फाळणीची पार्श्वभूमी सांगणारे आणि अखंड भारत होण्यासाठी कार्यक्रम सुचवणारे पुस्तक

    १९४७ मध्ये भारताची फाळणी का झाली , गोष्टी कोणत्या क्रमाने बिघडत गेल्या याची कारण मीमांसा करणारे आणि पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ , भूतान यासह आजचा भारत राज्य म्हणून एकत्र न येताही तो संस्कृतिक आधारावर अखंड भारत कसा होऊ शकतो याचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक म्हणजे भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केलेले 'प्रत्येक राष्ट्रभक्ताचे स्वप्न अखंड भारत' हे डॉ. सदानंद दामोदर सप्रे यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्या पुस्तकाचा श्री.चित्तरंजन भागवत यांनी केलेला केलेल्या मराठी अनुवादाचे ११६ पानांचे पुस्तक.


भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी कोणत्या प्रकारे आपली सत्ता स्थिर ठेवली आणि हा देश सोडून सात असताना रक्तरंजित फाळणी कशी घडवून आणली याचे विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते. 

या पुस्तकाचे दोन भाग करण्यात आले आहेत. भाग एक 'फाळणी का व कशी झाली.' हा आहे. तर भाग दोन 'भारत अखंड कसा होईल?' हा आहे. पहिल्या भागात १७ मुद्द्यांच्या आधारे फाळणीचा घटनाक्रम उलगडून दाखवलेला आहे तर दुसऱ्या भागात १९ मुद्द्यांद्वारे भारत अखंड कसा होईल याचे विवेचन केलेले आहे.

साधारणपणे जनसामान्यांमध्ये भारताची झालेली फाळणी ही आता एक न बदलता येण्यासारखी गोष्ट झाली आहे अशी भूमिका आढळते. परंतु इतिहासातील अनेक दाखले देऊन लेखकाने फाळणी हे 'स्थापित सत्य' असल्याचे का मानता येणार नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे. भारताच्या फाळणीची चर्चा होत असताना सामान्यपणे १९४७ पूर्वीची दोन दशके विचारात घेतली जातात. याच कालखंडात मोहम्मद अली जिना हे मुस्लिम लीगचे नेते म्हणून उदयाला आले आणि शेवटी फाळणी झाली. त्यामुळे फाळणीबाबत बोलताना जिनांची भूमिका प्रयत्न यावरतीच भर दिला जातो. परंतु लेखकाने राष्ट्र आणि राज्य या संकल्पनांमध्ये भारतीय दृष्टिकोन आणि पाश्चात्य दृष्टिकोन यात कोणता फरक आढळतो , पाश्चात्य दृष्टिकोन स्वीकारला गेल्यामुळे राज्याला राष्ट्र कसे मानले गेले आणि या मूळ संकल्पनात्मक घोटाळ्याची परिणीती फाळणीत झाली असा विचारणीय मुद्दा मांडला आहे. पाकिस्तान निर्मितीचा इतिहास उलगडत असताना लेखकाने सर सय्यद अहमद , शिया इमाम आगाखान ते मोहम्मद अली जिना हा क्रम लेखकाने सांगितला आहे. मुसलमानांशिवाय स्वातंत्र्य मिळवणे अशक्य आहे अशी काँग्रेसच्या हिंदू नेत्यांची पक्की धारणा झाली. या धारणेतून विविध गोष्टींबाबत तडजोडीची भूमिका कशी घेण्यात आली आणि इंग्रज सरकारच्या पाठिंब्यावर उन्मत्त होत गेलेल्या मुस्लिम लीगच्या आक्रस्ताळ्या, हिंसक भूमिकेपुढे कसे लोटांगण घालण्यात आले याचा क्रमबद्ध उलगडा लेखकाने केला आहे. हा उलगडा करत असतानाच मुस्लिम तुष्टीकरण म्हणणे कितपत योग्य आहे, त्याला विकृतीकरण म्हटले पाहिजे, लखनऊ करार ही तात्कालिक मानली जाणारी तडजोड दीर्घकालीन परिणामात कशी रूपांतरित झाली, भारतात मिश्र संस्कृती आहे असे म्हणणे कसे चुकीचे आहे असे महत्त्वाचे मुद्दे लेखकाने समजावून दिले आहेत. तसेच स्वातंत्र्य चळवळ प्राथमिक टप्प्यावर असताना कर्झनने बंगालची केलेली फाळणी रद्द करण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश मिळाले परंतु स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात असताना मात्र देशाची फाळणी का टाळता आली नाही असा मर्म भेदक प्रश्न लेखकांनी उपस्थित केला आहे. सोबत त्याचे उत्तरही दिले आहे. याचबरोबर हिंदूंच्या हितरक्षणाची भूमिका घेऊन काम करणारे हिंदू महासभेसारखे राजकीय पक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना असे घटक फाळणी का टाळू शकले नाहीत याची कारणमीमांसा लेखकाने केली आहे.   

 पुस्तकाच्या दुसऱ्या भागात फाळणी ही बदलता येण्यासारखी गोष्ट आहे. ती कशी बदलता येईल याचे विवेचन करण्यात आले आहे. अखंड भारत होण्यासाठी हिंदूंनी मुस्लिमांबाबतच्या दृष्टिकोनात कोणता बदल केला पाहिजे, तर मुसलमानांनी कोणत्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे याबाबतचे विचार मांडण्यात आले आहेत. राज्य बदलले असले तरीदेखील सांस्कृतिक परंपरा बदलत नाही हे इंडोनेशिया, इराण यांच्या उदाहरणांतून स्पष्ट करण्यात आली आहे. अखंड भारताचा विचार करताना केवळ आजचा भारत पाकिस्तान बांगलादेश यांचा विचार न करता त्यांच्या बरोबरीने नेपाळ , भूतान, सिक्कीम म्यानमार यांचाही विचार केला पाहिजे कारण या सर्व देशांमध्ये सांस्कृतिक एकत्व आढळते हा महत्त्वाचा मुद्दा लेखकाने मांडला आहे. अखंड भारत लवकरात लवकर साकार होण्यासाठी या पुस्तकाच्या वाचकांनी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असे आवाहनदेखील लेखकाने केले आहे.

हे पुस्तक म्हणजे हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद असला तरीही अनुवादावर हिंदी वळणाचा प्रभाव काही ठिकाणी दिसून येतो उदाहरणार्थ सांप्रदायिक वृत्ती याऐवजी पांथिक कट्टरता, शक्यता याऐवजी संभाव्यता, सरकार या ऐवजी शासन,प्रांत होईल याऐवजी प्रांत बनेल यासालखे शब्दप्रयोग. असे शब्दप्रयोग टाळता येऊ शकतात. महत्त्वाच्या विषयावर असलेल्या या पुस्तकामध्ये महत्त्वाची विधाने यांना संदर्भ देण्यात आले असते तर ते अधिक योग्य ठरले असते.

१९३१मध्ये काँग्रेसचा अधिकृत ध्वज ठरवण्यात ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने एकमताने केलेली भगव्या  चरखा असलेल्या ध्वजाची शिफारस महात्मा गांधींच्या दबावामुळे फेटाळण्यात येऊन काँग्रेसचा चरखा असलेला तिरंगी ध्वज निश्चित करण्यात आला,  फाळणी होऊ नये यासाठी मुस्लिम लीगला लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही जास्त प्रतिनिधित्व देण्याचे काँग्रेसने मान्य केले होते , कॉंग्रेस , मुस्लिम लीग अथवा हिंदू संघटना यापैकी कोणालाही विचाराला अथवा कृतीला वाव मिळू नये यासाठी गव्हर्नर जनरल माउंटबॅटन याने सत्ता सोडून देण्यासाठीची ब्रिटीश पंतप्रधान ॲटली यांनी दिलेली मुदत जून १९४८ वरून १५ ऑगस्ट १९४७ अशी अलीकडे आणली असे अनेक धक्कादायक खुलासे या पुस्तकातून होतात.

         अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची चर्चा करणारे आणि भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारे हे पुस्तक आहे. योगी अरविंद यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तीने भारताची फाळणी ही तात्पुरती गोष्ट असून ती लवकरच बदलून जाईल असे वर्तवलेले भाकीत प्रत्यक्षात कसे येऊ शकते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

सुधीर गाडे पुणे 

Comments

  1. अखंड भारत 🇮🇳 नक्की वाचेल आता.. धन्यवाद सर...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख