नरेंद्रनाथांचा स्वामी विवेकानंद होतानाचा प्रवास

 श्री. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ( म्हणजेच नरेंद्रनाथ) या विख्यात गुरु शिष्यांचा या जगातील प्रत्यक्ष सहवास जेमतेम पाच वर्षांचा होता. स्वतःला निर्विकल्प समाधी हवी या इच्छेने नरेंद्रनाथ अतिशय व्याकुळ झाले होते. गुरूंच्या कृपेने त्याचा अल्पसा अनुभव नरेंद्रनाथांना मिळाला. परंतु " तुला कालीमातेचे कार्य पूर्ण करायचे आहे. ते पूर्ण झाले की मगच तुला संपूर्ण अनुभव मिळेल." असे सांगून रामकृष्णांनी १६ ऑगस्ट १८८६ ला देह ठेवला.



( छायाचित्र पुढील दुव्यावरून साभार

https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Swami_Vivekananda%27s_Statue_at_Vivekananda_Road,_Kolkata.jpg)

   आपल्या गुरु बंधूंना एकत्र घेऊन नरेंद्रनाथ वराहनगर येथे एका पडक्या घरात राहू लागले. यासाठी आवश्यक ती मदत रामकृष्णांचे गृहस्थी शिष्य करू लागले‌ जणू काही एक मठच वराहनगर येथे स्थापन झाला. परंतु गुरूंनी सूचित केलले आपले जीवित कार्य कोणते याबाबतची स्पष्टता नरेंद्रनाथांच्या मनात येत नव्हती. त्यामुळे जीवितकार्याचा शोध घेण्यासाठी म्हणून जुलै १८९० मध्ये नरेंद्रनाथ भारताच्या परिभ्रमणासाठी बाहेर पडले. सर्व गोष्टी अनिश्चित होत्या. 'पानी बहता भला साधू रमता भला' या उक्तीनुसार हा प्रवास सुरू झाला. यालाच परिव्राजक अवस्था असे म्हटले आहे. या काळात नरेंद्रनाथांनी विविदिशानंद , सच्चिदानंद, विचिकित्सानंद अशी विविध नावे धारण केली होती. शेवटी विवेकानंद हे नाव धारण केले. ३१ मे १८९३ ला स्वामीजी मुंबईहून बोटीने अमेरिकेकडे निघाले. 

   या प्रवासात नरेंद्रनाथ घनदाट अरण्यात , उंच पर्वतांवर , वाळवंटात तसेच गोरगरिबांच्या झोपडीत तर राजे महाराजांच्या महालातदेखील राहिले. जुन्य काव्यपंक्तींमध्ये थोडासा बदल करून असे म्हणता येईल की 

ध्येयासाठी भटकत जरी मी दूर देशी फिरेन |

 राजाच्या सदनी अथवा घोररानी शिरेन ||

नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव |

 परी प्रिय राहो मम चित्ती ध्येयपूर्ती सदैव||

या प्रवासातील काही प्रसंगांमध्ये नरेंद्रनाथांची प्रतिक्रिया ध्यानात घेण्यासारखी आहे.

    फिरत फिरत नरेंद्रनाथ वाराणसीमध्ये पोचले. ते एका चिंचोळ्या गल्लीतून जात असताना वाटेत माकडांचा मोठा घोळका होता. नरेंद्रनाथ त्यांच्यापासून दूर जाऊ लागल्यावर त्या माकडांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. नरेंद्रनाथ आणखी वेगात पळू लागले. तशी माकडेदेखील वेगात त्यांचा पाठलाग करू लागली व त्यांना चावू लागली. त्यांच्या तावडीतून सुटणे अशक्य वाटू लागले. पण तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका अनोळखी माणसाने जोराने ओरडून म्हटले, " माकडांना तोंड द्या." नरेंद्रनाथ तसेच परत फिरले आणि माकडांसमोर ताठ उभे राहिले. त्याबरोबर ती मागे हटली आणि पळून गेली. यातून नरेंद्रनाथ मोठा धडा शिकले ,

नका संकटांना भिऊ येऊ द्या ती |

 समर्थापुढे संकटे नम्र होती ||

हा धीटपणाचा धडा पुढे स्वामीजींनी सर्वांना शिकवला.

       एके दिवशी वाटेने चालताना असलेला एक माणूस हुक्का पिताना नरेंद्रनाथांना दिसला. नरेंद्रनाथांनी त्याच्याकडे अपेक्षेने बघतिले. त्याने नरेंद्रनाथांची भगवी वस्त्रे पाहून त्यांना हुक्का ओढण्यासाठी देऊ केला. अशा (बहुधा तथाकथित अस्पृश्य) माणसापासून हुक्का प्यायचा हे न पटल्याने ते चटकन त्याला ओलांडून पुढे जाऊ लागले. तेवढ्यात आपल्या गुरूंच्या उपदेशाची त्यांना जाणीव झाली. 'सर्वांभूती परमेश्वर आहे' हा गुरूंचा उपदेश पुन्हा एकदा आठवला आणि परत जाऊन त्यांनी त्या माणसाकडून हुक्का घेऊन तो ओढला. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की बालपणी हेच नरेंद्रनाथ उत्सुकतेने आपल्या वडिलांच्याकडे भेटायला येणाऱ्या सर्व माणसांच्यासाठी असलेले वेगवेगळे हुक्के ओढून बघत होते. यातून धर्म कसा बुडतो हे त्या बालकाला जाणून घ्यायचे होते. परंतु लहानपणची ही निष्पाप वृत्ती बदलली होती. जगरहाटीमुळे विचारांवर पुटे चढली होती. गुरूंचा उपदेश वेळेवर स्मरल्याने ती दूर झाली.

      राजस्थानात खेत्री नावाचे एक छोटे संस्थान आहे. त्याचे संस्थानिक राजा अजितसिंह यांचा परिचय नरेंद्रनाथांशी झाला. अजितसिंहांनी त्यांना गुरू मानले आणि विवेकानंद हे नाव धारण करण्याची विनंती केली. अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेसाठी जाण्याचे निश्चित झाले होते. याच सुमारास आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला मुलगा झाला म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अजितसिंहांनी स्वामीजींना खेत्रीमध्ये पाचारण केले. तेथील समारंभात स्वामीजींनी भाग घेतला. स्वामीजींना निरोप देण्यासाठी म्हणून अजितसिंह खेत्रीवरून जयपुरपर्यंत आले. आपल्या तेथील वाड्यामध्ये स्वामीजींच्या मनोरंजनासाठी म्हणून अजितसिंहांनी एका नर्तिकेचे गाणे ठेवले. परंतु आपण सर्वसंगपरित्याग केलेले संन्यासी आहोत. या नर्तिकेचे गाणे कसे ऐकायचे म्हणून ते गाणे ऐकण्यासाठी न थांबता स्वामीजी तेथून उठून गेले. ही नर्तिका एक अतिशय समंजस स्त्री होती. तिने संत सूरदासांचे एक प्रसिद्ध गीत गाण्यास सुरुवात केली.

हमारे प्रभु अवगुण चित ना धरो|

समदरशी है नाम तिहारो |

अब मोहे पार करो| हमारे प्रभु|| 


जवळच असलेल्या स्वामीजींच्या कानांवर हे शब्द पडले. भावव्याकुल अशा त्या स्वरांनी स्वामीजींची जणू कानउघाडणी केली. गाणे संपताच स्वामीजी त्या नर्तिकेजवळ आले आणि त्यांनी हात जोडून तिची क्षमा मागितली. पुढे आयुष्यभर स्वामीजी हा प्रसंग विसरले नाहीत. आपल्या शिष्यांना ते वारंवार हा प्रसंग ऐकवत आणि सांगत की पद, प्रतिष्ठा , व्यवसाय यावरून माणसाची परीक्षा करू नका . माणासातील परमेश्वर बघायला शिका!

    नंतर ६ जुलै १८९६ रोजी श्री. फ्रान्सिस लेगेट या आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात , "वयाच्या विसाव्या वर्षी मी सहानुभूतीशून्य , कुणाशीही जुळते न घेणारा असा हेकेखोर माणूस होतो. कोलकाता शहरातील रस्त्याच्या ज्या बाजूस नाटकगृहे असत त्या बाजूने मी कधी चालायला तयार नसे. आज तेहतिसाव्या वर्षी ज्या घरात एखादी वारयोषिता राहत असेल त्या घरातही मी राहू शकतो, इतकेच नव्हे तर तिची एखाद्या शब्दाने निर्भत्सना करण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही."

    चुका सर्वांच्या हातून होतात.परंतु 

कदा चूक हातून कार्यात झाली|

अशी बांधवाने तुला दाखविली |

तरी ती चुकी मान्य आहे म्हणावे,|

 न हेका धरुनी कधीही बसावे||

हे योग्य आहे.

       चुका मान्य करून , त्यातून शिकून पुढे जाण्यातून नरेंद्रनाथांचा विवेकानंद होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. निःसंशय हा प्रवास प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे.

  सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. धन्यवाद सर, आपल्या लेखन शैलीला सलाम. स्वामीजींचे जे अनुभव आपण सांगितले आहेत त्या प्रकारच्या अनुभवातून आपणही वारंवार जात असतो परंतु झालेल्या चुका सुधारण्यात आपण कमी पडतो, कारण की आपण आपला अहंकार सोडण्यास कधीही तयार होत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अहंकाराचा मुद्दा अगदी बरोबर आहे डॉक्टर.

      धन्यवाद! 🙏🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख