श्रीराम : विद्यार्थ्यांचा आदर्श
केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरलेला हिंदू समाज तसेच अनेक देशावरील कोट्यवधी नागरिक श्रीरामांना आदर्श मानतात. माणूस म्हणून जन्माला येऊन देवत्व प्राप्त करणाऱ्या श्रीरामंचे चरित्र सर्वांना सर्वकाळासाठी आदर्श आहे. यात विद्यार्थ्यांनादेखील ते आदर्श आहे. या लेखात विद्यार्थी श्रीरामांच्या कोणत्या गुणांचे अनुसरण करू शकतात हे आपण पाहूया.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
अयोध्यचे महाराज दथरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांच्या पोटी जन्माला आलेले श्रीराम बालवयातच सर्वांना प्रिय झाले होते. तसेच त्यांच्या क्षमतांची प्रसिद्धीदेखील दूरवर पसरलेली होती. श्रीराम बारा वर्षांचे झाले असता एके दिवशी महाराज दशरथांच्या दरबारात महर्षी विश्वामित्र यांचे आगमन झाले. पूर्वायुष्यात स्वतः राजे असलेले विश्वामित्र तपश्चर्या करून ब्रम्हर्षी पदाला पोचले होते. त्यामुळे शस्त्र धारण करणे, युद्ध करणे हे त्यांनी सोडून दिले होते. ईश्वराचे अनुष्ठान करण्यासाठी ते यज्ञयाग करत असत. परंतु त्यांच्या आश्रमाच्या प्रदेशात दुष्ट राक्षसांनी थैमान घातले होते. हे राक्षस यज्ञकुंडात मांस टाकणे, यज्ञकुंड आणि ते ज्यावर बांधलेले असे ती यज्ञवेदी मोडून टाकणे, यज्ञ करणाऱ्या ऋषींवर हल्ले करणे असे अनेक प्रकार करून यज्ञात विघ्न आणत असत. यज्ञ पूर्ण करण्याची दीक्षा घेतलेली असल्याने ब्रम्हर्षी विश्वामित्र या गलिच्छ कृत्यांना विरोध करू शकत नसत. त्यांना श्रीरामांची योग्यता माहिती होती त्यामुळे त्यांनी आग्रहपूर्वक श्रीराम आणि जणू श्रीरामांची सावली असलेले लक्ष्मण यांना यज्ञरक्षण करण्यासाठी पाठवा असे दशरथांना सांगितले. पितृप्रेमामुळे दशरथांनी सुरूवातीला नकार दिला पण शेवटी दिलेला शब्द पाळण्याची आपल्या रघुकुलाची परंपरा पाळत श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन जाण्यास परवानगी दिली.
आतापर्यंत श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या भावंडांचे शिक्षण त्यांच्या कुळाचे राजपुरोहित महर्षी वसिष्ठ यांच्याकडे झाले होते. अनेक विद्या त्यांनी आत्मसात केल्या होत्या. परंतु आता विश्वामित्रांच्या रूपाने त्यांना आणखी एक गुरू भेटले. गुरू भेटले पण शिष्यदेखील विलक्षण योग्यतेचे होते. ते राजकुमार असूनदेखील गुरूंच्या आज्ञेने पायीच निघाले. यातून गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळण्याचा श्रीरामांचा गुण लक्षात येतो. तसेच आजवर अतिशय सुखात वाढलेले श्रीराम आणि लक्ष्मण यांनी हा वनवासदेखील सहज स्वीकारला. यातून परिस्थिती बदलली, कष्टदायक झाली तरी ती स्वीकारण्याची मनाची तयारी दिसून येते.
विश्वामित्रांसोबत श्रीराम लक्ष्मणांचा वनातील आश्रमाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. या भावंडांसाठी हा प्रदेश अनोळखी होता. या प्रदेशात नवनवीन प्रदेश दिसत होते. या प्रदेशातून जाताना श्रीराम सतत विश्वामित्रांना वेगवेगळे प्रश्न विचारून माहिती विचारत होते. यात त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, पर्यावरण अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. यातून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असा एक महत्त्वाचा गुण लक्षात येतो तो म्हणजे चौकसपणा किंवा जिज्ञासूवृत्ती. ही असेल तर विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी ते खटपट करतात. अशा चौकस विद्यार्थ्यांचे गुरूंना, शिक्षकांना नेहमी कौतुक वाटते असा अनुभव सर्वत्र येतो. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो हा गुण आपण श्रीरामांकडून शिकू शकतो. श्रीरामांनी जे वेगवेगळे प्रश्न विचारले त्याला अनुसरून विश्वामित्रांनी उत्तरे दिली. त्यातून अनेक गोष्टींची माहिती श्रीराम लक्ष्मण यांना झाली.
विश्वामित्र हे ब्रम्हर्षी झाले असले तर ते शस्त्र, अस्त्र यांचे ज्ञान विसरलेले नव्हते. त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना विविध शस्त्रे, अस्त्रे यांचे ज्ञान दिले. श्रीरामांनी ते एकाग्र चित्ताने ग्रहण केले. यातून एकाग्रता हा गुण दिसून येतो. नव्याने शिकलेल्या अस्त्रांचा श्रीरामांना लगेच उपयोग करावा लागला. विश्वामित्रांच्या यज्ञात विघ्ने आणणाऱ्या मारीच, सुबाहू आणि अनेक राक्षसांचा त्यांनी संहार केला.
यानंतर विश्वामित्र त्यांना घेऊन राजा जनकांच्या मिथिला नगरीकडे गेले. या प्रवासातही श्रीरामांची जिज्ञासू वृत्ती पुन्हा दिसून आले. गुरू विश्वामित्रांनी आज्ञा केल्यावर त्यांनी जनकांकडील धनुष्याला प्रत्यंचा म्हणजे दोरी लावण्याचा प्रयत्न केला. त्यात ते धनुष्य मोडून पडले. हा पराक्रम केल्यावर श्रीरामांचा राजकन्या सीता, लक्ष्मणांचा उर्मिला, भरतांचा श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्नांचा मांडवी या राजकन्यांशी विवाह झाला. हे सर्वजण अयोध्येमध्ये सुखाने राहू लागले.
विवाहाला बारा वर्षे पूर्ण झाल्यावर दशरथांनी आपली पत्नी व भरतांची आई कैकयीला दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना वनात जावे लागले. वनवासात मध्ये मध्ये अनेक राक्षसांशी युद्ध करावे लागले. पण हे राक्षस एकटेदुकटे होते. परंतु जवळपास तेरा वर्षांनी राक्षसांच्या प्रचंड सैन्याशी श्रीरामांना युद्ध करण्याचा प्रसंग आला. या युद्धात विश्वामित्रांनी शिकवलेल्या विद्येचा उपयोग त्यांनी सहज केला. यातून असे म्हणता येईल की श्रीरामांनी या विद्येची नियमित उजळणी केली होती म्हणून त्यांना ती पूर्णपणे आत्मसात झाली होती. नियमित उजळणी करणे हा गुण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे हे गुण आत्मसात करण्याचा विद्यार्थ्यांनी अटोकाट प्रयत्न केला तर यातून त्यांचा फायदा निश्चितच होईल.
( म.ए.सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या 'ओंकार' या वार्षिक अंकासाठी लिहिलेला लेख)
सुधीर गाडे
दशरथ नंदन जय श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम राम🙏 सुंदर लेखन केलं सर🙏
ReplyDeleteसर, धन्यवाद!
ReplyDelete