अजुनि रुसूनि आहे मतदार!

     कवी अनिल यांनी लिहिलेले आणि कुमार गंधर्व यांनी संगीत देऊन स्वतः गायलेले एक गीत आहे , ' अजुनि रूसूनि आहे,‌‌‌‌‌‌‌‌‌खुलता कळी खुलेना.' या गीताचा संदर्भ, विषय आणि आशय एका प्रियकराचा, पतीचा आपल्या प्रेयसीच्या, पत्नीच्या रूसव्याबाबतचा आहे. कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांच्या पत्नी कुसुमावती यांच्या निधनानंतर ही कविता त्यांनी लिहिली आणि नंतर त्याचे गीत झाले. यूट्यूबवर ते ऐकता येईल. या लेखातील विषयाचा विचार करताना त्या गीताचे पहिले काही शब्द मला या विषयासाठी योग्य वाटले म्हणून ते शीर्षकात वापरले आहेत. पण गीताचा विषय आणि लेखाचा विषय अतिशय वेगवेगळे आहेत.

     सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. हा लेख प्रसिद्ध होत असताना निवडणुकीच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील मतदान संपले आहे. देशपातळीवर लक्षात घेतले तर साधारण ३८ % ते ८० % असे मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी साधारण ५० % ते ६८% पर्यंत आहे.

           
             ( पुण्यात लावलेला एक फलक)

 याचा अर्थ असा की देशात ६२% ते  २०% टक्के आणि महाराष्ट्रात ५० % ते ३२% मतदारांनी मतदान केले नाही. मतदान न करण्याची वेगवेगळी कारणे असतात. दरवेळी मतदारयादीमध्ये काही प्रमाणात घोळ असल्याच्या तक्रारी होतात. तसेच अत्यंतिक अपरिहार्य कारणामुळे काही जण मतदार करू शकत नाहीत. असे लोक अंदाजे अंदाजे ५% धरले आहेत. या निवडणुकीत ज्यांना आजारपणामुळे घर सोडून मतदानाला जाता येणार नाही अशांसाठी घरीच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. याचा काही जणांनी लाभ घेतला आहे. हे सगळे लक्षात घेतले तर साधारण ५७ % ते १५% मतदारांनी मतदान केले नाही असे ढोबळ निरीक्षण मांडता येते. 

      यात आणखी एक मुद्दा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त मतदान होते आणि त्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त मतदान होते. 

    मतदार यादीत नाव नसण्याची तक्रार दूर करण्यासाठी नोंदणी यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येईल. या प्रक्रियेत काम करणाऱ्या व्यक्तिंची क्षमता वाढवावी लागेल.

       मतदान न होण्याची साधारणपणे काही कारणे अशी आढळतात. पहिले म्हणजे माझ्या एकट्याच्या मताने काही फरक पडणार नाही. दुसरे कारण म्हणजे माझ्या वैयक्तिक किंवा माझ्या समुदायाच्या कदाचित प्रभागाच्या, परिसराच्या, गावाच्या अथवा समाजाच्या अमुक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही मार्गी लागल्या नाहीत म्हणून मतदान करणार नाही अशी काही ठिकाणची बातमी वाचायला मिळते. तिसरे कारण म्हणजे मतदान न करतादेखील आपल्या मागण्या किंवा गरजा भागवण्याची खात्री असणारा एक वर्ग असतो. विशेषतः ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती अथवा प्रतिष्ठा असते अशापैकी काहींना त्याच्या जोरावर आपली कामे होणार याची खात्री असते. काही ठिकाणी तसे घडतानाही दिसते. तसेच राजकीय पक्षांच्या होणाऱ्या आणि मोडणाऱ्या आघाड्या या चुकीच्या वाटल्याने काहीजण मतदान करत नाहीत. महाराष्ट्रातील गेल्या सुमारे साडेचार पाच वर्षांच्या काळातील घडलेल्या घटनांमुळे काहीजणांचे तसे मत झाले आहे असे वाटते. प्रसिद्ध कलाकार संकर्षण कऱ्हाडे यांची याविषयीची ' मत वाया गेलं ' ही कविता काही दिवसांपूर्वी अतिशय प्रसिद्ध झाली होती. काश्मीर खोऱ्यासारख्या ठिकाणी दहशतवादाची भीती हेदेखील एक कारण असते. तर नक्षलवादग्रस्त भागातही जिवाची भीती असते. याशिवाय आजपर्यंत एक कारण होते ते म्हणजे आजारपणामुळे अथवा वृद्धपणामुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. काही जण नेमके त्याच काळात नोकरी अथवा व्यवसाय, पर्यटन यासाठी बाहेरगावी किंवा बाहेरदेशात असतात. त्यांना नेमक्यावेळी परतणे शक्य नसते. काहीजण घरातील दुर्घटना अथवा दु:खद प्रसंग यामुळे मतदान करू शकत नाहीत. 

      काही जण असे मत व्यक्त करतात की जे मतदान करत नाहीत त्यांना काही दंड करावा किंवा काही सुविधा, योजना यांपासून त्यांना वंचित ठेवावे. पण लोकशाहीप्रधान देशात असे करणे शक्य नाही. व्यक्तिच्या अधिकारांवर गदा आणणे हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. तसेच लोकशाही यशस्वी होण्यासाठी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बंधुतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे त्या बंधुतेच्या विरोधातदेखील आहे.

      यातील पहिली तीन कारणे ही नकारात्मक आहेत. तर उरलेली ही अपरिहार्य आहेत. तसेच काही त्रुटी, चुका यामुळे मतदारयादीत नाव नसणारे मतदान करत नाहीत हेदेखील अपरिहार्य मानले पाहिजे. पण अपरिहार्य कारण असलेल्यांंची टक्केवारी ५ पेक्षा जास्त मानणे योग्य नाही असे वाटते. त्यामुळे हे ५% लोक सोडले तर उरलेले मतदार या प्रक्रियेवर रूसून आहेत असे मला वाटते. मी मुद्दाम रूसून आहे असे लिहिले आहे. उदासीन आहे असे लिहिले नाही. कारण माणूस ज्याबद्दल आपलेपणा वाटतो त्या व्यक्तीवरच रूसतो.तसे माझ्यामते ह्या गटातील मतदारांना लोकशाही प्रक्रियेबद्दल आपलेपणा वाटतो पण ते मतदान करत नाहीत म्हणजे रूसून आहेत असे मानले पाहिजे.

    मूलभूत गरजा भागल्या नाहीत म्हणून निर्माण झालेल्या रुसव्याचा एक परिणाम लक्षात येतो तो असा की दुर्गम भागात नक्षलवादी मंडळी आपल्या गरजा मागण्या पूर्ण होत नाही म्हणून हिंसाचाराचा अवलंब केला पाहिजे याचा प्रचार भारतीय नागरिकांच्या मध्ये करतात. परिणामी नक्षलग्रस्त भागामध्ये हिंसाचार होतो. अनेकांचा त्यात बळी जातो. मालमत्ता संपत्ती यांची देखील हानी होते.

     दहशतवाद, नक्षलवाद वा अन्य कारणांमुळे जिथे हिंसाचाराची भीती असते तिथे सुरक्षितता वाढवण्याचे अधिकाधिक प्रयत्न करून लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. भीती असूनही त्याला तोंड देण्याची खात्री वाटली तर मतदानाचे प्रमाण वाढू शकते.

      अजून एक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरील निवडणुका वेगवेगळ्या वेळी होत असतात. त्यात परत परत वेळ घालवणे काहीजणांना योग्य वाटत नसण्याची शक्यता आहे. ' एक देश एक निवडणूक' याविषयी माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने नुकताच एक अहवाल सरकारला सादर केला आहे.     

        मतदान न करण्याची ही कारणे अंदाजे सांगितली जातात. ती बव्हंशी बरोबरही आहेत पण त्यांचे नेमके प्रमाण माहिती नाही. त्यामुळे एक उपाय सुचतो. तो म्हणजे मतदान झाल्यावर ज्यांनी मतदान केले नाही अशा व्यक्तिंची माहिती काढून त्या व्यक्तिंनी का मतदान केले नाही याचा तपशील गोळा केला पाहिजे. सर्वेक्षण केले पाहिजे. मतदार नोंदणीसाठी जशी यंत्रणा राबवली जाते तशीच यंत्रणा यासाठी राबवली पाहिजे. आवश्यक वाटल्यास राजकीय पक्षांचा सहभाग यात घेतला पाहिजे. अशी यंत्रणा राबविल्यामुळे जास्तीत जास्त अचूक माहिती गोळा होईल आणि त्यावर काही उपाययोजना करणे शक्य होईल.

      या सर्वेक्षणामुळे अंदाजे सांगितली जाणारी कारणे किती बरोबर आहेत किंवा त्यांचे प्रमाण किती आहे हे नेमकेपणाने कळू शकते. सर्वेक्षणात ज्या तांत्रिक त्रुटी आढळतील त्या दूर करण्यासाठी खटपट केली पाहिजे. शक्य असल्यास तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. उदाहरणार्थ मतदानाच्या कालावधीत आपल्या नेहमीच्या ठिकाणी नसणाऱ्या व्यक्तींना मोबाईल फोन डिव्हाईस रजिस्टर करून त्यावरून मतदानाची सोय उपलब्ध करून देणे हा एक उपाय असू शकतो.

        या उपाययोजना करताना त्या नेमकेपणाने आणि प्रभावीपणे अंमलात आणल्या पाहिजेत. तसेच या देशाच्या लोकशाही प्रक्रियेत आपला मतदानात सहभाग असला पाहिजे ही जाणीव बळकट केली पाहिजे. तसेच काही घटकांमध्ये लोकशाही प्रक्रियेत कोणत्या स्तरावर कोणते काम होते हे व्यवस्थितपणे समजावून दिले पाहिजे. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेमके काम काय राज्याच्या विधिमंडळाचे काम काय आणि देशाच्या लोकसभेचे काम काय याबाबत जाणीव करून दिली पाहिजे. एकूण लोकशाही प्रक्रियेबाबत समज वाढवली पाहिजे. जनतेच्या मागण्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी वेळ का लागतो हे परतपरत समजावून दिले पाहिजे. तसेच भारतातील संसाधने, सरकार यांच्या मर्यादा लक्षात घेता आवश्यक वाटणारे बदल होण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची मानसिकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

      ‌  हे उपाय करत असताना हे सर्व दीर्घकाळ करण्याचे उपाय आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. या सगळ्या उपाययोजना करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ अथवा खर्च होणारा पैसा ही लोकशाही बळकट करण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे असे समजले पाहिजे. गुंतवणूक सल्लागार जसा सल्ला देतात की जास्त परतावा मिळावा यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक केली पाहिजे. तसेच या गुंतवणुकीबाबतही आहे. अशी गुंतवणूक दीर्घकाळ केली तर त्याचे परिणाम निश्चित चांगले होतील असे वाटते.


सुधीर गाडे पुणे 


लेख आवडल्यास कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.


Comments

  1. अजुनि रुसूनि आहे मतदार!!! डोळयात अंजन घालणारा लेख... ऊतम सादरीकरण सर🙏

    ReplyDelete
  2. मतदान न करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद असावी. असा कायदा अथवा नियम झाल्यास दुबार व मयत मतदारांची नावे ताबडतोब कमी होतील व बोगस मतदानही कमी होईल. मतदानाच्या दिवस हा जोडून सुट्टीचा दिवस नसावा. मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवस सुट्टी न देता अर्ध्या दिवसाची सुट्टी द्यावी. कारण आजपर्यंतचा इतिहास पाहता सुशिक्षितांपेक्षा अर्धशिक्षित व अशिक्षित लोक जास्ती मतदान करतात. लोकशाहीच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा विषयाचे लेखन केल्याबद्दल गाडे सरांचे अभिनंदन. सरांचे कितीही कौतुक केले तरी ते थोडकेच असे.

    ReplyDelete
  3. छान कान उघडतील केली आहे.

    ReplyDelete
  4. लेखन खुपच छान...

    उत्तर गाण्यातच म्हटलं तर मतदान न करणाऱ्या भारतीयांसाठी म्हणावे लागेल

    रुसवा सोड सखे,
    पुरे हा बहाणा, सोड ना अबोला
    चला ना मतदानाला ,
    बांधा पाया लोकशाही चा , देशाच्या प्रगतीचा

    मतदान हाच लोकशाही चा पाया मतदान केलेच पाहिजे....
    इतक्या कमी प्रमाणात होते ही एक शोकांकीका!

    ReplyDelete
  5. लेखन खुपच छान...

    उत्तर गाण्यातच म्हटलं तर मतदान न करणाऱ्या भारतीयांसाठी म्हणावे लागेल

    हा रुसवा सोड सखे,
    पुरे हा बहाणा, सोड ना अबोला
    चला ना मतदानाला ,
    बांधा पाया लोकशाही चा , देशाच्या प्रगतीचा

    मतदान हाच लोकशाही चा पाया मतदान केलेच पाहिजे....
    इतक्या कमी प्रमाणात होते ही एक शोकांकीका!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख