छ.शिवराय : स्वामिनिष्ठांचा प्रामाणिकपणा
छ. शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी उभी केलेली स्वामिनिष्ठांची मांदियाळी. स्वराज्याच्या कामासाठी सर्व प्रकारचा त्याग करायला तयार असणारे हजारो लोक त्यांनी उभे केले. यामध्ये " आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे" असे म्हणणारे तानाजी मालुसरे आहेत. " तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे आहेत. ' मातेस्तव धडही लढते संग्रामात ' असं ज्यांच्या आवेशाचं वर्णन केलं जातं ते मुरार बाजी देशपांडे आहेत. महाराजांच्या आज्ञेसरशी आखाड्यात उतरून पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेऊन त्याला लोळवणारे येसाजी कंक आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. अशी कणखर मनाची माणसे शिवरायांनी उभी केली. त्यांच्याबद्दल म्हणता येईल की, ' कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणे".
( छायाचित्र सौजन्य अपूर्व सुरवसे )
या सगळ्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा पराक्रम, कर्तृत्व ते शिवरायांना सांगायचेच पण प्रसंगी आपल्या चुकादेखील सांगायचे. हा प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे महत्त्व समजण्यासाठी त्याच काळातील एक प्रसंग पाहूया.
औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला. पुण्यात लाल महालात तो ठाण मांडून बसला. बरोबरीचे मोगल सरदार स्वराज्यातील गडकोट जिंकायचा प्रयत्न करत होते. पण मावळे तिखट प्रतिकार करत होते. त्यामुळे विजय मिळत नव्हता. अशावेळी छोट्यामोठ्या चकमकीतील विजयाच्या बातम्या तिखटमीठ लावून औरंगजेबाला कळवण्यात येत. काही वेळा खोट्या बातम्यादेखील कळवल्या जात असत. शाहिस्तेखानासोबत त्याचे दोन जावई नामदारखान आणि कामदारखान हेदेखील होते. एके दिवशी कामदारखान शाहिस्तेखानाला आवेशाने म्हणाला , " मी मोठी फौज घेऊन जातो आणि किल्ले जिंकून घेतो." शाहिस्तेखानाने त्याला समजावले , " इथे जास्त पराक्रम दाखवायचा नाही. कारण इथे पराक्रम दाखवला तर औरंगजेब आपल्याला काबूल कंदाहारच्या भागात पाठवेल. तिथल्या खडतर परिस्थितीमुळे आपल्याला त्रास होईल." कामदारखानाला हा सल्ला मानावाच लागला. असे अप्रामाणिक सेनापती असल्यावर परिमाण काय होणार हे उघड आहे.
आपल्या सरदार, अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवण्यासाठी औरंगजेबाने ठिकठिकाणी अखबारनवीसांची नेमणूक केली होती. पण त्यांच्याकडून खरी माहिती मिळेलच याची खात्री नसल्याने काही जणांची गुप्तपणे अखबारनवीस म्हणून नेमणूक केली होती.
या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या सेनापतींचा प्रामाणिकपणा ठळकपणे दिसून येतो. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काही महिने आधी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी तावडीत सापडलेल्या बहलोलखानाची दया येऊन तह केला आणि त्याला सोडून दिले. पण त्यांनी ते महाराजांना कळवले. यावर महाराजांचा, " सला काय निमित्त केला?" हा प्रश्न मनाला जिव्हारी लागला. याच अस्वस्थतेतून महाशिवरात्रीच्या दिवशी ' वेडात मराठे वीर दौडले सात ' आणि नेसरीच्या जवळ त्यांना वीरमरण आले.
सिद्दीला पायबंद घालण्यासाठी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यापैकी एका प्रयत्नात स्वराज्याचे मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे आणि लायपाटील यांनी मिळून प्रयत्न करायचा ठरले. ठरल्याप्रमाणे लायपाटील यांनी जंजिऱ्याला शिड्या लावल्या. पण मोरोपंत ठरल्या वेळेवर पोचले नाहीत म्हणून शिड्या काढून लायपाटील यांनी मोहिम सोडून दिली. पण मोरोपंतांनी सर्व घटना महाराजांना सांगून लायपाटील यांचा पराक्रम सांगितला. महाराजांनी लायपाटील यांना सरपाटील अशी पदवी दिली आणि त्यांना एक जहाज देऊन त्याचे नाव 'पालखी' ठेवले. म्हणजे वेगळ्या पद्धतीने महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला. हे केल्यानंतर काही दिवसांनी ' कोताई केलीत. कार्य राहून गेले." अशा शब्दांत मोरोपंतांची कानउघाडणी केली.
पराक्रमाबरोबर चुकांचीही माहिती देणारे प्रामाणिक सेनापती, मावळे तयार केल्यामुळे छ. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे ध्येय प्रत्यक्षात आणू शकले. सर्व काळातील राज्यकर्त्यांना अशा प्रामाणिक सहकार्याची आवश्यकता असते.
सुधीर गाडे पुणे
तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" भक्ती आणि शक्तीचे जवलत ऊदाहरण.... 🙏🙏
ReplyDelete🙏🙏
Delete