शहरातील बालपण

    गेल्या दिवाळीच्या दिवसात चालत घराकडे येत होतो. वाटेत एक बाल स्वयंसेवक भेटला. त्याचं घरं जवळच होतं. तिथे केलेली गडाची प्रतिकृती बघायला त्याच्या घरी गेलो. बोलताना विषय निघाला प्रतिकृतीसाठी माती कुठून आणली? तेव्हा खटपट करून माती आणावी लागली असं त्याने सांगितलं. मग पुन्हा लक्षात आलं की शहरात सगळीकडे डांबरीकरण, सिमेंटीकरण झाल्याने माती मिळवण्यासाठी खटपट करावी लागते. काही वर्षांपूर्वी एका ठिकाणी 'किल्ल्यांसाठी माती मोफत दिली जाईल.' असा फलक काही वर्षांपूर्वी एका राजकीय कार्यकर्त्याने लावल्याचे वाचले होते.


        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

       शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शहरांचा विस्तार वाढला आहे. शहरातील शाळा शहराच्या जुन्या भागात एकवटलेल्या असतात. शाळेला येण्यासाठी पालकांचे वाहन, रिक्षा , व्हॅन, बस यापैकी एकाने यावे लागते. शहराच्या वेगवेगळ्या भागातून एका शाळेत येणारे काही विद्यार्थी दिसतात. हे विद्यार्थी शाळेत एकत्र असतात पण राहायला वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे घराजवळ समवयस्क मित्र राहतातच असे नाही. तसेच काही शाळांमध्ये मातीचे मैदानच नसते‌. त्यामुळे मातीत खेळण्याचा आनंद शहरातील मुलामुलींना मिळत नाही.‌ ग्रामीण भागात हा प्रश्न नसतो. 

        ग्रामीण भागामध्ये गावालगत शेती असते. त्यामुळे  शेतात जाणे तिथल्या झाडांवरच्या चिंचा, बोरे, कैऱ्या,आवळे इ. फळे पाडून खाणे असे सहज करता येते. शहरात अशी फळे मंडईतच बघायला मिळतात.

       शहरांमध्ये करमणुकीची साधने, बागा, चित्रपटगृहे, मॉल्स, हॉटेल्स यासारख्या अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात असतात. असे पर्याय उपलब्ध असल्याने मोकळ्या वेळी, सुट्टीत काय करायचे याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे छोट्या गावातून शहरात आलेली मुलेमुली हरखून जातात. काय करू नि काय नाय नको असं त्यांना होऊन जातं. पण शहरात महागाई जास्त असते. शहरातील मुलेमुली छोट्या गावात गेली तर तिथल्या किंमती पाहून त्यांना सुखद धक्का बसतो.

      आधुनिक तंत्रज्ञानाने काही बाबतीत ग्रामीण शहरी असा भेद जवळपास नष्ट करून टाकला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचं घेता येईल. मोबाईलचं नेटवर्क आता बऱ्यापैकी सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईल वापरून जे मनोरंजन करता येऊ शकते, जे गेम्स खेळता येऊ शकतात ते सगळीकडे सारखेच उपलब्ध आहेत. त्यात फारसा फरक आता राहिला नाही.

      याबाबत काही वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा आठवते. बहुधा ती प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक श्री. निरंजन घाटे यांनी लिहली आहे. एक मुलगा अतिशय गरीबीत वाढतो. त्यामुळे खेळायला महागडी साधने त्याला उपलब्ध होत नाहीत. तो शिकून मोठा होतो. मोठ्या पदावर काम करू लागतो. पण आपल्या बालपणी गरिबीमुळे आपल्याला तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या खेळांचा आनंद घेता आला नाही हे तो विसरत नाही. बालपणीचा हा आनंद घ्यायचा असा विचार करून तो स्वतःचा क्लोन बनवतो. त्याला तो स्वतःच्या लहानपणीच्या सर्व खेळांपासून कटाक्षाने दूर ठेवतो. तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेले सर्व खेळ, खेळणी क्लोनला तो आणून देतो. पण  ते खेळून खेळून त्या क्लोनला कंटाळा येतो. एके दिवशी तो संधी साधून पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात उड्या मारत मजा करू लागतो. मग याच्या लक्षात येतं की आनंदासाठी साधनं ही केवळ माध्यम आहेत.

       बऱ्याच वेळा असं वाटतं की आनंद साधनांमध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त साधने असतील तर जास्तीत जास्त आनंद मिळेल असं वाटतं. पण आनंद हा साधनांत नसून तो सोबतीत आहे हे केव्हातरी उमगतं. त्यामुळे शहरातील असो ग्रामीण भागातील बालपण सहसा आनंदातच जातं. म्हणूनच थोरामोठ्यांनाही वाटतं राहतं, ' बालपण देगा देवा!'


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. लहानपण दे रे देवा मुंगी साखरेचा रवा ह्या कवितेची आठवण झाली हा लेख वाचून सुंदर लेखन केले सर🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख