कृतिशील महात्मा : स्वामी विवेकानंद

  " ज्यांचे हृदय दुःखितांच्या वेदनेने कळवळते तोच खरा महात्मा" असे स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. स्वामीजींचे जीवन पाहिले की स्वामीजी हे देखील महात्मा होते असे निःसंशयपणे म्हणता येते.  दिनांक ११ सप्टेंबर १८९३ यादिवशी अमेरिकेत शिकागो येथे सुरू झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी केलेल्या भाषणाने स्वामीजींना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्या रात्री त्यांची निवासाची व्यवस्था शिकागोमधील प्रसिद्ध व्यक्ती श्री.जॉन लेयॉन यांच्या प्रसादतुल्य निवासस्थानी करण्यात आली होती. स्वामीजींची उत्तम बडदास्त त्या घरी ठेवण्यात आली होती. परंतु भारतातील दारिद्र्य आणि उपासमार यांच्या विचारांनी ते रात्रभर झोपू शकले नव्हते. त्यांच्या अश्रूंनी उशी पार भिजून गेली. व्याकुळ होऊन जमिनीवर पडून ढसढसा रडत ते म्हणू लागले, " जगन्माते माझी मातृभूमी कंगाल अवस्थेत असताना हे नाव - यश घेऊन मी काय करू? भारतीय समाजाचे उन्नयन कोण करेल? जगन्माते मी त्यांना कशी मदत करू शकतो, ते दाखवून दे!"

      स्वामीजी केवळ बोलणारे नव्हते तर ' य: क्रियावान स पंडित:' या न्यायाने पंडित होते. अमेरिका व युरोपचा पहिला दौरा करून स्वामीजी भारतात परत आले. कोलंबोपासून ते चेन्नईपर्यंत आणि तेथून जहाजाने आल्यावर कोलकात्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचा विनम्रपणे स्वीकार करत फेब्रुवारी १८९७ च्या अखेरीस स्वामीजी आपली जन्मभूमी कोलकाता येथे पोचले. त्यांचे गुरुबंधू, शिष्य उत्साहाने एकत्रित होऊन  वेगवेगळ्या योजनांची आखणी करू लागले. या दिवसांमधील एक प्रसंग आहे. श्री. गिरीशचंद्र घोष उर्फ जीसी हे श्रीरामकृष्ण परमहंस यांचे गृहस्थी भक्त होते. त्यावेळच्या बंगाली रंगभूमीवरील ते प्रसिद्ध अभिनेते होते. एके दिवशी ते स्वामीजींना भेटायला आले. त्यावेळी स्वामीजी आपले गुरुबंधू आणि शिष्य यांना वेदांत समजावून सांगत होते. स्वामीजींनी विचारले, " जीसीबाबू तुम्ही वेदांत वाचला आहे काय?" त्यावेळी जीसी उत्तरले, " मी तर  श्रीरामकृष्णांचे नामस्मरण करूनच धन्य झालो आहे." जीसीबाबू यांनी पुढे स्वामीजींना आपल्या परिचयातील व्यक्तिंच्या हालअपेष्टांची माहिती सांगितली आणि प्रश्न विचारला, " नरेंद्र, तू वेदांत वाचतो आहेस तर माझ्या प्रश्नांची उत्तर दे.  अशांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा,  त्यांना सुख मिळावे यासाठी तुझा वेदांत काय बरे सांगतो?" जसजसे गिरीशबाबूंचे शब्द स्वामीजींच्या कानावर पडत गेले तसे स्वामीजी भावनाविवश होत गेले. त्यांचे कमलनेत्र पाण्याने भरले. भावनातिरेक असह्य होऊन ते त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यावेळी गिरीशबाबू म्हणाले की , " मी तुमच्या गुरूला मानतो तो केवळ मोठा विद्वान आहे, प्रसिद्ध वक्ता आहे म्हणून नाही ; तर त्याचे   हृदय विशाल आहे त्यामुळे मी त्याला श्रेष्ठ मानतो." गिरीशबाबू थोडावेळ मठात होते. आपला भावनावेग आवरून स्वामीजी परत आपल्या शिष्यांपाशी आले आणि ते त्यांच्याशी सेवाश्रमाबाबतच्या योजनेसाठी चर्चा करू लागले. गिरीशबाबू म्हणाले त्याचे उपस्थितांना लगेच प्रत्यंतर  आले.


( छायाचित्र बेलूर मठाच्या वेबसाइटवरून साभार )

      १८९९ मध्ये कोलकात्यामध्ये प्लेगने थैमान घातले. स्वामीजींनी आपले गुरुबंधू, शिष्य या सर्वांना आज्ञा केली, " आता ग्रंथांचे वाचन, वेदाभ्यास पुरे झाला. माणसांच्या सेवेसाठी बाहेर पडूया." आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र घेऊन स्वामीजींनी प्लेगमध्ये त्रस्त झालेल्या लोकांच्या सेवेची योजना तयार केली. त्यांना औषधपाणी, अन्न मिळावे यासाठी ते स्वतः वस्त्यांमध्ये हिंडू लागले. त्यांची सेवा करू लागले. या सेवेसाठी पैसे कमी पडू लागले त्यावेळी स्वामीजी म्हणाले, " आपल्याला मठ उभारायचा आहे त्यासाठी जी जमीन विकत घेतली आहे ती आपण विकून टाकू. त्या पैशातून आपण आवश्यक ते सेवाकार्य करू. आपण तर संन्यासी आहोत. आपण कुठेही झाडाखाली राहू शकतो." परंतु स्वामीजींच्या पाश्चात्य शिष्यांनी स्वामीजींना सेवाकार्यासाठी आवश्यक ते धन उपलब्ध करून दिले. त्यामुळे मठाची जमीन विकण्याची वेळ आली नाही.

     याच सुमारास बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी स्वामीजींनी आपले गुरुबंधू अखंडानंद यांना त्या जिल्ह्यातील महुला येथेच राहून सेवकार्य करण्यास सांगितले. त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व खटपट ते करू लागले. त्या ठिकाणी अनाथ मुलांसाठी वसतिगृह उभारावे यासाठी महाबोधी सोसायटीने देणगी देऊ केली. त्या बदल्यात महाबोधी सोसायटीचे नाव लावावे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना कळवले की , "  आपल्याला नावाची नावलौकिकाची अपेक्षा नाही. आपले सेवेचे काम पुढे गेले पाहिजे." त्याप्रमाणे महाबोधी सोसायटीचे नाव दिले गेले आणि वसतिगृहाचे काम पुढे गेले.

   याच सुमारास स्वामीजींना त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या 'हितवादी' या नियतकालिकाचे संपादक पंडित सखाराम गणेश देऊस्कर हे आपल्या दोन मित्रांसह भेटायला आले होते. स्वामीजींकडून आपल्याला काही आध्यात्मिक उपदेश मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु स्वामीजींनी मात्र या आपत्तीत माणसांना मदत कशी करता येईल याबाबतच चर्चा केली. निघताना आध्यात्मिक उपदेश न मिळाल्याबद्दल देऊस्करांच्या मित्राने आपली निराशा व्यक्त केली. त्यावेळी स्वामीजी उद्गारले की, " जोपर्यंत माझ्या मातृभूमीतील कुत्रादेखील उपाशी आहे तोपर्यंत सर्वांबरोबरच त्याचेही पोट भरावे यासाठी खटपट करणे हेच माझा धार्मिक कर्तव्य आहे." स्वामीजींचे हे उत्तर आपल्यालाही मार्गदर्शक आहे.

    जनसेवेची ही प्रेरणा स्वामीजींच्या मनात त्यांचे गुरु श्रीरामकृष्ण यांच्या उपदेशाने निर्माण झाली होती. श्रीरामकृष्ण जीवित असताना एके दिवशी त्यांच्या शिष्यांमध्ये चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, " दुःखितांची सेवा करून आपण त्यांच्यावर उपकार करतो." हे शब्द कानावर पडताच, " श्रीरामकृष्ण म्हणाले तुम्ही कोण त्यांच्यावर उपकार करणारे? हे दु:खित लोक तर साक्षात भगवंताचा अंश आहेत. त्यांनी आपल्या सेवेची संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली याबद्दल तुम्हीच कृतज्ञ असले पाहिजे." श्रीरामकृष्णांचे हे उद्गार ऐकताच नरेंद्र (विवेकानंद) म्हणाले, " आज गुरूंमुळे नवा ज्ञानप्रकाश दिसला." आपल्या गुरूंचा उपदेश पुढे स्वामीजींनी 'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' या शब्दात व्यक्त केला. 

    लोकसेवेच्या बाबतीत स्वामीजी म्हणतात, " जोपर्यंत या भूमीत लक्षावधी बांधव दारिद्र्य आणि अवहेलना यात खितपत पडले आहेत तोपर्यंत जे समाजबांधवाच्या पैशातून शिक्षित होऊन दु:खितांकडे मुळीच लक्ष देत नाहीत ते समाजद्रोही आहेत." चपराक मारावी असे हे स्वामीजींचे शब्द आहेत. यातून त्यांची तळमळच दिसून येते. तीच मार्गदर्शक आहे.

   रामकृष्ण मठाची मे १८९७ मध्ये स्थापना केल्यावर स्वामीजींनी त्याचे बोधवाक्य निश्चित केले ते म्हणजे, 'आत्मनो मोक्षार्थं जगद्हितायच'. ही एक मोठी शिकवणच सर्वांना मिळाली आहे. रामकृष्ण मठाच्या वेगवेगळ्या शाखांमधून याच उक्तीचे विविध सेवाकार्यांद्वारे स्वामीजींनी कृतीमध्ये रूपांतर केले. आजदेखील ते अव्याहतपणे चालू आहे. मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे.

 स्वामीजींच्या जीवनातील असे आणखी प्रसंग सांगता येतील. या सर्व प्रसंगात त्यांच्या मुखातून निघालेल्या प्रेरक वाणीतून आणि त्यांनी केलेल्या कृतीतून त्यांचे 'महात्मा' हे रूप ठळकपणे दिसून येते. ते आपणा सर्वांना सदैव स्फूर्ती देत राहील. या महात्म्याला विनम्र अभिवादन!

( प्रसिद्धी विश्व संवाद केंद्र पुणे फेसबुक पेज)

सुधीर गाडे पुणे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख