत होता. पानिपतावर जेव्हा दत्ताजी शिंदे मरणासन्न अवस्थेत पडलेले होते तेव्हा कुत्बशहाने विचारले, "क्यों पटेल और लडेंगे?" तेव्हा दत्ताजींनी उत्तर दिले, " क्यों नहीं, बचेंगे तो और भी लडेंगे." या प्रसंगी दत्ताजींचे उद्गार त्यांना स्वाभिमानाचे वाटले पण कुत्बशहाला ते अहंकाराचे वाटले असतील.
भावभावनांची अशीच एक जोडी म्हणजे हर्ष आणि उन्माद ही होय. एकच प्रतिक्रिया ही कुणाला हर्ष प्रकट करणारी वाटते तर कुणाला तो उन्माद वाटतो. इतिहासात १५६५ ची तालीकोटची लढाई प्रसिद्ध आहे. विजयनगरच्या रामदेवराय यादवाला अनेक मुस्लिम सत्ताधीशांनी एकत्र येऊन पराजित केले. रणांगणात रामदेवरायाचा मृत्यू झाला. त्यांनंतर रामदेवरायाची कवटी कोरून ती मोरीच्या तोंडाशी बसवण्यात आली. विजेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विजयाचा हर्ष दाखवणारी ही कृती होती. पण अनेकांना हा उन्माद वाटला. खेळांच्या स्पर्धेमध्ये विजयी खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया ही त्याच्या दृष्टीने हर्ष प्रकट करणे असते तर हलणाऱ्याच्या मते तो उन्माद असतो. साधारण अशीच प्रतिक्रिया संबंधित खेळाडूंच्या पाठीराख्यांची असते.
दु:ख आणि दिखाऊपणा ही अशीच एक जोडी आहे. साधारणपणे हे वाचल्यावर मनात येते की हे कसे काय? काही जण दु:खाचा देखावा जास्त करतात की काय असे वाटून जाते. राजस्थानमधील रूदाली प्रथा बघितले की हे लक्षात येते. महाराष्ट्रातही पूर्वी ही पद्धत असावी असे वाटते कारण संत तुकाराम महाराज यांनी लिहिले आहे ' मोले घातले रडाया नाही आसू नाही माया'.
दोन व्यक्तींमध्ये भावभावनांबद्दल मतभेद असू शकतात. पण काहीवेळा व्यक्तिच्या मनातदेखील कदाचित आपल्याच कृतीबद्दलच्या भावनेबाबत कधीकधी स्पष्टता नसते. आपली कृती ही स्वाभिमान दाखवते की अहंकार, आपण व्यक्त केला तो हर्ष की उन्माद हे कधीकधी व्यक्तिला निश्चितपणे सांगता येत नाही. अशावेळी मन दोलायमान होते. भावभावनांच्या हिंदोळ्यांवर ते हेलकावत राहते. अशी दोलायमान अवस्था ही त्रासदायक असते. ती जितका वेळ राहते तितका वेळ मन संभ्रमित अवस्थेत असते. अशी स्थिती जास्त काळ राहिली तर ती खूपच त्रासदायक ठरते. ही अवस्था संपावी यासाठी व्यक्तिला स्वतःलाच स्वतःची समजूत घालावी लागते किंवा कुणी जवळच्या माणसाने सांगितले तर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो.
मनाच्या अशा गुंतागुंतीमुळेच कवी सुधीर मोघेंनी लिहिले आहे.
' मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा? '
सुधीर गाडे, पुणे
नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteखूप सुंदर लेखन सर जी
Deleteधन्यवाद भाऊ.
Delete