स्वभाषेचा अभिमान

      सर्व माणसांना पहिली भाषा ऐकायला येते आणि समजते ती म्हणजे मातृभाषा! ही भाषा स्वतःला व्यक्त करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरते. परंतु त्यासाठी या भाषेचा आग्रह धरणे आवश्यक आहे. ज्या देशांना परक्यांच्या गुलामगिरीचा सामना करावा लागला त्यांच्यासाठी हे फार आव्हानात्मक ठरते. या संदर्भात महापुरुषांच्या उदाहरणांनी काय करायचे हे आपल्याला लक्षात येते.

      याबाबत छ.शिवाजी महाराजांचे उदाहरण प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे. शिवकालापूर्वी सुमारे ७-८ शतके भारतावर परकीय आक्रमणे होत होती. ही आक्रमणे सर्वंकष होती म्हणजे भूमी, माणसे, संस्कृती, भाषा, धर्म या सर्वांवर ही आक्रमणे होती. याचा परिणाम म्हणून दिल्लीच्या राज्यकर्त्यांच्या भाषा पर्शियन, फारसी याचा प्रचंड प्रभाव ( की दुष्प्रभाव ) मराठी भाषेवर पडला होता. या दोन्ही भाषेतील अनेक शब्द मराठीत प्रचलित झाले होते.  १६७४ मध्ये शिवरायांना राज्याभिषेक झाला. आपले सरदार रघुनाथपंत हणमंते (पंडितराव ) यांना महाराजांनी राज्यव्यवहारकोश तयार करण्याची आज्ञा केली. हणमंते यांनी आपले सहकारी धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्या मदतीने १६७६-७७ मध्ये दोन्ही परकीय भाषांना संस्कृत आणि मराठी प्रतिशब्द दिले. जवळपास १४०० शब्दांचा कोश तयार झाला. तत्कालीन पत्रव्यवहारावरही या परकीय भाषांचा पगडा होता. महाराजांनी आपले चिटणीस बाळाजी आवजी यांना पत्रव्यवहारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायने तयार करायला लावले‌. हे शब्द वापरण्याचा मोठा खटाटोप केला. पण दु:खाची बाब ही की मराठेशाही, महाराष्ट्राने शिवरायांच्या या शिकवणुकीचे तंतोतंत पालन केले नाही. नंतर मुख्य प्रधान ऐवजी पेशवा, दुर्ग ऐवजी किल्ला असे अनेक शब्द वापरात राहिले.

        १८९० मध्ये भारतभ्रमणासाठी स्वामी विवेकानंद कोलकाता सोडून बाहेर पडले. सुरुवातीला ते उत्तराखंडमधील देवघर येथे पोहोचले. त्यावेळी त्या ठिकाणी श्री राजनारायण बसू हे जेष्ठ समाजसेवक राहत होते. १८२६ मध्ये जन्मलेले राजनारायणजी यांचे शिक्षण इंग्लिशमध्ये झाले होते. त्यामुळे पूर्वायुष्यात त्यांच्यावर इंग्लिशचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी बंगालमधील मिदनापूर येथे मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे काम केले होते. उत्तरायुष्यात ते ब्राह्मो समाजाच्या संपर्कात आले. त्यांना भाषेसंबंधी होणारी आपली चूक लक्षात आली. ते विचार करू लागले. स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वसमाज, स्वधर्म यांच्यावर होणारे इंग्रजांचे सर्वंकष आक्रमण त्यांना उमगले. या सर्वंकष आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले. 'तत्त्वबोधिनी सभेद्वारे' त्यांनी विविध उपक्रमांची सुरुवात केली. तसेच १८६७ पासून त्यांनी 'राष्ट्रीय मेळ्याचे' आयोजन करायला सुरुवात केली. त्यातून स्वदेशी मालाचा पुरस्कार व्हावा अशी त्यांची खटपट होती. आग्रहपूर्वक ते स्वभाषेत म्हणजे बंगालीतच संभाषण करत असत. अशा ज्येष्ठ समाजसेवकाची भेट घेण्याची इच्छा स्वामीजींच्या मनात आली. त्यांची भेट घेण्यासाठी स्वामीजी आपले गुरुबंधू अखंडानंद यांच्यासोबत राजनारायणजींच्या घरी पोहोचले. आधी मिळालेल्या माहितीनुसार या भेटीच्यावेळी बंगाली भाषेतच संभाषण करायचे हे स्वामीजींनी ठरवले होते. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी यादरम्यान राजनारायणजींना 'अधिक चिन्ह' यासाठी बंगाली शब्द पटकन आठवला नाही. परंतु इंग्रजी शब्दाचा वापर न करता त्यांनी ते चिन्ह हाताने करून दाखवले. स्वामीजींनी देखील संपूर्णपणे बंगालीतच आपले बोलणे केले. स्वामीजींनीदेखील स्वभाषेचा पुरस्कार आग्रहाने केला आहे.



                                             ( कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून काढलेले कल्पनाचित्र )

       राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते कै. डॉ. श्रीपती शास्त्री हे मूळचे कर्नाटकमधील होते. ते नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आले. अनेक वर्षे त्यांनी इतिहास विषयाचे प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख म्हणून पुणे विद्यापीठात काम केले. पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांना मराठी भाषा येत नव्हती. याच काळात एकेदिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी ते मुंबईला गेले. सावरकरांना कन्नड भाषा येत नाही हे माहिती असल्याने शास्त्रीजींनी इंग्लिश भाषेतून संवाद सुरू केला. सावरकरांनी त्यांना थांबवले आणि सांगितले की इंग्लिशमधून संवाद नको. मग कन्नड,मराठी या भाषांतून उभयतांचा संवाद झाला. यातून सावरकरांचा स्वभाषेचा आग्रह शास्त्रीजींच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी परिश्रमपूर्वक मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले. मराठी भाषेतही ते आपले विचार चांगल्या पद्धतीने व्यक्त करीत असत.

        स्वभाषेच्या मातृभाषेच्या वापराबाबत ज्यू समाजाचे उदाहरण अनुकरणीय आहे. जवळपास दोन हजार वर्षांच्या संघर्षानंतर १९४८ मध्ये ज्यूंचे इस्त्राइल हे राष्ट्र अस्तित्वात आले. त्यावेळी ज्यूंची 'हिब्रू' भाषा ही मृतप्राय झाली होती.परंतु इस्त्राइलने विशेष प्रयत्न करून आपल्या हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन केले. याच भाषेत आता त्यांचा सर्व व्यवहार होतो. हिब्रू भाषेचा आग्रहपूर्वक वापर करणारा इस्राइल हा विज्ञान,तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर असलेला देश आहे. स्वभाषेच्या पुनरुज्जीवनाचे हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायक आहे.

         महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे ( हेच त्या संस्थेचे नाव आहे.) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेले श्री. विवेक सावंत यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला आहे.मध्यपूर्वेतील एका देशासाठी संगणक प्रणाली विकसनाचे काम त्यांना मिळाले. त्यावेळी त्या देशाने आग्रहपूर्वक त्यांच्या भाषेत सर्व गोष्टी करून घेतल्या. त्यासाठी जादा पैसेदेखील खर्च केले. श्री. सावंत म्हणतात की , " सध्याचे युग हे बाजारपेठेचे युग आहे हे लक्षात घेऊन मराठी माणसांनी आग्रहपूर्वक मराठीचा वापर ग्राहक म्हणून केला तर सर्व सेवा मराठीत मिळवणे शक्य होईल." हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.

        मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, अद्ययावत माहिती मराठीत उपलब्ध व्हावी यासाठी अनेक व्यक्ती , संस्था काम करीत आहेत. त्यातील उल्लेखनीय काम करणारे श्री.अच्युत गोडबोले हे आहेत. संगणक क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर दीर्घकाळ काम केलेले श्री. गोडबोले यांनी अनेक नवनवीन विषयांवर मराठीतून आपले लेखन केले आहे. यातून मराठी ही ज्ञान भाषा होण्याच्या दिशेने पाऊले चालती पुढे पडली आहेत.

         'माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके' असा आत्मविश्वास प्रकट करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा मराठी माणसाने सक्षमपणे पुढे चालवायचा असेल तर त्यासाठी आवश्यक आहे दृढनिश्चय,आत्मविश्वास आणि सराव. या गुणांच्या आग्रहाने आणि जोपासनेनेच आताची परिस्थिती सकारात्मक पद्धतीने बदलू शकेल.

 सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. Well written and excellent Information.
    Additionally , Sanskrit is going to be one of the leading programming language in comming days.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.
      संस्कृत भाषेबद्दल छ. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचाही आग्रह होता.

      Delete
  2. संस्कृत आणि मातृभाषेचे महत्त्व अतिशय उत्कृष्ट सर ..मला नेहमी संस्कृत शिकायची इच्छा होती पण ती माझ्या शाळेत नव्हती.. त्यामुळे अनेक भाषा माहीत असूनही... मला अशिक्षित वाटते

    ReplyDelete
  3. जेवढे महत्त्व आपल्या आयुष्यात आईचे असते तेवढेच महत्त्व मातृभाषेचे असते. ज्याप्रमाणे आईशी बोलताना कोणत्याही गोष्टीबाबत आपल्याला संकोच वाटत नाही त्याचप्रमाणे मातृभाषेत व्यक्त होताना आपल्याला अजिबात अडचण जाणवत नाही. विचार करा आपण आपल्या सुख दुःखाच्या भावना ज्या प्रकारे मराठीत व्यक्त करतो त्या प्रकारे इंग्रजीत व्यक्त करू शकतो का ? अगदी सांगायचे झाले तर या लेखावरची तात्काळ प्रतिक्रिया इंग्रजीमध्ये तरी मी देऊ शकलो असतो का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख