स्वप्रतिमेचे प्रेम

      मध्यंतरी एकदा रस्त्यावरून जाताना एका दुचाकीवरून दोघे जण मोठा आरसा घेऊन जाताना दिसले. मागे बसलेल्या माणसाला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब त्या आरशात दिसत होते. मनात सहज विचार आला की आरशात आपण स्वतःचेच प्रतिबिंब किती वेळ बघू शकतो. मग ग्रीक कथा आठवली ती नार्सीससची. अतिशय देखणा असलेला हा तरुण स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात अखंड बुडाला. तासनतास तो नदीकिनारी राहून स्वच्छ पाण्यामध्ये स्वतःचेच प्रतिबिंब बघत राही. शेवटी तिथेच त्याचा मृत्यू झाला. नदीकिनारी सापडणाऱ्या एका फुलाला नार्सिससचे नाव देण्यात आले आहे. तसेच जी व्यक्ती स्वतःच्याच प्रेमात बुडालेली असते. स्वतःचेच मोठेपण जिला अपरंपार वाटते. तिला मानसशास्त्रीय परिभाषेत 'नार्सीसस सिंड्रोम' असे म्हटले जाते.



( छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

      बऱ्याच वर्षांपूर्वी एका विचारवंतांचे वाक्य वाचनात आले होते, " एकाच वेळी तुमच्यासमोर आरसा आणि एखादी सुंदर व्यक्ती आली तर तुमचे पहिले लक्ष आरशाकडेच जाईल." कारण साधारणपणे माणसाचे स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असते. त्यानंतर मग इतरांवर. याबाबतीत माकडीण आणि तिचे पिल्लू यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. पाणी गळ्यापर्यंत येईतोपर्यंत माकडीण तिच्या पिल्लाला वाचवायचा प्रयत्न करत होती. शेवटी पाणी वरती चढू लागल्यावर ती पिल्लाला खाली घालून त्यावर स्वतः उभी राहिली. 

       काही वेळा ही व्यक्तिची प्रतिमा साहित्यिकांच्या शब्दांतून , कवीच्या काव्यांतून व्यक्त होते आणि व्यक्त करणाऱ्याची भावना जर खूपच तीव्र असेल तर मग गीतरामायणामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी लिहिल्याप्रमाणे 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट' अशी स्थिती निर्माण होते. हे सामर्थ्य साहित्यिकांच्या शब्दांचे असते. इंग्लिश मध्ये यालाच 'image larger than life' असे म्हटले जाते.

        काहीवेळा व्यक्ती स्वतःचाच स्वीकार करू शकत नाहीत असे लक्षात येते. स्वतःची आरशात दिसणारी प्रतिमा त्यांना मान्य नसते. अमेरिकेतील प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सन हा जन्माने आफ्रिकन अमेरिकन होता. त्याला स्वतःच्या कृष्णवर्णाबद्दल अतिशय चीड होती. बालपणीच्या दु:खद अनुभवांमुळे ही वेदना खोलवर गेली होती. पुढे प्रसिद्धीस आल्यानंतर त्याने प्रचंड पैसा खर्च करून स्वतःचा वर्ण बदलवून घेतला. सर्वांनाच हे शक्य नसते. परंतु मग आपापल्या क्षमतेनुसार माणसे प्रयत्न करत राहतात. यातून व्यापाराला चालना मिळते. अंशुमान खुराणा आणि यांनी अभिनय केलेल्या 'बाला' या चित्रपटात अशीच एक कहाणी दाखवलेली आहे. ऐन तारुण्यात टक्कल असलेला तरूण ही वस्तुस्थिती स्वीकारू शकत नाही. ती बदलावी यासाठी खटपट करत राहतो. पण शेवटी त्याच्या वाट्याला दुःख येते. तर काळीसावळी असलेली त्याची मैत्रीण वस्तुस्थिती स्वीकारते आणि आनंदाने आयुष्य जगते.

           काही जणांच्या बाबतीत त्यांना स्वतःच्या चुका किंवा दोष मान्य नसतात. ते स्वतःचे दोष इतरांवर किंवा परिस्थितीवर ढकलत असतात. प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब याचा शेर प्रसिद्ध आहे. 

उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा

धूल चेहरे पे थी और आईना साफ़ करता रहा 

यात अजून एक मुद्दा आहे ते म्हणजे आयुष्याच्या सरतेशेवटी का होईना पण वास्तव स्वीकारले. यातून आयुष्याच्या विफलतेची जाणीव झाल्याचे डोकावते.

      वास्तव परिस्थितीला न स्वीकारणाऱ्या अशा माणसांच्या वाट्याला शेवटी दुःख, अपमान किंवा वेदना येतात.

              काही वेळा माणसाला आपल्याच सामर्थ्याचा विसर पडतो. याबाबत एक छान बोधकथा आहे. सिंहाचा एक छावा चुकून मेंढ्यांच्या कळपामध्ये वाढला. मेंढ्यांच्या सहवासाने त्याला आपणही मेंढीच आहोत असे वाटायला लागले. मोठा झाला तरीही तो त्यांच्यासारखाच बेंबाटत असे. एके दिवशी जंगलातील सिंहाने या कळपावर हल्ला केला. त्यावेळी हा बेंबाटणारा सिंह त्याच्या दृष्टीला पडला. त्यावेळी जंगलातील सिंहाने त्याला पकडून पाणवठ्यावर नेले. आपल्या दोघांचीही प्रतिबिंबे सारखीच आहेत हे दाखवले. मग हा सिंह गर्जना करू लागला. या गोष्टीमध्ये सिंहाच्या छाव्याला दुसऱ्याने त्याच्या स्वत्वाची जाणीव करून दिली. परंतु ग.दि. माडगूळकर यांनी आपल्या गीतामध्ये एक वेगळी गोष्ट सांगितली आहे. बदकांच्या सहवासात राहणारे राजहंसाचे पिल्लू आपण वेगळे दिसतो म्हणून नेहमी दुःखी असे.

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले               भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले                पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक                त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

 गदिमांनी वर्णन केलेला हा स्वशोधाचा प्रवास विलक्षण आहे. जेव्हा स्वतःलाच स्वतःच्या स्वत्वाची जाणीव होते, त्यानंतर आयुष्यामध्ये आमुलाग्र बदल होत जातो. आतापर्यंत ज्या अडचणी वाटत होत्या, जे प्रश्न पडत होते त्या सर्वांचे रूपांतर आता संधीमध्ये होते. स्वतःच्या अस्तित्वाची ही सजग जाणीव काही विशेष गोष्टी घडवून आणते.

       सामान्य माणसे स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असतात. आपली प्रतिमा सदैव त्यांच्या डोळ्यासमोर असते. परंतु असामान्य गोष्ट व्यक्तींची गोष्टच निराळी असते. स्वामी विवेकानंदांच्या अमेरिकन शिष्या कु. एस.ई. वाल्डो (भगिनी हरिदासी) यांनी त्यांची एक आठवण लिहून ठेवली आहे. स्वामीजींना भेटण्यापूर्वी त्यांनी गुरू म्हणून अनेकांचा शोध घेतला होता. पण प्रत्येकात त्यांना काही ना काही कमतरता जाणवली होती. त्यामुळे त्यांचा गुरूचा शोध सुरूच होता. भगिनी हरिदासी जेव्हा स्वामीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी हा माणूस खराच साधू पुरुष आहे ना हे त्या अतिशय निरखून बघत होत्या. एके दिवशी त्यांना लक्षात आले की स्वामीजींना ते राहत असलेल्या घरातील आरशाचे फारच कुतूहल वाटत होते. त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी आरशासमोर उभे राहत स्वतःचे प्रतिबिंब पाहताहेत. मग आरशापासून दूर जाऊन परत येत होते आणि परत स्वतःचे प्रतिबिंब बघत आहेत.  ह्या माणसाबद्दलच्या आपल्या समजुतीच्या भ्रमाचा भोपळा आता फुटला असा विचार त्यांच्या मनात आला. हादेखील एक पोकळ माणूस निघाला असे त्यांना वाटले. अचानक स्वामीजी त्यांच्याकडे वळले आणि ते म्हणाले, " एलन, मी कसा दिसतो हेच माझ्या लक्षात राहत नाही.  बघ ना! ही किती विचित्र गोष्ट आहे. मी परत परत आरशात बघतो परंतु आरशाकडे पाठ वळली की मी कसा दिसतो हे मी विसरून जातो." स्वतःच्या आरशातील प्रतिमेची फिकीर न करता जे कार्यरत राहतात तेच स्वामीजींसारखे असामान्य काम करून दाखवतात.

 सुधीर गाडे, पुणे 

 

Comments

  1. नार्सीसस सिंड्रोम... सुरेख सादरीकरण...

    ReplyDelete
    Replies
    1. सर धन्यवाद.
      जाता येता काही दिसते, सुचते ते लिहीत जातो. तुमची प्रतिक्रिया आनंद आणि उत्साह देत राहते.

      Delete
  2. आत्तापर्यंतच्या वाचनात आलेला एक अतिशय उत्तम ब्लॉग. तसे तर गाडे सरांचे ब्लॉग अनुभवाने समृद्ध,अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि मननीय असे असतात. नारसीस आणि स्वतःची प्रतिमा हा विचार अनेक उदाहरणासह किती उत्तम रित्या सरांनी समजावून सांगितला आहे. धन्यवाद सर.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद डॉक्टर. जाता येता काही दिसते, सुचते ते लिहीत जातो. तुमची प्रतिक्रिया आनंद आणि उत्साह देत राहते.

      Delete
  3. एक वेगळाच विषय सन्दर्भ अणि उदाहरणं अप्रतीम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख