छ.शिवराय : स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आग्रह

      " स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे." हे वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. या वाक्यामागची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांनी आपल्या आचरणांनी उदाहरणाने आणि कर्तृत्वाने ही प्रतिष्ठा जपल्याचे आपल्याला लक्षात येते. आपल्या दुर्दैवाने महाराजांची अतिशय मोजकीच पत्रे उपलब्ध होऊ शकली आहेत. त्यातील सर्वात पहिले पत्र सापडले आहे ते म्हणजे २८ जानेवारी १६४६ चे. त्यावेळी महाराजांनी वयाची सोळा वर्षेदेखील पूर्ण केलेली नव्हती. पुणे परगण्यातील रांझेगावच्या बाबाजी भिकाजी गुजर या पाटलाने बदअंमल केला.( म्हणजे व्यभिचार केला.) हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजले तेव्हा त्यांनी त्याला पकडून आपल्यासमोर हजर केले आणि त्याचे दोन्ही दोन्ही पाय तोडण्याची शिक्षा दिली. महाराजांनी केलेल्या शिक्षेची बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर काही काळाने मोसे खोऱ्याचा कुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने देखील बदअंमल केल्याचे उघडकीस आले. आता आपल्यालादेखील अशीच शिक्षा होणार हे लक्षात घेऊन रंगो त्रिमल मोऱ्यांच्या जावळीत पळून गेला. तिथेदेखील त्याला आपल्या जीवाची शाश्वती वाटत नव्हती. एके दिवशी तो भीतीनेच मेला असे तत्कालीन कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे.

    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

         राज्याभिषेकानंतर साधारण दोन वर्षांनी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटक स्वारीवर ( आजचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू) निघाले. वाटेत आजच्या कर्नाटकातील हुबळीजवळील यादवाड गावाशेजारी असणार्‍या बेलवडी गावातील देसाई हा महाराजांच्या फौजेवर छापा मारून त्रास देऊ लागला लागला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी या देसायाच्या गढीवर महाराजांनी आपली एक तुकडी पाठवली. महाराजांचा सकुजी गायकवाड नावाचा सरदार या तुकडीचा प्रमुख होता. देसायाने अनेक दिवस गढी लढवली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याची पत्नी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई हिनेदेखील अतिशय चिवट प्रतिकार केला. परंतु शेवटी त्या गढीवर मराठ्यांनी विजय मिळवला. विजयाच्या उन्मादात म्हणा की अन्य कोणत्या कारणाने सकुजीने सावित्रीबाईशी 'बदसलुख केला'. ही बाब महाराजांपर्यंत पोचल्यावर महाराजांनी चौकशी केली. त्यामध्ये सकुजी दोषी आढळला. त्यानंतर महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढण्याची शिक्षा दिली आणि त्याला पन्हाळगडावर अंधार कोठडीत डांबण्याची शिक्षा केली. सावित्रीबाईंनी महाराजांना आपला भाऊ मानले. या प्रसंगाची आठवण म्हणून  तिच्या छोट्या मुलाला मांडीवर घेऊन महाराज बसले आहेत असे दगडी शिल्प तिने कोरले. त्याचबरोबर महाराज घोड्यावर स्वार झाले आहेत असेदेखील एक दगडी शिल्प तिने करून घेतले.

           रांझ्याच्या पाटलाला केलेली शिक्षा ते दक्षिण दिग्विजयात केलेली शिक्षा यामध्ये महाराजांच्या भूमिकेमध्ये सातत्य दिसून येते. यातील अजून एक मुद्दा म्हणजे रांझ्याच्या पाटलाने महाराजांना शिक्षा करण्याचा कोणता अधिकार नाही अशी भूमिका घेतली होती. म्हणजे वेगळ्या शब्दात तो महाराजांचा विरोधक होता. त्याला महाराजांनी शिक्षा केलीच परंतु सकुजी हा तर त्यांचा सरदार होता. परंतु त्यालादेखील शिक्षा करण्यात महाराजांनी कसूर केली नाही. आजच्या भाषेत त्यांनी 'आपल्या' माणसालाच शिक्षा केली. दुर्दैवाने आज स्त्री अत्याचाराची घटना घडल्यानंतर ती स्त्री , आरोपी यांची जात, धर्म ,गट , पक्ष इत्यादी बघून भूमिका घेण्याच्या काही घटना दिसून येतात. असे दिसते की 'आपल्या माणसाची चूक नाही' असे म्हणण्याची काही जणांची भूमिका आहे. हे अतिशय घातक आहे. अत्याचार हा कोणत्याही स्त्रीवरील असो तो निंदनीयच आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

        महाराजांच्या आयुष्यातील या घटना सदैव प्रेरक आहेत. सध्याची स्थिती बघता महाराजांची ही कृती आपण आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. सन २०२२ मध्ये भारतात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण ४,४५,२५६ इतक्या घटना समोर आल्या. त्यापैकी ७५.८% घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी बलात्कार अथवा लैंगिक छळाचे ३१५१६ इतके गुन्हे दाखल आहेत. ही अतिशय दुःख देणारी परिस्थिती आहे. महिलावर होणाऱ्या अत्याचारांना कठोर शासन लवकरात लवकर झाले पाहिजे.  काहीजणांना असे वाटते की काही तरुण मुली कमी कपड्यात वावरतात आणि त्यातून पुरुषी अत्याचाराला वाव मिळतो किंवा पुरुष उद्दीपित होऊन असे अत्याचार करतात. परंतु घडलेल्या घटनांच्या नोंदीच्या विश्लेषणातून असे लक्षात येते की नातेवाईक, परिचित, शेजारी पुरुषांनीच लहान मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तसेच सन २०२२ ची आकडेवारी पाहिली तर सर्व काही महिन्यांच्या तान्ह्या मुलींपासून ते ६० वर्षे वयावरील स्त्रियांवरदेखील अत्याचार झाले आहेत. त्यामुळे हे अत्याचार बंद व्हायचे असतील तर दोन प्रकारे काम केले गेले पाहिजे. 

     या संदर्भात पहिला मुद्दा शिक्षा होण्याचा. काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्याचे अधिकारी म्हणून ज्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय कामगिरी केली अशा लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांची भेट झाली. त्यावेळी ते म्हणालेले एक वाक्य माझ्या चांगल्या स्मरणात आहे. ते म्हणजे, "It is not the severity but certainty of the punishment, which controls the crime.' म्हणजे प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशी कार्यक्षम यंत्रणा उभी केली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. तसेच गुन्हा घडल्यानंतर प्रत्यक्ष शिक्षा होणे यात दीर्घ कालावधी जातो. त्यामुळे असे म्हटले जाते की , ' Justice delayed is justice denied.' ही परिस्थिती सुधारण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजे.

      यातील दुसरा मुद्दा पुरुषी वर्चस्ववादी मनोवृत्तीचा आहे. महाराजांवर राजमाता जिजाबाईसाहेबांचे उत्तम संस्कार होते. त्यातून स्त्री प्रतिष्ठेचा त्यांनी आग्रह धरल्याचे दिसून येते. स्त्रियांवरच्या अत्याचारांमध्ये पुरुषी वर्चस्ववादी मनोभूमिका हेच सर्वांचे मूळ कारण आहे असे मला वाटते. मनावरील दीर्घ काळचा हा पुरुषी वर्चस्ववादी पगडा पुसून टाकण्यासाठी कुटुंबामध्ये विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये अडथळा ठरणारी एक गोष्ट म्हणजे चित्रपट मालिका, जाहिराती यातून कळत नकळतपणे पुरुषी वर्चस्ववादी भूमिकेला खतपाणी घातले जाते. मग चित्रपटात गीत येते, ' तू हा कर या ना कर तू है मेरी किरण'. विविध उत्पादनांच्या जाहिराती बघितल्यानंतर त्यामध्ये स्त्रियांचे चित्रण प्रलोभनाच्या किंवा उत्तेजना देण्याच्या पद्धतीने केले जाते. दुःखाची बाब ही की पुरुषी वर्चस्ववादी भूमिका काही स्त्रियांनादेखील मान्य असल्याचे अनुभव येतात. त्यामुळे राजमाता जिजाबाईसाहेबांचा आदर्श आपण सर्वांनीच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यातूनच निर्माण झालेल्या युगपुरुष छत्रपती शिवरायांची स्त्री सन्मानाची भूमिका तंतोतंत अमलात आणण्यासाठी खूप मोठी खटपट केली पाहिजे. यातून परिस्थिती निश्चितच बदलू शकेल असे मला वाटते.

 सुधीर गाडे,  पुणे

    

Comments

  1. स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे... महाराजचो मनाचा ठाव तुम्ही लिहिलेली प्रत्येक शब्दातून वयकत होतोय....

    ReplyDelete
  2. विजेत्याने पराजितांच्या स्त्रियांबरोबर बदसलूकी करणे ही पूर्वीच्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वी पद्धतच होती. महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे अनेक कुपद्धती जवळ जवळ समुळ नष्ट झाल्या. महाराजांच्या आदर्श न्यायप्रियतेची अपरिचित असलेली उदाहरणे गाडे सरांनी अतिशय उत्तमरीत्या सरळ आणि सोप्या भाषेत सर्वसामान्यांना अवगत केली आहेत. अभिनंदन सर आणि खूप खूप धन्यवाद. पुढील ब्लॉगची आतुरतेने वाट पाहत आहोत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख