वयाचा परिणाम

      "आप की दिखाई देनेवाली आयु कम है और जो आयु है वो जादा है" संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि स्वदेशी जागरण मंचाचे पदाधिकारी श्री.कश्मीरीलाल मला म्हणाले. ही गोष्ट २०१७ किंवा २०१८ मधील आहे. असा अनुभव मला अजून काही वेळा आलेला आहे. 

          जन्मदिनाकांनुसार माणसाचे वय ठरते. पण इतरांना वाटणारे वय काहीवेळा कमी वाटते किंवा जास्त वाटते. त्यातून वरील प्रकारचे संवाद होतात.

( बालगंधर्व)

          ( छोटा गंधर्व)

(दोन्ही छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

         वयाचा परिणाम वेगवेगळ्या माणसांवर वेगवेगळा होत असतो. मध्यंतरी बालगंधर्व या उपाधीने सन्मानित नारायणराव राजहंस आणि छोटा गंधर्व उपाधीने सन्मानित सौदागर नागनाथ गोरे या दोघांच्या ७५ निमित्त घेतलेल्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यात आल्या. बालगंधर्वांच्या आकाशवाणीवरील मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या पण विस्मरणाचा परिणाम, तसेच बोलण्यात अस्पष्टता जाणवत होती. गायन करण्याच्या स्थितीत मात्र ते नव्हते. छोटा गंधर्व यांची मुलाखत दूरदर्शनने घेतलेली होती. त्यात त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. पण स्मरण पक्के होते, बोलणे स्पष्ट होते. याचबरोबर अनेक रचना त्यांनी सादर केल्या. यातून वयाचा परिणाम वेगवेगळ्या माणसांवर कसा होतो याचे हे एक उदाहरण आहे. प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे वेगवेगळा परिणाम दिसून येतो.

       यात अजून एक घटक आहे तो म्हणजे कामाचे स्वरूप.‌ ज्यांना उन्हातानात, अंगमेहनतीची कामे करावी लागतात त्यांच्या शरीरावर त्याच्या खाणाखुणा झपाट्याने दिसू लागतात. पण ज्यांच्या कामाचे स्वरूप बैठे, सावलीतले असे असते त्यांच्या शरीरावर मात्र अशा खुणा दिसायला उशीर लागतो.

      माणसाच्या शरीराबरोबरच त्याला बुद्धीचीही जोड आहे. त्यामुळे मानसिक आंदोलनांचा आणि ताणतणावांचा शरीरावर परिणाम होतो त्यातून काही वेळा दुखणे देखील उद्भवतात. अत्यंत बिकट परिस्थिती असेल तर हे परिणाम अतिशय भयंकर होतात त्याच्या खाणा खुणा शरीरावर कायमसाठी उमटतात.

       आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीचे जन्म दिनांकानुसार असलेले वय आणि त्याच्या अवयवांचे असलेले वय हे तपासता येते. त्यातूनही वेगवेगळे निष्कर्ष निघतात विशेषतः रुग्णांवर उपचार करण्यासाठी म्हणून याचा फायदा होतो.

         शरीरावर वयाचा वेगवेगळा परिणाम कसा होतो हे विशेषतः मध्यमवयात, अधिकच्या वयात शाळा महाविद्यालयात बरोबर शिकणाऱ्या मित्र-मैत्रिणींचे एकत्रीकरण, स्नेह मिलन होते त्यावेळी तो लक्षात येतो. काही जणांच्या बाबतीत वयाचा मोठा परिणाम झालेला दिसतो तर काही जणांच्या बाबतीत तो तुलनेने कमी झालेला दिसतो. काही वेळा बघणाऱ्यांना याची गंमत वाटते. आपल्या सोबतचा मित्र किंवा मैत्रीण यांच्यावर वयाचा परिणाम झाला किंवा नाही यातून एक वेगळी गंमत देखील आले अनुभवता येते.

           भारताने जगाला दिलेली एक देणगी म्हणजे योगसाधना. यातून शरीरावर होणारा वयाचा परिणाम कमी करता येतो हे सहजच लक्षात येते. त्यामुळे नियमित योग साधना करणाऱ्या व्यक्ती या वयाच्या मानाने अधिक तरुण वाटतात.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. मानसिक आंदोलनांचा आणि ताणतणावांचा शरीरावर परिणाम होतो त्यातून काही वेळा दुखणे देखील उद्भवतात... अगदी बरोबर.... योग अभ्यास करून मानसिक क्षमता वाढवता येते... 🙏

    ReplyDelete
  2. संतुलित, सकस ,आणि गरजे एवढाच आहार, समाधानी वृत्ती, सलग आणि शांत अशी सहा तासांची झोप, शारीरिक व्यायाम आणि नियमित योगाभ्यास या गोष्टींमुळे आरोग्य संपदा चांगली राहून दीर्घायु होता येते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख