छ. शिवराय : चिरकालासाठी प्रेरणास्रोत

   "शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला |

दहा दिशांच्या हृदयामधुनि अरुणोदय झाला || "

  ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ! हीच आहे ती पवित्र मंगल प्रेरणादायक तिथी! संवत्सर होते आनंद नाम संवत्सर आणि शालिवाहन शके १५९६.  ग्रेगरियन कॅलेंडरनुसार दिनांक होता ६ जून १६७४. ( यावर्षी हा दिनांक २० जून २०२४ हा आहे.) याच दिवशी शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. वेदमंत्रघोषात त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करण्यात आला. या पवित्र भारतभूमीचे भाग्य पुनरपि उदयाला यावे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जो अविरत संघर्ष चालला होता त्याचा जणू हा सुवर्णबिंदूच!

   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

   छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व, चरित्र, कर्तृत्व, विचार हे चिरकाल प्रेरणा देणारे आहे. शिवरायांनी जे ध्येय ठरवले होते ते केवळ महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशापुरते सीमित नव्हते तर त्यामागे अखिल भारतीय दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन आपल्याला शिकवतो की ध्येय नेहमी उत्तुंग ठेवा. परिश्रमांची पराकाष्ठा करा. कल्पकता नाविन्याची कास धरा. हे सर्व गुण सर्व कालात अनुकरणीय आहेत. 

  मध्ययुगातील धर्मवेड्या परकीय मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्रमकांच्या आक्रमणाचे सर्वंकष स्वरूप महाराजांनी ओळखले होते. हे आक्रमण केवळ सत्ता संपत्ती यापुरते मर्यादित नव्हते. तर ते भाषा, वेशभूषा, संस्कृती, विचार तत्त्वज्ञान, धर्म या सर्वांना गिळू पाहणारे होते. महाराजांनी या आक्रमणाला सर्वंकषपणे तोंड दिले. राज्यव्यवहार कोषातून भाषेची शुद्धता पुन्हा प्रस्थापित केली. सर्वांचा सन्मान केला. धर्म, संस्कृतीवर होणारे आक्रमण धर्म,संस्कृतीची प्रतीके पुनर्जीवित करून परतवून लावले. बळाने, छळाने धर्मांतरित झालेल्यांना परत सन्मानाने हिंदू धर्मात घेतले. स्वातंत्र्याचा हा हुंकार सदैव आचरणीय आहे.

     जे भव्य ध्येय डोळ्यासमोर ठेवले ते साकार करण्यासाठी हाकेला धावून येणारी, जिवाला जीव देणारी, मनातील ओळखणारी , प्रसंगी घाव स्वतःवर घेणारी आणि तशीच वेळ आली प्राणांचे बलिदानही हसत हसत करणारी सवंगडी मंडळी शिवरायांनी जमवली. त्यांना उदात्त हेतूने प्रेरित केले. त्यांच्या योगक्षेमाची , प्रतिष्ठेची काळजी घेतली. त्याच्यातील ज्यांचे प्राणार्पण हिंदवी स्वराज्यासाठी झाले त्यांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार दिला. स्वराज्याचा भगीरथ प्रयत्न यशस्वी व्हावा यासाठी क्षमतावान, कर्तृत्ववान माणसांचा संघ कुशलतेने उभा केला. कोणत्याही ध्येयाच्या प्राप्तीसाठी एकजिनसी संघ लागतो हे सर्व कालासाठी सत्य आहे. 

     मध्ययुगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माणसांचा होणारा व्यापार. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार होता. स्वयंघोषित श्रेष्ठांनी स्वतःच्या चैनीसाठी माणसांना वेठीला धरले होते. माणसांना वस्तूंच्या पातळीवर ढकलले होते. हा व्यापार बंद पाडून महाराजांनी माणुसकीची ध्वजा पुन्हा उंच फडकावली. ही शिकवण सदैव मार्गदर्शक आहे.

     स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या इतिहासात पानापानवर लिहिल्या गेलेल्या आहेत. स्त्री ही भोगाची , विक्रीची वस्तू आहे ही आक्रमकांची अमानुष विचारसरणी याला कारणीभूत आहे हे ओळखून तिला पायबंद घातला. स्त्रियांना सदैव सन्मानाची वागणूक दिली. त्यांच्या मातृत्वाचा, कर्तृत्वाचा नेहमीच गौरव केला. शहाजीराजांच्या निधनानंतर सती जाऊ इच्छिणाऱ्या राजमाता जिजाबाईंना प्रेमाची आण घालून अडवले. सतीप्रथेला केलेला हा विरोध मध्ययुगाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतो.  महिलांचा गौरव करण्याची वृत्ती, त्यांना प्रोत्साहन देणारी विचारसरणी ही सर्व कालासाठी प्रेरणादायक आहे.

   आक्रमणाचे कुटील रूप ओळखून आक्रमकांचे कावे ओळखून त्यांना कल्पकतेने प्रत्युत्तर दिले. घातक ठरलेल्या रूढ रणनीतीला पद्धतीला प्रसंगी फाटा दिला. त्यांच्यात योग्य ते बदल करून त्या काळाला अनुसरून रणनीती अवलंबिली. या साऱ्यातून दाखवलेले शौर्य, धैर्य, पराक्रम यातून शत्रूला धडकी भरवली. चांगलाच धडा शिकवला. महाराजांचे हे गुणदेखील चिरकाल आत्मसात करण्यासारखे आहे.

     सर्वांना जगवणाऱ्या, सर्वांच्या उदरभरणाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याची पिळवणूक थांबवली. जमीनमोजणीत प्रमाणबद्धता आणली. कर आकारणी सुलभ, सुसह्य केली. शेतकऱ्याच्या गरजेला बी बियाणे, बैलजोडी, अवजारे यांचा पुरवठा केला. शेतकऱ्याला स्वावलंबी बनविले. अधिकारी वर्गाला सगळीकडे फिरून प्रत्यक्ष पाहणी करायला लावली. या सगळ्यातून महसूल तर वाढवलाच पण शेतकरीदेखील सन्मानाने उभा राहिला. हेदेखील सर्वकाल मार्गदर्शक आहे.

    व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांचा कावा ओळखला. त्यांच्या आतताईपणाला शब्दशः खणून काढले. जरब बसवली. त्यांच्या व्यापारी धूर्तपणाला विचारपूर्वक काटशह देऊन लक्षात राहील अशी अद्दल घडविली. परदेशी मालाच्या भडिमारामुळे स्वदेशी व्यापार बुडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली. स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिले. ह्याचे अनुकरण सदैव करायला हवे. 

     युरोपियन देशांच्या आरमाराने जगभर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे हे त्यांनी लक्षात घेतले. आपल्या मातृभूमीला लाभलेला सागरी किनारा ही प्रगतीची संधी आहे हे ओळखून जवळपास काही शतकांनंतर भारतीय आरमार उभे केले. आरमार बांधणीसाठी प्रगत तंत्रज्ञान युरोपियनांकडून मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यात नवे प्रयोग केले. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला. वरचढ असलेल्या युरोपियन आरमारावर मात केली. आत्मनिर्भर होण्याचा हा दृष्टिकोन सर्व कालासाठी मार्गदर्शक आहे.

   शिवरायांच्या कर्तृत्वाची, चारित्र्याची व्यक्तिमत्त्वाची महती वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. यातून जे गुण आत्मसात करता येतील आहेत ते निश्चित आत्मसात करूयात. हे करत असताना खात्री बाळगूयात की 

"शिवराय कशास्तव कसे जगले हे नित्य स्मरूया |

शिवसुर्य मार्ग विजयार्थ उठा धरूया||"

छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा!

सुधीर गाडे पुणे

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. भारतीय इतिहासाच्या कालखंडामध्ये परकीय आक्रमण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न अस्तित्वात आणणे हा बलाढ्य पराक्रम सर्व मानवी जिवांना प्रेरणादायी आहे. सुंदर लेखन केले सर 🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख