जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख

            ' वरवर कितीही भेद दिसत असले तरी या आंतरिक एकता शक्तीवर जनमानसाचा विश्वास दृढ करत जाणे हे मूलभूत काम आहे असे संघ मानतो.' ' संघाने आपले सारे लक्ष पायाभूत सुविधा( इन्फ्रास्ट्रक्चर )वर म्हणजे व्यक्ती निर्माणावर केंद्रित केले आहे. व्यक्ती चांगली असेल तर कार्य चांगले होणारच.' 'संघटित समाजच सर्व प्रकारचे वैभव व सामर्थ्य प्राप्त करू शकतो हे सत्य ओळखून संघाने अध्यात्म ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम प्रारंभ केले.' संघाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  कामाचे मर्म सांगणारी अशी अनेक वाक्ये संघाचे वरिष्ठ प्रचारक माधव विनायक उपाख्य मधुभाई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या ४८ पानांच्या 'अथातो संघजिज्ञासा' या छोटेखानी पुस्तकात ठिकठिकाणी आढळतात.



        केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात संघाच्या कामाबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याचे सध्याचे चित्र आहे. हितचिंतकांना संघाच्या विचारांचे, वाटचालीचे, कार्यविस्ताराचे,  कौतुक वाटते. त्याबद्दल नेमकेपणाने जाणून घ्यावेसे वाटते. तर दुसरीकडे जनसामान्य कोणत्याही संकटाच्या वेळी अति त्वरेने धावून येणारी आणि कोणत्याही लाभाच्या, प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय सर्वांनाच शक्य ती मदत आपुलकीने करणाऱ्या स्वयंसेवकांच्या सेवावृत्तीची अनुभूती नतमस्तक व्हायला लावते. तिसरीकडे संघाचा उघड हेतू वेगळा असला तरी अंतर्गत हेतू काही वेगळेच आहेत असे आरोप संघाला विरोधक मानणारे वारंवार करत असतात. अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींना संघाची तोंड ओळख करून देण्याच्या दृष्टीने ही पुस्तिका अतिशय महत्त्वाची आहे. 

        श्री मधुभाई कुलकर्णी गेली अनेक दशके संघाचे काम अगदी तळागाळापासून ते अखिल भारतीय स्तरापर्यंत करत आले आहेत. त्यांनी संघाची ओळख संक्षेपात करून देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ही पुस्तिका लिहिली आहे. यामध्ये त्यांच्या विचारांची स्पष्टता, मुद्दा समजावून सांगण्याची हातोटी तसेच दीर्घ वाटचालीतील अनुभवांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. 

      शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संघ कामाची वेगवेगळी वैशिष्ट्ये या पुस्तिकेत सांगितली आहेत. संघ ज्यांनी सुरू केला त्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे १९२५ मधील विजयादशमीच्या दिवशी काढलेले उद्गार म्हणजे, " आपण आजपासून संघ सुरू करत आहोत." हे उद्गारच स्थापनेपासूनचे संघाचे वेगळेपण दाखवतात. अन्य संस्था संघटना यांच्या तुलनेत संघाचे वेगळेपण पहिल्या दिवसापासून कसे आहे हे यातून अधोरेखित होते. स्थापनेच्या या उद्देशाला मधुभाईंनी एक वैश्विक परिमाण असल्याचा संकेत केला आहे.

       काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संघ कामाचे वेगवेगळे आयाम, उपक्रम, आंदोलने या पुस्तिकेत उलगडून दाखवण्यात आली आहेत. यासाठी असंभव ते संभव , ध्येयाकरता समर्पण, स्वयंसेवक, स्वयंसेवक व समाज , स्वायत्त संघटित समर्थ हिंदू समाज, राष्ट्रभाव जागरण , प्राचीन सभ्यता , परम वैभवाकडे वाटचाल असे वेगवेगळे छोटे विभाग करण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागाच्या माध्यमातून संघाची तत्वपूजा, संघाच्या विचारांची स्पष्टता,  स्वयंसेवकांचे निरपेक्ष समर्पण , समाजाची गरज ओळखून ईशान्य भारतातील कुटीरता वादाची समस्या जातीय आधारावर होणाऱ्या भेदभावाची समस्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचे आव्हान या आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर संघाच्या स्वयंसेवकांनी शोधून काढलेली प्रभावी उत्तरे, स्वयंसेवक आणि समाज यामध्ये असलेले अभिन्नत्व, भारताची प्राचीन परंपरा, भारताच्या हिंदू भावाचे म्हणजेच राष्ट्रभावाचे जागरण व्हावे यासाठी त्रिशत सावंत्सरिक महोत्सवी वर्ष ( छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३०० वे वर्ष) गंगामाता-भारत माता एकात्मता अभियान,  गोहत्याबंदीसाठी स्वाक्षरी संग्रह आणि भारताच्या ध्येयासाठी यापुढे करावयाची वाटचाल याची माहिती मिळते

     या पुस्तिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकात वर्णिलेले विविध प्रसंग. या प्रसंगातून संघाची ओळख अधिक स्पष्ट होते अशा प्रसंगामध्ये "आम्ही सरसंघचालक बदलू." हे डॉ.हेडगेवार यांना देण्यात आलेले उत्तर, " जो पैसा भ्रष्टाचारात खर्च होत होता तो वाचून मी राज्याचा खर्च चालवतो ." असे म्हणणारे कै. मनोहर पर्रीकर , गुजरातमध्ये  झालेल्या तीव्र धक्क्याच्या विनाशकारी भूकंपात स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता मदतकार्य करणारे स्वयंसेवक असे प्रसंग लक्षणीय आहेत. ते सांगितला गेलेला मुद्दा आणखी स्पष्ट करतात. 

      संघ ही केवळ पुरूषांची संघटना आहे, उच्च वर्णीयांचे श्रेष्ठत्व तिला पुन्हा प्रस्थापित करायचे आहे, जातीपातींमधील उच्चनीचता कायम ठेवायची आहे या आणि इतर अनेक आरोपांचा फोलपणा पुस्तिका वाचताना लक्षात येतो. तर ज्यांना संघ माहिती आहे अथवा जे स्वयंसेवक आहेत त्यांना जणू संघाची नव्याने ओळख होते.

           ' श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यात विरावे', ' ख्याति प्रतिष्ठा हमें ना भाती, केवल मां की कीर्ति सुहाती', ' हिंदू सदा ही विश्व बंधु है जड़ चेतन अपना माना है' यासारख्या ठिकठिकाणी वापरलेल्या काव्यपंक्ती तसेच संस्कृत सुभाषिते या पुस्तिकेचे साहित्यिक मूल्य वाढवणारी आहेत. 

           संत ज्ञानेश्वर,स्वामी विवेकानंद , योगी अरविंद,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी रंगनाथानंद , डॉ.फ्रिटजो काप्रा, बूजर या विभूतींची उद्रृत केलेली वचने आणि विचार हे या पुस्तिकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या सर्व उल्लेखांतून संघाच्या कामाची सर्वसमावेशकता तसेच विश्वव्यापकता अधोरेखित होते.

           गुळगुळीत रंगीत कागदावरील छपाई, मुद्द्याला अनुसरून छापलेली छायाचित्रे या पुस्तकाचे सौंदर्य वाढवतात. त्याचबरोबर ही छायाचित्रे मनावर ठसतात.

          या सर्वांग सुंदर पुस्तिकेला तीट लावण्यासाठी म्हणून की काय काही ठिकाणी हिंदी वळणाचे मराठी शब्दप्रयोग करण्यात आले आहे असे वाटते. उदाहरणार्थ एकक याऐवजी इकाई, स्वाक्षरी याऐवजी हस्ताक्षर, स्वातंत्र्य चळवळ याऐवजी स्वतंत्रता आंदोलन, इ. 

          संघाचे विद्यमान परमपूजनीय सरसंघचालक डॉ मोहनराव भागवत यांचा पुस्तिकेच्या सुरुवातीचा संदेश जेष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांची प्रस्तावना निवृत्त प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे आणि जेष्ठ प्रचारक मुकुंदराव गोरे यांचा अभिप्राय या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे डॉक्टर भागवत यांच्या शब्दात या पुस्तिकेत ' गागर में सागर ' अशा प्रकारे संघाची ओळख करून देण्यात आली आहे हे विधान सर्वथा सत्य आहे.


सुधीर गाडे पुणे

Comments

  1. सुंदर समीक्षण. पुस्तक वाचूच पण समीक्षा सुध्दा पुस्तकाचे सार वाचकांपर्यंत पोहचवत आहे. सुधीर अभिनंदन.

    ReplyDelete
  2. श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यात विरावे', ' ख्याति प्रतिष्ठा हमें ना भाती, केवल मां की कीर्ति सुहाती', ' हिंदू सदा ही विश्व बंधु है जड़ चेतन अपना माना है' ... सुंदर विचार आणि लेखन सर... 🙏🙏

    ReplyDelete
  3. उत्कृष्ट समीक्षण. सहावी सातवीत असताना बारामतीला संघाच्या शाखेत जात होतो. आणि त्यावेळेस बारामती संघाची एकच शाखा होती आणि शाखाप्रमुख आमचा वर्गमित्र स्व. यशवंत दामोदर हा होता. बारामतीच्या श्रावण गल्लीतल्या पानसे वाड्याच्या मैदानात शाखा भरत असे. आणि सर्व मिळून आम्ही पंधरा-वीस जणच स्वयंसेवक होतो. पुस्तकाचे समीक्षण वाचून संघाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद गाडे सर.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे व्वा.

      नमस्कार डॉक्टर.

      Delete
  4. गाडे सर, खूप छान समीक्षण लिहिले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...