छ.शिवराय : व्यापाराबाबतची दूरदृष्टी
मध्ययुगीन काळात शेती व व्यापारावरील कर हेच महसुलाचे मुख्य साधन होते. यासाठी व्यापारी , सावकार यांचे राज्यकर्त्यांना महत्त्व वाटत असे. याबाबत शिवाजी महाराजांचे धोरण काय होते हे काही उदाहरणांवरून लक्षात येते.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी इंग्रजांनी केलेल्या आतताईपणामुळे इंग्रजांचा एकूण दृष्टिकोन, व्यवहार शिवरायांनी चांगलाच ओळखला होता ते ओळखून त्यांच्याशी ते व्यवहार करत होते. याचेच एक विलक्षण उदाहरण आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी इंग्रजांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांबे विकत घेतले. आता व्यवहार पूर्ण करायचा तर याचे पैसे द्यायला हवेत. परंतु रायगडावर सद्यस्थितीत रोख रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे तुम्हाला गोवळकोंड्याची हुंडी देतो. ती तेथे जाऊन वटवा आणि पैसे घ्या असे महाराजांनी सांगितले. हुंडी घेऊन इंग्रजांचा माणूस रायगडावरवरून निघाला आणि मुंबईला पोचला. त्या काळात प्रवासाची साधने म्हणजे घोडा , पालखी इत्यादी असल्यामुळे एकूण प्रवासाला खूप वेळ लागत असे. इंग्रजांच्या त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे सर्व कारभार सुरतेहून चालत असे. म्हणून मुंबईचा इंग्रज अधिकारी जेरॉल्ड ॲंजिअर याने ती हुंडी सुरतेला पाठवली. तिथून मजल दरमजल करीत इंग्रज माणूस गोवळकोंड्याला पोचला. तेथे शिवरायांच्या कचेरीत गेल्यावर तेथील माणसांनी सांगितले की एवढी मोठी रक्कम देण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. ते अधिकार प्रल्हाद निराजी यांच्याकडे आहेत परंतु ते रायगडावर गेले असल्याने वाट पहावी लागेल. ते परत कधी येतील हे सांगता येणार नाही काही दिवस वाट पाहून तो इंग्रज परत सुरतेला आला. सुरतेच्या अधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार मुंबईला कळवला. ॲंजिअरने नारायण शेणवी या दुभाषाला रायगडावरून रक्कम घेऊन ये म्हणून पाठवले. तो रायगडावर पोचला. परंतु त्यावेळी महाराज गडावर नव्हते. शेणवीने काही दिवस वाट पाहून स्वराज्याचे मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांची भेट घेतली. तेव्हा रायगडावर रोख रक्कम नाही म्हणून हुंडी दिली आहे. परंतु तुम्ही आता आला आहात तर या व्यवहाराची रक्कम नारळ, सुपारी, तांदूळ यांच्या रूपात अलिबाग येथील आगारातून घ्या असे त्यांनी सांगितले. हा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने शेणवी परत मुंबईला आला. तेव्हा या वस्तूंच्या स्वरूपात रक्कम वळती करून घेण्यातील जोखीम लक्षात घेऊन परत रोख रकमेचा आग्रह करण्यासाठी ॲंजिअरने शेणवी आणि इंग्रज अधिकारी फ्रान्सिस मॉलिव्हेरर याला रायगडावर पाठवले. महाराज रायगडावर आले होते. परंतु महाराजांच्या कार्यबाहुल्यामुळे सुमारे महिनाभरानंतर महाराजांची भेट त्यांना मिळाली. महाराज त्यांना म्हणाले, " रोख रक्कम नाही हीच तर अडचण आहे. त्या बदल्यात तुम्ही सोने किंवा चांदी घेऊ शकता. काय हवे आहे ते सांगा." पण हे ठरवण्याचे अधिकार दोघांकडेही नव्हते. त्यामुळे मॉलिव्हेरर त्याच ठिकाणी थांबला आणि शेणवी मुंबईला परत आला. काही दिवसांनी मॉलिव्हेररदेखील रिकाम्या हाताने परत आला. त्याने लिहिले आहे की, "मला पोकळ आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही." आता ॲंजिअरने, " सोने किंवा चांदी जे मिळेल ते घ्या असे सांगितले." सोने किंवा चांदी घेण्यासाठी म्हणून हे दोघे परत रायगडावर गेले. महाराजांची भेट काही दिवसानंतर मिळाली आणि रकमेच्या बदल्यात चांदी द्या असे त्यांनी सांगितले. महाराजांनी याबद्दलची आज्ञा मोरोपंतांना केली. प्रत्यक्ष चांदी घेण्याच्या वेळी मोरोपंतांनी सांगितले की रायगडावर चांदीची किंमत २८ रुपये शेर आहे. त्यावेळी या दोघांच्या लक्षात आले की अन्य ठिकाणी चांदी २३ रुपये शेर आहे. परंतु मोरोपंत रायगडावर हाच भाव आहे यावर ठाम राहिले. आता अजून वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी २८ रुपये शेर हा भाव मान्य केला आणि चांदी घेऊन मुंबईला परत आले. ॲंजिअरने याचा अहवाल कंपनीला सादर केला आणि त्यात त्याने लिहिले , "सुमारे दीड वर्षानंतर खूप खटपट करून पैसे मिळाले. पण या व्यवहारात २२.५० टक्के तोटा झाला आहे." 'खटासी व्हावे खट ' या उक्तीप्रमाणे इंग्रजांना धडा शिकवणारा महापुरुष शिवरायांच्या रूपाने भेटला.
स्वराज्यातील व्यापारासंबंधाने महाराजांचे काय धोरण होते ते त्यांच्या एका पत्रामुळे लक्षात येते. गोव्याच्या उत्तर भागाला बारदेश म्हणत. तिथून पोर्तुगीज बारीक मीठ कमी भावाने स्वराज्यातील व्यापाऱ्यांना विकत असत. तुलनेने स्वराज्यात तयार होणारे खडे मीठ महाग झाले. त्यामुळे त्याला मागणी कमी झाली. हे लक्षात आल्यावर महाराजांनी कुडाळचा सरसुभेदार नरहरी आनंदराव याला ७ डिसेंबर १६७१ ला पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की बारदेशातून येणाऱ्या मिठावर जबर कर बसवा म्हणजे ते स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठापेक्षा महाग झाले पाहिजे. ते मीठ महाग झाले तर स्वराज्यातील मिठाच्या व्यापाऱ्यांचा फायदा होईल म्हणजे स्वराज्याचा फायदा होईल. असा कर वाढवूनही जर व्यापारी बारदेशातून मीठ घेणे चालू ठेवतील तर जकातीचे उत्पन्न वाढेल व महसूल वाढेल.
या घटनांतून स्वराज्यातील व्यापार, सावकार यांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण लक्षात येते आणि महाराजांच्या या पत्रातील ' साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा ' या वाक्याचे मर्म लक्षात येते. व्यापारातून मिळणारा महसूल लक्षात घेऊन महाराजांनी व्यापारी पेठा वसवल्या.
महाराजांनंतरच्या काळात अमेरिका, युरोप , चीन अशा अनेक देशांनीदेखील आपल्या देशातील माल व व्यापाराचे संरक्षण करणे या धोरणाचा अवलंब केल्याचे दिसून येते. जागतिकीकरणाच्या या काळात भारतदेखील या धोरणाचा अवलंब करत आहे. याबाबतचे एक सध्याचे उदाहरण पाहूया. वर्ष २०२२-२३ भारताने चीनला १५.३ अब्ज डॉलर्सची निर्यात केली तर चीनकडून झालेली आयात ९८.५ अब्ज डॉलर्सची होती. म्हणजे त्यावर्षी ८३.२ अब्ज डॉलर इतकी तूट आली. चीन पद्धतशीरपणे त्यांचा माल विकला जावा म्हणून उत्पादन खर्चापेक्षाही अतिशय स्वस्तात विक्री करतो. यामुळे भारतीय लोकांचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेड रेमिडीज याबाबतचा अभ्यास आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अशा वस्तूंवर ॲंटी डंपिंग ड्यूटी लावतात. अगदी २० दिवसांपूर्वीच चीनमधून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर हा कर लावण्यात आला.
या सगळ्यातून महाराजांचे द्रष्टेपण दिसून येते. स्वराज्य आणि सुराज्य यासाठी हे उदाहरण सदैव अनुकरणीय आहे.
सुधीर गाडे पुणे
संदर्भ कै. निनाद बेडेकर, डॉ. केदार फाळके यांची भाषणे
स्वराज्य आणि सुराज्य ऊतम रीत्या समजले सर..... 🙏🙏
ReplyDelete🙏🙏
Deleteस्वराज्यात व्यापार उद्योग वाढावा व त्यायोगे स्वराज्याची भरभराट व्हावी या उद्देशाने आमच्या पूर्वजांना शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारी नंतर स्वराज्यात घेऊन आले.
ReplyDeleteहोय डॉक्टर.
Delete