सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

      " सर, दुसऱ्या एखाद्या पालकांनी परीक्षेचा पेपर बुडवून विश्वचषकाचा सामना बघायला जाण्याची परवानगी मुलाला दिली असती तर मी त्यांना
 भेटायला बोलावले असते. पण मी तुम्हाला ओळखतो त्यामुळे बोलावले नाही." आमच्या शंतनूचे महाविद्यालयातील प्राध्यापक संदीप राठोड‌सर मला सांगत होते. झालं होतं असं की क्रिकेट विश्वचषकाच्या पुण्यातील ऑक्टोबर २०२३ मधील सामन्याची तिकिटे शंतनूने खटपट करून इंटरनेटवरून मिळवली होती. पण नंतर परीक्षांचे वेळापत्रक बदलले आणि शंतनूचा एक पेपर सामन्याच्या दिवशीच आला होता. तेव्हा पुढील प्रयत्नात हा पेपर सोडवायचा या बोलीवर मी शंतनूला सामना बघायची परवानगी दिली होती. त्यानंतर हे बोलणे झाले.

             ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
       

      या प्रसंगाने मनात विचार आला की सलग शिक्षण होणं किती महत्त्वाचे आहे किंवा तेच महत्त्वाचे आहे का?

      माझ्या स्वतःच्या जन्मदिनाकांची नोंद चुकीची झाल्याने मी सहा महिने आधीच शाळेत दाखल झालो. पण पहिल्या वर्षात अभ्यासाची गोडी लागलीच नाही. त्यामुळे एक वर्ष अनुत्तीर्ण झालो. पुन्हा पहिलीत एक वर्ष काढले. नंतर पहिलीपासून दहावीपर्यंत प्रत्येक वेळी वर्गात आणि शाळेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत राहिलो. 

         आमचे कौटुंबिक डॉक्टर, गिरीश कामत यांच्याशी मी बोलत होतो त्यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. सुमारे ५५ वर्षांपूर्वी ते पुण्यात सदाशिव पेठेत नूतन बालविकास मंदिर शाळेत शिकत होते. या शाळेला किल्ल्यांची शाळा असे देखील म्हणत असत. त्यांची हुशारी पाहून त्यांच्या शिक्षकांनी पहिली बरोबरच त्यांची दुसरीचीही परीक्षा घेतली आणि थेट तिसऱ्या इयत्तेत प्रवेश दिला. ते जुन्या काळची मॅट्रिक म्हणजे अकरावीपर्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत राहिले. पण ती परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावर्षी त्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश घेता आला नाही कारण वय सतरा वर्षे पूर्ण झाले नव्हते. कुलगुरूंकडे विशेष परवानगी मागण्यासाठी त्यांनी अर्ज केला. त्यावेळचे ‌पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राम ताकवले नव्याने नियुक्त झाले होते. पण विद्यापीठात संप सुरू झाला. अर्जावर अनुकूल निकाल आला तोपर्यंत त्यावर्षीचे प्रवेश पूर्ण झाले होते. म्हणून प्रवेश घेता आला नाही.  एक वर्ष रेडिओ दुरुस्तीचा कोर्स त्यांनी केला. नंतर पुढच्या वर्षी वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला. शिक्षण पूर्ण केले. गेली अनेक दशके कोथरूड परिसरात अत्यंत सचोटीने व्यवसाय करणारे निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. अचूक निदान करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे अशा डॉ. कामतांकडे रुग्णांची नेहमीच गर्दी असते. 

    सुमारे वीस वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयात कृष्णमेघ कुंटे हा विद्यार्थी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय शिकत होता. पहिल्या वर्षी तो अनुत्तीर्ण झाला. त्याने कम्प्युटर कोर्सेस वगैरे करून पुढच्या वर्षी पुन्हा प्रवेश घ्यायचे ठरवले. त्याचे प्राध्यापक, प्रसिद्ध संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांनी स्वतःच्या एका शोध कार्यासाठी तामिळनाडूमधील जंगलात निरीक्षणे नोंदवण्याचे काम त्याला दिले. तिथे काही महिने राहून आपल्या प्राध्यापकांना आवश्यक ती निरीक्षणे नोंदवीत असताना त्याने स्वतंत्रपणे काही निरीक्षणे नोंदवली. त्यावर आधारित त्याचा शोधनिबंध तो शिकत असतानाच एका प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाला. आज एक संशोधक म्हणून कृष्णमेघ कुंटे प्रसिद्ध आहेत.

   नुकताच १२ त्थ फेल हा चित्रपट प्रदर्शित झाला. हादेखील इयत्ता बारावीत अनुत्तीर्ण होऊनसुद्धा पोलिस अधिकारी बनलेल्या मनोजकुमार शर्मा या अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे.

       ही उदाहरणे बघितली की लक्षात येते, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सलग झालेच पाहिजे असे नाही. शिक्षण सलगपणे झाले तर त्याचा फायदा होतो. परंतु एखाददुसरे वर्ष बुडाले तर फार काही बिघडत नाही. काही विद्यार्थी आणि पालक सलग शिक्षण व्हावे यासाठी खूपच आग्रही असतात. काही कारणाने एखाद्या परीक्षेत अपयश आले तर ते अतिशय निराश होतात आणि काही वेळा नको त्या घटना घडतात. असे घडणे टाळता येऊ शकते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आता लागू झाले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मध्येच थांबवण्याची, काही काळ या प्रवाहातून दूर राहून परत शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची सोय करून देण्यात आली आहे. यातूनही शिक्षण सलगपणेच झाले पाहिजे असे नाही हा मुद्दा अधोरेखित होतो. आगामी काळात विद्यार्थी कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे दिसून येईल. 


सुधीर गाडे पुणे 

Comments

  1. नवीन शिक्षण धोरण आणि शिकण्याच्या अद्भुत संधी... सुंदर लेखन केलं सर... 🙏🙏

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर ,शिक्षण क्षेत्राच्या अनुषंगाने खरोखरच एक छान विषयावर तुम्ही लेख लिहिला. मी स्वतः वयाच्या सातव्या वर्षी एकदम चौथ्या इयत्तेत शाळेमध्ये प्रवेश घेतला.. १९६० यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही शिक्षकांनी आमच्या घरी येऊन माझी तोंडी परीक्षा घेतली व तिसरी पास असा दाखला दिला. तेव्हापर्यंत मी शाळेचे तोंडही बघितले नव्हते कोंडीबा गायकवाड नावाचे गुरुजी येऊन सकाळी एक तास इतर भावंडा बरोबर मलाही काहीतरी शिकवायचे. आमच्या वेळची शिक्षण पद्धती ही केवळ घोकंपट्टी आणि अपेक्षित प्रश्नोत्तरे(मेकॉले साहेबांची कृपा) या दोन पैकी एक जरी जमले तर पास होणे हे फारसं अवघड नसायचे . त्यामुळे शाळा किंवा कॉलेज यामध्ये कितीही दिवस उपस्थित राहिलो किंवा न राहिलो यामुळे पुढच्या इयत्तेत जाणे फारसे अवघड नसायचे. अजूनही या प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरावर फारसा बदल झालेला नाही. खरोखरच या शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल करण्याचे धारिष्ट कुठल्यातरी सरकारने दाखविले पाहिजे असे मला वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद डॉक्टर!
      मला अजून एक प्रेरणादायक उदाहरण तुमच्या अनुभवातून कळाले.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख