गुरूंची सदैव सोबत

    " माझे गुरु हे ज्ञानरूप आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. माझ्याकडून जे काही चांगले बोलले गेले याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे." असे विनम्र उद्गार स्वामी विवेकानंद यांनी काढले आहेत. संत तुकाराम आपल्या एका अभंगात असे म्हणतात, " जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया " या ओळींचा अनुभव स्वामीजींना सदोदित आला.


          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

 स्वामीजींचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या घशाच्या कर्करोगाचे निदान १८८५ मध्ये झाले आणि उपचारांसाठी त्यांना कोलकात्यामधील काशीपूर उद्यानात ठेवण्यात आले. त्यांच्या निधनाच्या काहीच दिवस अगोदर श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला, म्हणजेच स्वामीजींना, आपल्याजवळ बोलावले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून स्वतःच्या ठायी असणाऱ्या सर्व शक्ती स्वामीजींमध्ये संक्रमित केल्या. हे केल्यानंतर श्रीरामकृष्ण असे म्हणाले की ," नोरेन आता तुला मी सर्व काही देऊन फकीर झालो आहे." श्रीरामकृष्णांचे निधन झाल्यानंतर त्यांची तरुण शिष्य मंडळी वराहनगर येथील मठात एकत्रित राहू लागली. परंतु स्वामीजींना अद्याप आपल्या जीवित कार्याची पुरेशी स्पष्टता झाली नव्हती. त्या बेचैनीतून ते भारतभ्रमणासाठी बाहेर पडले. ठिकठिकाणी त्यांनी प्रवास केला. या प्रवासात अनेक असे प्रसंग घडले की त्यांना आपले गुरु आपल्या सोबत सदैव आहेत याची प्रचिती येत गेली. उत्तर प्रदेशात गाजीपुर येथे पवहारी बाबा हे श्रेष्ठ संत राहत होते. त्यांच्याकडून राजयोगाची दीक्षा घ्यावी असे स्वामीजींनी ठरवले. त्यासाठी स्वामीजींना पवहारी बाबांचे शिष्यत्व पत्करावे लागणार होते. ज्यावेळी स्वामीजी त्यांना गुरु मानण्याचा विचार नक्की केला त्यावेळी स्वामीजींना सलग काही दिवस आपले गुरु आपल्या शेजारी उभे राहून मूकपणे अश्रू ढाळत आहेत असा दृष्टांत झाला. यानंतर स्वामीजींनी पवहारी बाबांचे शिष्यत्व पत्करण्याचा विचार सोडून दिला.

  आपल्या प्रवासात स्वामीजी हिमालयामध्ये भ्रमण करत असताना हृषिकेश येथे एकदा त्यांना खूप ताप भरला आणि ते मूर्च्छित होऊन पडले. असे काही दिवस गेले. सोबत असणाऱ्या त्यांच्या गुरुबंधूंना काय करावे हे सुचत नव्हते. त्यावेळी अचानक कुठून तरी एक साधू तेथे आला आणि त्याने काही वनौषधी स्वामीजींना दिली. त्यानंतर स्वामीजींच्या दुखण्याला उतार पडला. तो साधू जसा अचानक आला तसा अचानक निघून गेला. 

      या भारतभ्रमणाच्या प्रवासात स्वामीजी एके दिवशी नदीवर स्नानाला गेले असताना त्यांची वस्त्रे माकडांनी पळवून नेली. स्वामीजींना नेसण्यासाठी वस्त्र नव्हते. आता लोकवस्तीत वस्त्रांशिवाय जाणे स्वामीजींना योग्य वाटले नाही. त्यामुळे शेजारी असलेल्या जंगलामध्ये ते जाऊ लागले. अचानक कुठून तरी एक व्यक्ती थाळीमध्ये भोजन व वस्त्रे   घेऊन आला. त्याने स्वामीजींना त्या वस्त्रांचा स्वीकार करण्याची विनंती केली आणि भोजन देऊ केले.

   भारतभ्रमणाच्या प्रवासात स्वामीजी जर कुणी आगगाडीचे तिकीट काढून दिले तर आगगाडीने प्रवास करत असत. अशा एका प्रवासात त्यांच्यासमोर एक तरुण व्यापारी बसला होता. त्याने स्वामीजींना कुचेष्टेने असे म्हटले की , " एवढा तू धट्टाकट्टा करून दिसतोस तर काही अंग मेहनत करून पैसे मिळव. मी बघ व्यापार करतो. पैसे मिळवतो आणि त्या पैशातून मी मिष्टान्न सेवन करतो आहे."  पुढील तारागढ या स्थानकावर गाडी थांबली स्वामीजी खाली उतरल्यावर त्या गावातील एक हलवाई शोधत शोधत स्वामीजींकडे आला. त्याने सोबत चटई, पाण्याची सुरई आणि ताजी मिठाई आणली होती. ती चटई अंथरूण त्यावर बसण्याची विनंती त्याने स्वामीजींना केली आणि मिठाई, पाणी स्वामीजींना दिले. त्याने स्वामीजींना सांगितले की सकाळचे काम आवरून तो ज्यावेळी थोडा वेळ पडला होता त्यावेळी त्याच्या स्वप्नात प्रभू श्रीराम आले आणि त्यांनी एक संन्यासी थोड्यावेळाने आगगाडीच्या स्थानकावर येईल. त्याच्या भोजनाची व्यवस्था तू कर असे सांगितले. जाग आली. असेच स्वप्न पडले आहे असे वाटून त्याने ते सोडून दिले. परंतु पुन्हा तेच स्वप्न पडले आणि मग त्या स्वप्नातील आज्ञेप्रमाणे तो स्वामीजींसाठी भोजन व पाणी घेऊन आला होता.

      आपल्या गुरूंच्या शिकवणुकीच्या प्रसारासाठी आपल्याला अमेरिकेत जावे लागेल याची कल्पना स्वामीजींना आली होती. शिकागो येथे सप्टेंबर १८९३ मध्ये होणाऱ्या जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या पूर्वी साधारण दीड वर्ष आधी स्वामीजींना अशी परिषद भरणार आहे आणि त्यात जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना निमंत्रण आहे ही गोष्ट माहिती होती. स्वामीजी ज्यांच्या संपर्कात आले अशा अनेक व्यक्तींनी स्वामीजींना या परिषदेसाठी हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून आपण जावे अशी विनंती केली होती. परंतु स्वामीजी आपल्या गुरूंच्या आज्ञेची वाट पाहत होते. त्यामुळे त्यांनी चेन्नई ( मद्रास) येथून गुरुपत्नी माता सारदाजी यांना पत्र लिहून अनुमती मागितली होती. त्याच सुमारास स्वामीजींना एके दिवशी दृष्टांत झाला. त्यामध्ये श्रीरामकृष्ण किनारा ओलांडून समुद्रावरून निघाले आहेत आणि ते आपल्याला सोबत येण्याची खूण करत आहेत असे स्वप्न पडले. स्वामीजींना गुरूंची आज्ञा झाली आणि काहीच दिवसात गुरूमातेनेही देखील तीच आज्ञा केली. त्यानंतर स्वामीजींनी अमेरिकेत जाण्याचे निश्चित केले.

     जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या पुष्कळ आधी स्वामीजी शिकागोला पोचले. परिषदेच्या पूर्वी त्यांना वेगवेगळे अडचणींना तोंड द्यावे लागले परिषदेच्या आदल्या रात्री तर त्यांना रेल्वे स्टेशन वरील डब्यामध्ये आसरा घ्यावा लागला श्रीमती जॉर्ज डब्ल्यू हेल यांनी केलेल्या मदतीमुळे ते परिषदेच्या ठिकाणी पोहोचले उद्घाटनाच्या दिवशी सर्व प्रतिनिधींचे स्वागत झाले आणि या स्वागताला उत्तर देणारी भाषणे सुरू झाली अन्य सर्व प्रतिनिधींनी आपल्या भाषणाची तयारी केली होती परंतु स्वामीजींनी वेगळी अशी तयारी केली नव्हती त्यामुळे अध्यक्षांनी विचारल्यानंतर त्यांनी दोन-तीन वेळा बोलण्याचे नाकारले आता शेवटची संधी असे लक्षात आल्यानंतर ते उठून उभे राहिले माता सरस्वती आणि आपले गुरु यांचे त्यांनी स्मरण केले आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दांनी इतिहास घडवला.

 या परिषदेनंतर आपल्या गुरूंच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी स्वामी एका लेक्चर ब्युरो बरोबर करार केला हा एक व्यावसायिक करार होता स्वामीजींच्या प्रसिद्धीचा उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळवता येतील अशा हेतूने या ब्युरो ने स्वामीजींच्या व्याख्यान दौऱ्याची आखणी केली काही वेळा एखाद्या दिवशी दोन दोन वेगळ्या विषयांवर स्वामीजींना बोलावे लागेल स्वामीजींना नेहमी असा अनुभव येत असे की आपल्या कानात कोणी दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानांचे मुद्दे सांगत आहे. तेच मुद्दे त्यांना दुसऱ्या दिवशी बोलताना उपयुक्त ठरत असत.

      स्वामीजींच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे,  स्पष्टवक्तेपणाने त्यांनी धर्मांध ख्रिश्चन मिशनऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे ही मंडळी स्वामीजींवर तुटून पडली. एका शहरात तर स्वामीजींना कॉफीतून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु स्वामीजींना, " ही कॉफी पिऊ नकोस." असे शब्द ऐकू आले आणि त्यांनी ते ती कॉफी पिण्याचे टाळले. मृत्यूच्या दाढेतून स्वामीजी परत आले.

        या सर्व प्रसंगांची तर्कशुद्धसंगती लावता येणे शक्य नाही. त्यामुळे लक्षात येते की स्वामीजींना त्यांच्या गुरूंची सदैव होती. ही सोबत, गुरूकृपा यामुळे स्वामीजींनी भारताचा विश्वबंधुत्वाचा संदेश जगात सर्वत्र पोचवला. हा विश्वबंधुत्वाचा संदेश हेच जगासमोर उभ्या असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.

सुधीर गाडे, पुणे 


Comments

  1. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया " हीच ऊतम गुरू दक्षिण।...🙏.. सुरेख सादरीकरण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख