लखलखीत अपवाद

         अनुभव, निरीक्षण, परंपरा यांमधून काही नियम निर्माण केले जातात.  इंग्लिश भाषेत एक म्हण अशी आहे की, 'Exception proves the rule.' अपवाद हे नियम सिद्ध करतात. नियम सरसकट लागू होत नाही. अशा काही अपवादांचा विचार करता येईल.

    ‌‌‌‌‌  विजेचा तीव्र धक्का बसला की माणसाचा मृत्यू होतो हा नियम आहे.‌ पण याला काहीजण अपवाद आहेत.‌ एक राज मोहन नायर या नावाची व्यक्ती आहे. त्यांच्यावर विजेच्या धक्क्याचा काहीही परिणाम होत नाही. गुगल, यूट्यूब यावर ' इलेक्ट्रिक मॅन ऑफ इंडिया ' या नावाने शोध घेतला तर ह्याचे व्हिडिओ, फोटो बघता येतात. विजेची तार तोंडात धरून ते दिवा पेटवणे यासारखी कामे करताना दिसतात. त्यावेळी लक्षात येते की हा एक अपवाद आहे.


   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

       अपवादाचे अजून एक उदाहरण संगीत क्षेत्रातील आहे. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अद्भुत गोष्ट आहे. दीर्घकाळचे प्रयत्न, प्रयोग, परंपरा यातून ते विकास पावलेले आहे. या संगीतात रागदारीचे नियम हजारो वर्षांपासून ठरलेले आहेत. ते नियम पाळूनच गायन करता येते. ते नियम मोडणे योग्य मानले जात नाही. संगीत शिकणाऱ्या व्यक्तिकडून हे नियम घटवून घेतले जातात.‌ आत्मसात करायला लावले जातात. महाराष्ट्रात संगीत रंगभूमीवरील ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली ते बालगंधर्व मात्र नाटकात गाणे म्हणत असताना काही वेळा या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता थोडा बदल करत. ही माहिती शास्त्रीय संगीतामधील त्यावेळचे दिग्गज उस्ताद अल्लादिया खॉं यांच्याकडे पोचली. ते स्वतः एका प्रयोगाला आले. बालगंधर्वांचे गाणे त्यांनी ऐकले आणि त्यांनी मत व्यक्त केले की " रागदारीचे काही नियम पाळले गेले नाहीत हे खरे आहे. पण गाणे ज्या भावपूर्ण पद्धतीने म्हटले गेले त्याचा चांगला परिणाम झाला आहे. " संगीत क्षेत्रातील दिग्गज अल्लादिया खॉं यांचे उद्गार हेच सांगतात बालगंधर्वांनी नियम न पाळणे हा लखलखीत अपवाद आहे.

    

   भारतात प्राचीन काळापासून अनेक गोष्टींबाबत तपशीलवार विचार केला गेला आहे. त्यात अन्नग्रहणाबाबत असे सांगितले गेले आहे की माणूस ज्या प्रकारचे अन्न खातो त्याचा त्याच्या विचारांवर , कृतींवर परिणाम होतो. याबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. १९व्या शतकातील गुरु शिष्यांची श्रेष्ठ जोडी म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद!  श्रीरामकृष्ण आहारासंबंधीचे नियम काळजीपूर्वक पाळत असल्याचे उल्लेख त्यांच्या चरित्रात आहेत. काही व्यक्तींच्या हातचे किंवा काही प्रकारचे अन्न ते ग्रहण करीत नसत. याउलट त्यांचा सर्वात प्रिय शिष्य म्हणजेच नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद खानपानासंबंधीचे हे नियम पाळलेच पाहिजे असा आग्रह धरीत नसे. तसे वागतही नसे. त्याबाबतीत श्री रामकृष्ण यांनी उद्गार काढले की, " नरेंद्र अशा सर्व नियमांच्या पलीकडे आहे. त्याच्यावर कोणत्याही विकाराचा परिणाम होणार नाही." अर्थात स्वामी विवेकानंद हे विलक्षण अपवाद होते.

      एक गोष्ट खरी की अपवाद हे अल्प किंवा अत्यल्प स्वरूपातच असतात. हे प्रमाण वाढले तर ते अपवाद आहेत असे म्हणता येणार नाही. अपवाद हेच नियम होऊन बसतील. त्यामुळे अपवाद हे नियम सिद्ध करतात असे म्हटले गेले. या लेखात आधी बघितलेल्या लखलखीत अपवादांनी नियमच सिद्ध होत असतो. म्हणून नियमपालनाचा आग्रह धरला जातो. नियमपालनात सर्वसामान्यांची भलाई आहे.


सुधीर गाडे पुणे 


(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नाही.)


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख