छ.शिवराय : ध्येयासाठी भावनांची कठोरता
'भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी ' अशी बा.सी.मर्ढेकर यांच्या एका कवितेतील ओळ आहे. बऱ्याच वेळा माणसांच्या निर्णयावर भावनांचा प्रभाव दिसून येतो. विशेषतः आप्तस्वकीयांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीत तर विशेषत्वाने भावनाशीलता दिसून येते. ती भावनाविवशता देखील ठरते. परंतु छ.शिवराय वेळ प्रसंगी भावनांवर कठोर नियंत्रण ठेवत असत असे म्हणता येते.
२५ जुलै १६४८ यादिवशी विजापूरच्या दरबारी मंडळींनी शाहजीराजे बेसावध आहेत असे पाहून त्यांना कैदेत टाकले. शाहजीराजांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू झाले. शहाजीराजांच्या मुक्ततेसाठी शिवाजी महाराजांनी शाहजहान याला पत्र लिहून आपले वडील व आपण स्वतः मुघलांचे सेवक होऊन त्यांच्या वतीने दख्खनचा कारभार बघायला तयार आहोत अशा आशयाचे पत्र पाठवले आणि याबाबतचे फर्मान मिळवले. शाहजहानच्या दबावामुळे आदिलशाहने १६ मे १६४९ यादिवशी शाहजीराजांची सुटका केली. वाटाघाटींच्या पुढील टप्प्यात शहाजी राजांच्या मुक्ततेसाठी एकूण तीन किल्ले त्यांच्या दोन मुलांनी म्हणजेच संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांनी विजापूरच्या आदिलशाहला परत द्यावेत असे ठरले. संभाजीराजांनी बंगळूर आणि कंदर्पी हे दोन किल्ले देऊन टाकले. परंतु स्वराज्याच्या उभारणीसाठीचा संघर्ष नुकताच सुरू झाला होता. या संघर्षात कोंडाणा हा महत्त्वाचा किल्ला शिवरायांनी नुकताच मिळवला होता. आपल्या वडिलांच्या मुक्ततेसाठी तो किल्ला दिला तर त्याचा आघात आपल्या स्वराज्यप्राप्तीच्या प्रयत्नांवर होईल म्हणून महाराज तो किल्ला द्यायला तयार नव्हते. शेवटी ज्येष्ठ सोनोपंत डबीर यांनी महाराजांची समजूत घातली. किल्ला दिला तर भविष्यात तो परत जिंकून घेऊ शकता येईल. परंतु पितृछत्राचे मोल त्यापेक्षा मोठे आहे अशा रीतीने बोलणे झाले. त्यानंतरच महाराजांनी कोंडाणा आदिलशाहला दिला. शिवरायांचे विलक्षण चातुर्य याप्रसंगी दिसून येते.
शाहजीराजांच्या जहागिरीतील सुपे परगणा त्यांनी आपली पत्नी तुकाबाई यांचे बंधू संभाजी मोहिते यांच्या ताब्यात दिला होता. मोहिते व भोसले घराण्यात पिढ्यांचे सोयरसंबंध होते. संभाजी मोहिते यांची मुलगी अण्णूबाई हिचा विवाह व्यंकोजीराजे यांच्याशी तर मोहिते घराण्यातीलच सोयराबाई यांचा विवाह शिवरायांशी झाला होता. नात्याने संभाजी मोहिते शिवरायांचे मामा तसेच सासरे होते. परंतु संभाजी मोहिते यांचा कारभार पारदर्शक नव्हता. आपल्या रयतेकडून लाच खाऊन एकाचे वतन दुसऱ्याला देणे असे प्रकार होत होते. त्यामुळे शिवरायांनी सुरुवातीला संभाजी मोहिते यांना पत्र लिहून त्यांना समजावून सांगितले. परंतु तो प्रयत्न सफल झाला नाही. नंतर शिवराय स्वतः सैन्य घेऊन सुप्याला गेले. छापा मारून २४ सप्टेंबर १६५६ या दिवशी त्यांनी संभाजी मोहिते यांच्याकडून कारभार काढून घेतला आणि स्वतः लक्ष घालून तिथल्या कारभारात शिस्त आणली. महाराजांनी सुप्याचा ताबा स्वराज्यातील दुसऱ्या लोकांकडे दिला व संभाजी मोहित्यांनी ज्यांच्यावर अन्याय केला होता त्यांच्यासाठी चारच दिवसांनी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी गोतसभा भरवून त्यांना योग्य तो न्याय दिला.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी केलेल्या तहानंतर शिवरायांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे जावे लागले. त्यावेळी दरबारात जाणून बुजून त्यांचा अपमान केला गेला. स्वाभिमानी शिवराय तो अपमान सहन करू शकले नाहीत. त्यामुळे भर दरबारात ते कडाडले. ही संधी साधून औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकले. या कडेकोट बंदोबस्तातून १७ ऑगस्ट १६६६ यादिवशी महाराज आपल्या सर्व सहकाऱ्यांसह शिताफीने निसटले. औरंगजेब आपला शोध चालू ठेवणार हे चाणाक्ष महाराजांनी जाणले होतेच. त्यामुळे संशय येऊ नये म्हणून त्यांनी शंभूराजांना मथुरेतच ठेवले. स्वतः वेषांतर करून स्वराज्याचा सुखरूप पोहोचले. शत्रूलादेखील संशय येऊ नये म्हणून शंभूराजांचे निधन झाले अशी आवई उठवली. त्यांचे दिवसदेखील घातले. काही महिन्यानंतर शांतता झाल्यावर शंभूराजे सुखरूपपणे स्वराज्यात दाखल झाले. जिवंत असणाऱ्या आपल्या मुलाचे निधन झाल्याचे झाल्याची बातमी पसरवणे हे किती दुःखदायक असेल याची फक्त कल्पनाच करता येऊ शकेल.
आपल्या स्वराज्याची घडी बसवण्यासाठी शिवरायांनी महसुली कारभारामध्ये अनेक सुधारणा केल्या. तशा वतनदारी पद्धतीतही सुधारणा केल्या. शक्यतो नव्याने कुणाला वतन द्यायचे त्यांनी टाळले. शिवरायांची मुलगी राजकुंवरबाई यांचा विवाह पिलाजीराव राजेशिर्के यांचे पुत्र गणोजी यांच्याशी झाला. तर पिलाजीराव यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई यांचा विवाह संभाजीराजांशी झाला. अशी ही दुहेरी सोयरीक झाली. पिलाजीरावांनी आदिलशाहीतील आपले वतन स्वराज्यात सामील केले होते आणि ते स्वराज्याचे शिलेदार झाले होते. या विवाहसंबंधांच्या वेळी पिलाजीराव शिर्के यांनी महाराजांकडे आपले वतन परत मिळावे अशी मागणी केली. परंतु हिंदवी स्वराज्याचे नियम हे महाराजांना जास्त महत्त्वाचे होते. ते पाळायचे तर सोयरे दुखावतात हे लक्षात घेऊन महाराजांनी पिलाजीराव शिर्के यांना शब्द दिला की राजकुंवरबाई यांना जेव्हा मुलगा होईल त्यावेळी आपण वतन देऊ. हा विवाह झाला त्यावेळी राजकुंवरबाई वयाने लहान होत्या. हे लक्षात घेतले की शिवरायांनी वतन देण्याची गोष्ट अनेक वर्षे पुढे ढकलली हे समजते. अशा प्रकारची चतुराई दाखवून शिवरायांनी स्वराज्याच्या नियमांचे पालन केले.
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा । गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥
सत्ता, अधिकार हाती असणाऱ्यांनी अशाच प्रकारे भावना कठोर करून कर्तव्यांचे पालन करणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा कारभारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कर्तव्यासाठी भावना कठोर करणे याविषयी छ.शिवरायांचा आदर्श हा सर्वकाळ महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे.
सुधीर गाडे पुणे
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा । गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥ तंतोतंत महाराजची कारकिर्द दर्शवत..... सुरेख सादरीकरण सर🙏
ReplyDeleteसर, धन्यवाद!
Deleteभारतीय लोकशाहीचे हे एक मोठे दुर्दैव आहे की शिवरायांसारखे भावनेहुनी कर्तव्य थोर असे कृतिशील राजकारणी खूप म्हणजे खूपच दुर्मिळ झाले आहेत.
ReplyDeleteहोय डॉक्टर
Delete