अटळ ते होणार

          अनेक वेळा माणूस एखादी योजना करतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष घडेल असे मानत राहतो. बऱ्याच वेळा याप्रमाणे होते परंतु काही वेळा वेगळेच घडून जाते. नंतर मग हे इलाजाने किंवा नाईलाजाने मान्य करावे लागते की अटळ ते होणार. हिंदू विचाराप्रमाणे ब्रह्मदेव विश्व घडवतो म्हणून असे म्हटले जाते,  'होणारे न चुके कधीही जरी ये ब्रह्मा तया आडवा'. 

     प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या आयुष्यातील एक कथा सांगितली जाते. भास्कराचार्यांचा फलज्योतिष्याचादेखील अभ्यास होता. त्यांनी आपली मुलगी लीलावती हिची पत्रिका बघून तिला विवाहानंतर वैधव्य येणार आहे हे जाणले होते. तिच्या आयुष्यामध्ये एकच असा मुहूर्त होता की ज्या मुहूर्तावर तिचे लग्न झाले असते तर वैधव्य टळणार होते. भास्कराचार्य यांनी सर्व काटेकोर तयारी केली. परंतु वेळ दाखविणाऱ्या घटिका पात्रात तांदळाचा कण अडकल्यामुळे मुहूर्त साधला गेला नाही.   दुसऱ्या वेळेवर लग्न लागल्याने लीलावती हिला वैधव्य आले. पुढे भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवण्यासाठी ग्रंथ रचना केली ती प्रसिद्ध आहे.

     मी छत्रपती संभाजीनगर येथे संघाचा प्रचारक असताना तेथील जेष्ठ कार्यकर्ते मा. अनिल भालेराव यांनी मला असे सांगितले होते की ते एकूण तीन वेळा विमान अपघातातून सुखरूप वाचले होते. त्यापैकी एक अपघात इतका विचित्र होता की त्यामध्ये विमान तळाशेजारून जाणाऱ्या ट्रकला धडकल्याने अपघातग्रस्त झाले. परंतु त्यातूनही अनिलराव सुखरूप वाचले. नुकतीच मला त्या अपघाताबद्दल अजून काही माहिती मिळाली. त्याच विमानात तेथील एक प्रसिद्ध उद्योगपती त्यांचा स्वीय सहाय्यक आणि एक वरिष्ठ अधिकारी यांच्यासह प्रवास करत होते. मिळालेल्या तिकिटांनुसार उद्योगपतींच्या शेजारी स्वीय सहाय्यकांची जागा होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांची जागा दुसरीकडे होती. परंतु काही चर्चा करण्यासाठी उद्योगपतींनी अधिकाऱ्यांना आपल्यासोबत बसायला सांगितले. नेमका त्याच भागाला अपघाताचा मोठा धक्का बसला आणि जेष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्दैवी निधन झाले. ही घटना ऐकल्यानंतर मला एक छोटीशी गोष्ट आठवली. एके दिवशी एक चिमणी भीतीने खूप थरथर कापत होती. त्याचवेळी कोठून तरी एक गरुड तिच्याजवळ आला आणि तिला विचारू लागला , " का बरं घाबरतेस?". ती म्हणाली, " समोर मला माझा मृत्यू दिसतो आहे".  गरुड म्हणाला, "मी तुला मदत करतो. तू माझ्या पाठीवर बैस मी तुला येथून खूप दूर घेऊन जातो". त्याप्रमाणे गरुडाने त्या चिमणीला दूरवर नेले. परंतु तेथे मृत्यू हजर होताच. तो गरुडाला म्हणाला , " मी मघाशी हाच विचार करत होतो की या छोट्याशा चिमणीचा मृत्यू थोड्याच वेळात अतिशय दूरच्या ठिकाणी होणार आहे. ही छोटीशी चिमणी थोड्या वेळात तिथे कशी बरे पोचणार? परंतु तुझ्यामुळे ती बरोबर त्या ठिकाणी पोचली." म्हणजे अटळ गोष्ट घडलीच.

        

                                           ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र ) 

     १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे होणाऱ्या सर्वधर्मपरिषदेसाठी स्वामी विवेकानंद पोहोचले. परंतु तेथे पोहोचल्यानंतर त्यांना समजले की परिषदेत प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी परिचयपत्र आवश्यक आहे. ते नसल्याने त्यांना परिषदेत सहभागी होता येणार नाही. स्वामीजी परिषदेच्या पुष्कळ आधी पोचले होते. शिकागोमध्ये होणारा मोठा खर्च वाचवण्यासाठी ते बोस्टनजवळील मेटकाफ या छोट्या खेड्यात पोचले. तेथे त्यांची प्रोफेसर राईट यांच्याशी ओळख झाली. प्रोफेसर राईट यांनी स्वामीजींबद्दल परिषदेच्या आयोजकांना परिचयपत्र लिहिले, " आपल्याकडील सर्व विद्वान प्रोफेसर एकत्र आणल्यावरही त्यांच्या बुद्धिमत्तेत वरचढ ठरेल अशी ही व्यक्ती आहे." स्वामीजींजवळचे पैसे जवळपास संपलेले असताना प्रोफेसर राईट स्वामीजींना भेटले. त्यांच्या मदतीने स्वामीजींनी काही ठिकाणी व्याख्याने देऊन आवश्यक असे पैसे मिळवले. प्रोफेसर राईट यांनी दिलेले परिचयपत्र , पत्त्याचा कागद घेऊन स्वामीजी परिषदेच्या आधी एक दिवस शिकागोत रात्री पोचले. सहप्रवाशाने त्यांना अपेक्षित मदत केली नाही. रेल्वे स्टेशनजवळचा भाग जर्मन भाषिकांचा असल्याने स्वामीजींना संवाद साधता आला नाही. रात्र एका मालगाडीच्या डब्यात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी ते पत्ता शोधू लागले. त्यावेळी त्यांच्याकडील परिचय पत्र व कागद गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. थोडे दूर जाऊन घरोघर स्वामीजी पत्ता विचारू लागले. परंतु स्वामीजींचे मळलेले कपडे , अमेरिकेत त्यांचा वेगळा वाटणारा वेश यामुळे अनेक घरातून त्यांना हुसकावून लावण्यात आले. शेवटी रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी ते शांतपणे बसले आणि त्यांना ईश्वरी योजनेची प्रचिती आली. समोरच असणाऱ्या आलिशान बंगल्यातील घरातील श्रीमती बेले हेल यांनी आपणहून स्वामीजींशी संवाद साधला आणि त्यांना सर्व प्रकारची मदत केली. परिषदेच्या ठिकाणी त्यांना श्रीमती हेल घेऊन गेल्या. पहिल्या दिवशीच्या सत्रात स्वागताला उत्तर द्यायचे होते. अन्य प्रतिनिधींनी तयार केलेली आपली भाषणे सुरू झाली. स्वामीजींना अध्यक्षांनी अनेक वेळा विचारल्यावरही त्यांनी लगेच बोलण्याचे नाकारले. अध्यक्षांना असे वाटू लागले की हा तरुण बोलणार की नाही? त्यामुळे त्यांनी जेव्हा शेवटची संधी दिली त्यावेळी स्वामीजी बोलण्यासाठी उभे राहिले. या भाषणाची कोणतीही तयारी स्वामीजींनी केली नव्हती. त्यांनी आपले गुरुदेव राम कृष्ण परमहंस आणि माता सरस्वती यांचे स्मरण केले आणि शब्द उच्चारले " अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुंनो......". पुढे घडलेला इतिहास सर्वांना माहिती आहेच. "नरेंद्र, जगाला शिकवील" ही रामकृष्ण परमहंसांची वाणी खरी ठरली. 

      या परिषदेबाबत अजून एक वेगळा मुद्दा आहे. स्वामीजींना जसजसा परिषदेच्या आयोजकांचा परिचय झाला तसतसे त्यांचे मत बनत गेले आणि ते म्हणाले , "ही सर्व धर्म परिषद म्हणजे ख्रिस्ती वर्चस्वाचे व्यासपीठ व्हावे असा त्यांचा हेतू होता". परंतु स्वामीजींनी हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे सर्व धर्म सत्य आहेत हे सांगितले आणि विश्वबंधुत्वाचा विचार मांडला. त्यांच्या प्रभावी प्रतिपादनाने परिषदेच्या आयोजकांचा सुप्त हेतू सफल झाला नाही.

    असे प्रसंग बघितल्यानंतर हे लक्षात येते की अटळ ते होणार.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. अटळ ते होणार हा लेख अतिशय सुंदर आणि विषयाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेच्या वारीच्या वेळेस घडलेल्या घटनांचा उल्लेख लेखाला एका वेगळ्याच किंबहुना उच्च पातळीवर नेऊन ठेवतो. धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख