सेवामूर्ती बुधरी ताती

 दैन्य विघटना दिसे सभोती, मनात सलते हे शल्य

ते काढाया यत्न करावे, यातच जीवन साफल्य

       ज्येष्ठ संघकार्यकर्ते कै. नानाराव पालकर यांच्या या ओळी ज्यांनी गेली अनेक दशके आचरणात आणून स्वतःच्या जीवनाला साफल्य प्राप्त करून दिले आहे, अशा अखंड सेवारत असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, श्रीमती बुधरी ताती. साक्षात सेवामूर्ती असणाऱ्या श्रीमती बुधरी ताती यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी या लेखाचा प्रपंच ! 


( महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा वर्ष २०२२ चा बाया कर्वे पुरस्कार स्वीकारताना श्रीमती बुधरी  ताती )

         भारताच्या छत्तीसगड राज्यातील दक्षिण बस्तरमधील गीदम ब्लॉकमधील हीरानार या गावी श्रीमती बुधरी ताती यांचा जन्म सन १९६९ मध्ये एका जनजाती परिवारात झाला. त्यांच्या घरात आध्यात्मिक वारसा वडिलांपासून चालत आला आहे बुधरी यांनाही आध्यात्मिकतेची आवड लहानपणापासून आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून गुमरगुंडा आश्रम दिव्य जीवनसंघाशी त्यांचा संबंध आला. या आश्रमातील स्वामी पूज्य सदाप्रेमानंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. जनसेवेच्या कार्याची प्रेरणादेखील आपल्या गुरूंकडूनच त्यांना मिळाली. 

          याच सुमाराला वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांशी बुधरी यांचा संपर्क आला. मूळच्या आंध्र प्रदेशातील असणाऱ्या एका पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी बुधरी यांच्या मनातील कार्याची प्रेरणा आणखी बळकट केली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी, म्हणजेच १९८४ मध्ये बुधरी यांनी आपल्या आयुष्याची दिशा निश्चित केली. हे समजल्यानंतर मनात येऊन गेले की एवढ्या लहान वयात किती जण आपल्या आयुष्याची दिशा नक्की करू शकतात ? असो.  

        आयुष्याची दिशा तर ठरली, पण आता पुढे कसे जायचे ? बुधरी यांच्या घरामध्ये खूप चर्चा सुरू झाली. कारणदेखील तसेच होते. जनसेवा करायची म्हणजे गृहत्याग हा करावा लागणार. पण जनजाती समाजामध्ये अशा गृहत्यागाची विशेषतः मुलींच्या गृहत्यागाची पद्धत मुळीच नव्हती. अशावेळी वडिलांसारखे असणारे त्यांचे मोठे बंधू त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जनसेवेच्या कार्यासाठी गृहत्यागाचा निर्णय झाला. प्रशिक्षणासाठी नागपूरला जायचे ठरले. योजनांसाठी बुधरीजी नागपूरला पोहोचल्या, त्या राष्ट्र सेविका समितीच्या कार्यालयात. सुमारे दीड महिना त्या नागपूरमध्येच राहिल्या. अनोळखी शहर अनोळखी माणसे अनोळखी भाषा ; पण या सगळ्या अनोळखी वातावरणात होती ती आपलेपणाची भावना, अकृत्रिम स्नेह. या वास्तव्यात अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. नागपूरहून त्या बस्तरमध्ये परतल्या आणि कार्याला सुरुवात केली. 

      जनसेवा करायची तर त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे, हे बुधरीजींच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी अबुजमाड परिसरातील गावोगावी जायला सुरुवात केली. त्या काळी या दुर्गम भागात वाहतुकीची साधने कुठली ? गावोगावी जाण्यासाठी पायपीट हेच साधन. बुधरीजींची सतत पायपीट सुरू झाली. जवळपास ५०० च्या वर गावी त्या पोहोचल्या. पण समाजाचा प्रतिसाद थंड ; नव्हे नव्हे, हतोत्साहित करणारा. त्या दिसल्या की घराची दारे बंद होत. अगदी प्यायलादेखील पाणी कोणी देत नसे. पण बुधरीजींच्या मनातील प्रेरणेची ज्योत मंदावली नाही की तिच्यावर काजळी धरली नाही. त्या न थकता, निराश न होता जनजागृतीची खटपट करतच राहिल्या. हळूहळू प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. 

       ही खटपट चालू असतानाच त्या विचार करत होत्या की आपल्या समाजाची स्थिती कशी आहे, कोणत्या कार्याची गरज आहे, कुठल्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे. त्यांच्या लक्षात आले की स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, धर्माभिमान या क्षेत्रांत काम करण्याची गरज आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व क्षेत्रात त्यांनी कामाला सुरुवात केली. वेगवेगळे उपक्रम, प्रयोग, प्रकल्प सुरू केले.  

       बुधरीजींच्या लक्षात आले की वैयक्तिक स्वच्छतेकडे खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. अगदी अंघोळदेखील महिना-महिना लोक करत नसत. त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत. महिला वर्गाला स्वच्छतेची सवय लावण्यासाठी त्यांनी एक उपक्रम सुरू केला. साबण, तेल असे स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य घेऊन त्या गावोगावी जात. महिलांना एकत्र करून पाणवठ्यावर घेऊन जात. घासूनपुसून अंघोळ घालत असत. जवळपास वर्षभर त्यांनी हा उपक्रम केला. चिकाटीने केलेल्या या उपक्रमातून स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली. लोकांमध्ये अनुकूल बदल होत गेला. 

      याच दरम्यान बुधरीजींच्या अजून एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे लोक नवीन कपडे लगेच घालत नसत. नवीन कपडे आणले की वर्षभर ते तसेच टांगून ठेवत. जुनाट झाले की मग ते वापरायला सुरुवात करत. लोकांशी संवाद केल्यावर लक्षात आले की नवीन कपडे पाहून जंगलातील प्राणी आपल्यावर हल्ला करतील असे त्यांना वाटे, म्हणून कपडे जुनाट करून वापरले जात. लोकसंवादातून हळूहळू बदल होत गेला.  

       शिक्षण, संस्कार या क्षेत्रातही बुधरीजी यांनी आपले कार्य सुरू केले. त्यांनी १९८५ मध्ये बारा मुलांना सोबत घेऊन बारासुर येथे विद्यार्थी वसतिगृह चालू केले. बुधरीजी यांच्या प्रकल्पात्मक कार्याची ही सुरुवात होती. येणाऱ्या अडचणींवर मात करत त्या सातत्याने काम करतच होत्या. आपल्या अंगीकृत कार्याची त्यांची निष्ठा कधीही डळमळली नाही, कारण ‘आपले कार्य हे भगवंताचेच कार्य आहे’ यावर त्यांची दृढ श्रद्धा होती आणि आजदेखील तशीच आहे. 

      गृहत्याग करताना ‘मी किमान एक वर्षभर तरी घरी परत येणार नाही’ असे सांगून बुधरीजी घराबाहेर पडल्या होत्या. ‘तू राहशील कुठे ? खाशील काय ?’ काळजीपोटी कुटुंबियांनी विचारलेल्या प्रश्नांना बुधरीजींनी श्रद्धेच्या आधारावर उत्तर दिले. सुमारे वर्षभरानंतर त्या घरी परतल्या. कुटुंबीयांशी गुजगोष्टी झाल्या. आपली मुलगी चिकाटीने परिस्थितीशी दोन हात करत पुढे चालली आहे, कार्याचे तिला समाधान आहे, हे कुटुंबियांना लक्षात आल्यावाचून राहिले नाही. मुलीच्या समाधानातच त्यांनी आपले सुख मानले.

        कार्यमग्न झालेल्या बुधरीजींच्या अजून एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे आजारी पडले डॉक्टरकडून उपचार घेऊन औषध-गोळ्या घ्यायला लोक तयार नसत. असे केले तर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशी भीती त्यांच्या मनात असे. आजारामुळे मृत्यू आला तरी चालेल पण औषधोपचार घेऊन देवाचा कोप नको, अशी त्यांची भावना होती. सततच्या प्रयत्नांनी यातदेखील बदल करण्यात बुधरीजींना यश आले. बऱ्याच नंतर कोविड प्रकोपाच्या काळातदेखील पुन्हा असाच अनुभव. कोविडप्रतिबंधक लस टोचून घ्यायला लोक तयार नव्हते. बुधरीजी आणि त्यांच्या दोन सहकारी महिलांनी पहिल्यांदा लस टोचून घेतली. बुधरीजींच्या इतक्या वर्षांच्या कार्यामुळे लोकांच्या त्यांच्यावर विश्वास बसला होता, त्यामुळे नंतर वेगाने लसीकरण झाले. 

       आपल्या समाजातील महिलांची दु:स्थिती बुधरीजींच्या लक्षात आल्यावाचून राहिली नव्हती. दारिद्र्य तर जणू पाचवीला पुजलेले होते. अंगावर घालायला जेमतेम एखादी साडी असेल. आरोग्याचे प्रश्न तर होतेच. माणूस म्हणूनही प्रतिष्ठा नव्हती. स्त्री कोणत्याही वयाची असो, तिने पुरुषासमोर बसता कामा नये असा दंडक होता. ही परिस्थिती बदलण्याचा निश्चय करून बुधरीजींनी १९८९ मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने हिरानार येथे महिलांचे वसतीगृह सुरू केले. महिलांच्या या कार्याला नाव दिले ‘मां शंखिनी महिला उत्थान केंद्र.’ या कार्याला सुरुवात झाली. साधने, पैसा यांची आवश्यकता होतीच. पण पैशांसाठी बुधरीजींनी सरकारी मदतीची अपेक्षा ठेवली नाही. आपल्या ईश्वरी कार्यासाठी आवश्यक धनाची याचना त्या समाजरुपी परमेश्वराकडे करत राहिल्या. बुधरीजींच्या कठोर तपश्चर्येने हा परमेश्वर प्रसन्न झाला. आवश्यक धनाची गरज भागू लागली. 

      महिलांच्या सबलीकरणासाठी बुधरीजींनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले. रात्रवर्गाच्या माध्यमातून प्रौढ महिलांचे शिक्षण सुरू झाले. रोजगारनिर्मितीसाठी वेगवेगळी कौशल्ये शिकवण्यास सुरुवात झाली. यातून हळूहळू धनप्राप्ती सुरू झाली. मिळालेले पैसे कुठे ठेवायचे, हा प्रश्न होता. कुणी ते पैसे जमीन पुरून ठेवले तर कोणी ते माळ्यावर दडवून ठेवले. कारण बँकेत पैसे सुरक्षित राहू शकतात यावर त्यांचा विश्वास नव्हता. अर्थातच असे ठेवलेले पैसे खराब झाले. बुधरीजींनी चिकाटीने प्रयत्न करून बँकेत खाती उघडायला लावली. बँकेचे व्यवहार सुरक्षित आणि फायदेशीर आहेत, याचा अनुभव सगळ्यांना येऊ लागला. शिक्षणाचे प्रमाण वाढू लागले तसतशी महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळवून आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. अनेकजणी सरकारी अधिकारी झाल्या, अनेकजणी शिक्षिका झाल्या. बुधरीजींच्या कार्यामुळे आत्तापर्यंत साडेपाचशेपेक्षा जास्त महिला स्वावलंबी बनल्या आहेत. स्वतः केवळ दहावीपर्यंत शिकू शकलेल्या बुधरीजींना महिलांच्या या प्रगतीमुळे अतीव समाधान लाभले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेऊ न शकलेल्या बुधरीजींच्या जीवनाच्या शिक्षणाचा विलासपूर येथे पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन यथोचित गौरव केला आहे. 

      सदैव सकारात्मक विचार घेऊन कार्यरत असलेल्या बुधरीजींनी समाजाचे सदैव निरीक्षण चालवले आहे. यातून त्यांच्या लक्षात आले की जनजातीय लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे कुटिल प्रयत्न पद्धतशीरपणे चालू आहेत. भोळाभाबडा समाज नकळत या प्रयोगांना बळी पडतो आहे. त्यातून प्रभू श्रीरामांशी आपला संबंध नाही, असा विचार मूळ धरू पाहतो आहे. अशा परिस्थितीत त्या आत्मीयतेने समाजबांधवांशी संवाद साधू लागल्या. सहजपणे समजावू लागल्या की, “आपल्याकडे बहुतेक सर्व पुरुषांच्या नावात राम आहे. आपला पंथ रामनामी आहे, मग आपला रामाशी संबंध नाही असे कसे म्हणता ?” आपलेपणाच्या या संवादाने समाजाची श्रद्धा पुन्हा बळकट होते आहे. ही श्रद्धा बळकट रहावी यासाठी आपल्या कार्याच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच बुधरीजींनी श्रीरामांची सामूहिक उपासना व्हावी, असा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला श्रीरामांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी लोक मिळेल त्या गोष्टी पदार्थ उस्फूर्तपणे घेऊन येत. हळूहळू त्यात चांगला बदल झाला आहे. समाजाची श्रद्धा दृढ झाली आहे.  

      सामुहिक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या निमित्ताने लोकांच्या मनात, व्यवहारात उच्चनीचतेची भावना असल्याचे बुधरीजींच्या लक्षात आले. कार्यक्रमासाठी एकत्र आलेले लोक एका ठिकाणी स्वयंपाक करून एकत्र जेवायला तयार नव्हते. अशावेळी सर्वांनी एकत्रच जेवले पाहिजे असा टोकाचा आग्रह बुधरीजींनी धरला नाही, की लोकांवर टीकेचे शाब्दिक प्रहार केले नाहीत. एकत्वाची भावना हळूहळू बळकट होत गेली. काही वर्षांतच एकत्र स्वयंपाक करायला सुरुवात झाली, सहभोजनालादेखील ! स्नेहाच्या संततधार सिंचनाने उच्चनीचतेचे खडक विरघळून गेले. समाज एकत्वाच्या सूत्रात बांधला गेला. 

       बुधरीजींच्या कार्याचा परीघ क्रमाक्रमाने वाढत गेला. समाजाची गरज ओळखून त्यांनी २००८ मध्ये वृद्धाश्रम सुरू केला, तर २०१३ पासून एकलपालकत्व असलेल्या किंवा अनाथ मुलांसाठी निवारा सुरू केला. समाजाच्या कार्यासाठी समाजाकडून धन गोळा करायचं ही तर बुधरीजींच्या कार्याची रीत आहे. पण याला अपवाद म्हणून की काय त्यांनी वृद्धाश्रमाच्या कार्यासाठी अल्पशी सरकारी मदत घेतली आहे. हीदेखील कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत.  

      बुधरीजींच्या कार्याचा विस्तार होत गेला तसतशी कार्यकर्त्यांची आवश्यकतादेखील वाढत गेली. आपल्या कार्याच्या आवश्यकतेच्या दृष्टीने बुधरीजींनी वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे अविवाहित राहण्याचा ! त्यामुळे त्या सर्वकाळ आपल्या कार्यासाठी उपलब्ध आहेत. बुधरीजींच्या मनातील कार्याच्या ज्योतीने अन्य महिलांच्याही मनातील ज्योती प्रज्वलित झाल्या. सुरुवातीला त्यांच्या जवळच्या नात्यातील काही महिला त्यांच्यासारखेच अविवाहित राहून त्यांच्या सोबत काम करू लागल्या. त्यांच्यामधील श्रीमती शांतीदेवी या बुधरीजींच्या प्रमुख सहकारी आहेत. याचबरोबर अन्य काही महिलांनीही अविवाहित राहण्याचा निश्चय करून बुधरीजींसोबत कामाला सुरुवात केली. आज अशा दहाजणी कामांमध्ये संपूर्णपणे सक्रीय आहेत. जनजाती समाजातील एक विलक्षण मोठी उपलब्धी आहे. या पूर्णवेळ कार्यकर्त्यांबरोबरच स्वतःचा घरप्रपंच सांभाळत शक्य तितक्या वेळ देणाऱ्या ४०० महिला बुधरीजींच्या सहकारी आहेत. या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने जनसेवेचा हा अविरत यज्ञ सुरू आहे. 

        जनसेवेच्या जवळपास चार दशकांच्या या कार्यामध्ये अनेक भलेबुरे अनुभव बुधरीजींना आले. काही प्रसंगांनी त्यांच्या ध्येयाची परीक्षा घेतली, तर काही प्रसंगांनी समयसुचकतेची. काही प्रसंगांनी समाधानाचे माप त्यांच्या ओंजळीत भरभरून टाकले. आरोग्यासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केल्याच्या काळातील हा एक प्रसंग. समाजात असणाऱ्या डोळ्यांच्या विकाराचे प्रमाण पाहून बुधरीजींनी एक नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले. जवळपास दीड हजार रुग्ण शिबिरात दाखल झाले. वाहतुकीची पुरेशी साधने नसल्याने अनेकजण चालतच शिबिरात पोहोचले होते. त्यापैकी अनेकांवर योग्य ते निदान करून शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याच शिबिराला ७० किलोमीटरवरील गावातून एक वृद्ध महिला आली होती. आपले डोळे काढले जातील, अशा गैरसमजातून ती वृद्धा कोणालाही न सांगता निघून गेली. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा शिबिरानंतर बुधरीजी आपल्या सहकाऱ्यासोबत पायी दरमजल करीत त्या वृद्ध महिलेच्या गावी पोहोचल्या. संतप्त गावकऱ्यांनी लाठ्या, काठ्या, कुऱ्हाडी वगैरे हत्यारे घेऊन दोघींना घेराव घातला. सहकारी महिलेचे मन भयभीत झाले. तेव्हा बुधरीजी शांतपणे तिला म्हणाल्या, “आपण ईश्वराचे काम करतो आहोत. तो ठरवेल तसेच होईल. धीर धर.” आणि काय चमत्कार ! गावकऱ्यांचे मनपरिवर्तन झाले. जे आत्तापर्यंत जिवावर उठले होते ते प्रेमाने बोलू लागले आग्रह करून त्यांनी या दोघींचा पाहुणचार केला. बुधरीजींच्या विनंतीवरून दहा-बारा जण त्यांना सोडवायला आले.  

     दंतेवाडाच्या हिंसाग्रस्त क्षेत्रात बंदूकधारी व्यक्तींनी एकदा बुधरीजींना अडविले. त्यांची चौकशी केली पण कोणतीही इजा न करता सोडून दिले. बुधरीजींसोबत काम करणाऱ्या ५० घरांच्या गावावर सशस्त्र व्यक्तींनी छापा टाकला. सर्वांना मारून टाकण्याची योजना सुरू केली, पण अचानक त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि कुणालाही दुखापत न करता ते निघून गेले. भोळ्याभाबड्या जनजातीय व्यक्तींचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीच्या घराची नासधूस झाल्यावर तो तावातावाने बुधरीजींच्या आश्रमात आला आणि वादविवाद घालू लागला. त्याच्याशी काही तास वादविवाद करून बुधरीजींनी त्याला परत जाण्यास भाग पाडले.    

      बुधरीजींच्या निरलस कार्याच्या विस्ताराची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली. भारताचे माननीय राष्ट्रपती आश्रमाला भेट देणार आहेत असा जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप त्यांना मिळाला. स्वागताची लगबग सुरू झाली. पण अचानक कार्यक्रमात बदल झाला. आश्रमाची भेट रद्द झाली. पण लहानथोर सर्वांनाच माननीय राष्ट्रपतींनी जवळच्या ठिकाणी भेटीसाठी बोलावून घेतले. सर्वांचं कौतुक केले. एक संस्मरणीय भेट झाली. छत्तीसगड राज्य सरकारने त्यांना ‘वीरनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा कौरव केला आहे. त्यांना अन्य पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या २०२२ सालचा ‘बाया कर्वे पुरस्कार’ त्यांना देण्यात आला आहे.

        गेली जवळपास चार दशके बुधरीजी समाजाच्या सेवेत सदैव मग्न आहेत. आपल्या कार्यावर दृढ विश्वास ठेवून श्रद्धायुक्त अंत:करणाने त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा चांगला परिणाम समाजजीवनावर झाला आहे. निरंतर आचरलेल्या या सेवाव्रतामुळे त्यांना ‘सेवामूर्ती’ म्हणणे मला योग्य वाटते. त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आल्यामुळे म्हणावेसे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती !’

( महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ' कर्त्या करवित्या भाग २ ' मध्ये २९/११/२०२३ रोजी प्रकाशित)

सुधीर गाडे , पुणे 

Comments

  1. अशा निरलस व निरपेक्ष आणि ग्रीन दलितांच्या कल्याणासाठी तळमळीने काम करणाऱ्या या बुधरीजी सारख्या कार्यकर्त्यांमुळेच विविधतेने संपन्न असा आपला भारत देश एकसंध राहिला आहे आणि उतरोत्तर आणखी बळकट होत आहे.. बुधरीजी सह अशा तन मन धनाने राबणाऱ्या असंख्य भारतीय कार्यकर्त्यांना त्रिवार वंदन. धन्यवाद सुधीर सर.

    ReplyDelete
    Replies
    1. होय डॉक्टर.
      नमस्कार. धन्यवाद!

      Delete
  2. सुरेख... सादरीकरण सर... 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख