पाण्याचा प्रश्न

      सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यावर्षी सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे. आपला भारत देश भाग्यवान आहे. कारण गेली हजारो वर्षे येथे मान्सूनचा पाऊस नियमितपणे पडतो. त्याच्या आधारावर शेती बहरली आणि जनजीवन स्थिर झाले. संपन्नता व समृद्धी आली. परंतु गेली काही वर्षे मान्सूनमध्ये बदल होताना आढळतो आहे.  त्याचे प्रमाण, वितरण यामध्ये बदल जाणवू लागले आहेत. याचा परिणाम सहाजिकपणे जनजीवनावर होतो आहे. कारण जर पाणी पुरवठा सुरळीत असेल तरच जनजीवन फुलते म्हणून पाण्याला जीवन असेदेखील एक नाव आहे‌. 

   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      पाण्याबाबत असे म्हटले जाते की पूर्वी माणूस सहजपणे नदीचे पाणी येऊ शकत होता वापरू शकत होता. नंतर परिस्थिती बदलत गेली आता बऱ्याच ठिकाणी विहिरीचे ,आडाचे पाणी प्यावे लागते. याचेच एक नवीन रूप बोअरवेलचे पाणी प्यावे लागते. हळूहळू आता बाटल्यांमधूनच पाणी प्यायचे ही पद्धत रूढ होताना दिसतेय. साधारणपणे पंचवीस तीस वर्षांपूर्वी याची कल्पना देखील कोणी केली नव्हती आता ती स्वाभाविक स्थिती झाल्याचे आपण अनुभवत आहोत.

     काही वर्षांपूर्वी एक बातमी वाचल्याचे आठवते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय नेते दिवंगत आर. आर. पाटील हे त्यावेळी राज्याचे मंत्री होते. विधिमंडळात बोलताना ते त्यावेळी म्हणाले होते की  "इथून पुढे विकत घेऊन पाणी पिण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे." ही बातमी वाचून त्यावेळी वाईट वाटल्याचे आठवते. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर पिण्याचे पाणी विकत घेण्याची परिस्थिती येणे अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. परंतु याला नेमके जबाबदार कोण असा बारकाईने विचार केला तर लक्षात येते की साधारणपणे कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच जण या परिस्थितीला जबाबदार आहोत.

   पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे ही गोष्ट आपल्या समाजात फार थोड्या प्रमाणात दिसून येते. पाण्याचा अगदी बेहिशेबी वापर केला जातो असे बहुतेकवेळा दिसून येते. थोडा प्रयत्न, सवयीतील थोडा बदल करून पाणी वाचवता येणे शक्य असले तरी ते तसे होताना दिसत नाही.

    साधारणपणे उन्हाळा सुरू झाला की 'पाणी जपून वापरा' अशा प्रकारचे संदेश ठीक ठिकाणी वाचायला मिळतात आणि पाऊस सरासरी एवढा पडतो आहे असे लक्षात आले की हा संदेश जणू विस्मरणातच जातो. परंतु पाणी हे नेहमीच जपून वापरले पाहिजे. बोलतानादेखील असे म्हणण्याची पद्धत आहे की 'पाण्यासारखा पैसा खर्च केला'. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की 'पाणीदेखील पैशासारखेच जपून वापरले पाहिजे'.

    पाण्याच्या वापराबरोबर पाण्याच्या प्रदूषणाची समस्या मोठी आहे. पुण्यामधील एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विश्वास येवले हे यांनी अनेक वर्षांपूर्वी 'आळंदी ते पंढरपूर' असा जलदिंडीचा उपक्रम सुरू केला. काही वर्षांपूर्वी त्यांना आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात घेऊन जाण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांची आठवण सांगितली. ते शिकत असताना सीओईपीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या नौकानयन म्हणजेच रीगाटा स्पर्धेत भाग घेत असत. ते म्हणाले, " त्यावेळी आम्ही तहान लागली की सहजपणे मुठा नदीतील पाणी ओंजळीत घेऊन पित असू. पण आता प्रदूषणामुळे नदीची इतकी वाईट अवस्था झाली आहे की नदीमध्ये पायदेखील बुडवू नये असे वाटते." नदीचे प्रदूषण होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी औद्योगिक आस्थापनांद्वारे प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी नदीत सोडणे, शहरात निर्माण होणाऱ्या मैल्यावर संपूर्णपणे प्रक्रिया करण्याची यंत्रणा नसणे आणि प्रक्रिया न करता मैला नदीत सोडला जाणे, घरांमध्ये विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचे घटक पाण्यात मिसळले जाणे अशी काही प्रमुख कारणे आहेत. या कारणांवर लक्ष देऊन प्रभावी उपाय करणे आपल्याला अजून शक्य झाले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहरातून पुढे जाणारी मुठा नदी एवढी प्रदूषित झाली आहे की या नदीच्या काठावर पुढे वसलेल्या काही गावांमध्ये प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 

     ग्रामीण भागात याचबरोबर आणखी एक घटक प्रदूषणामध्ये भर घालतो. शेतीमध्ये रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यातूनही पाणी प्रदूषित होत असते. तसेच पाण्याचा अतिरिक्त वापर ही देखील एक समस्या सिंचनाखाली असलेल्या काही क्षेत्रात दिसून येते. याचा वेगळ्या प्रकारचा उल्लेख मराठीतील प्रसिद्ध साहित्य साहित्यिक विश्वास पाटील यांनी त्यांच्या चंद्रमुखी या कादंबरीत केला आहे.

   एकूणात काय तर पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे. थोड्याफार प्रमाणावर याबाबत जागृतीचे प्रयत्न होत असताना दिसतात. यामध्ये सरकारी यंत्रणा, काही स्वयंसेवी संस्था व व्यक्ती काम करताना दिसतात. अनेक जण अतिशय तळमळीने यासाठी काम करतात. परंतु त्याचा पुरेसा प्रभाव पडत नाही असे वाटते. कारण मूळ मुद्दा माणसांची सवय बदलण्याचा आहे. माणसांची सवय बदलणे ही एक अवघड गोष्ट आहे. गांभीर्याने विचार केला आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू केले तर ते यशस्वी होऊ शकतात. अन्यथा काही विचारवंत 'पुढचे महायुद्ध पाण्याच्या प्रश्नावरून होईल' असा इशारा देतात. 

   पाण्याच्या योग्य वापरासाठी महात्मा गांधींच्या चरित्रातील एक गोष्ट प्रेरणादायक आहे. महात्मा गांधींनी तहान लागली म्हणून पिण्याचे पाणी मागवले. त्यांच्या शिष्याने पाणी आणून दिले. गांधीजींनी त्यापैकी अर्धे भांडे पाणी पिले आणि उरलेले अर्धे भांडे शेजारी ठेवले. शिष्याने ते भांडे उचलले आणि उरलेले अर्धे भांडी पाणी ओतून दिले. गांधीजी त्याला म्हणाले, " अरे हे पाणी ओतून का दिले? त्याचा उपयोग करणे शक्य झाले असते."  शिष्याला आपली चूक कळून आली आणि त्याने आपल्या वागणुकीत बदल केला. आपल्या सर्व समाजानेदेखील वागणुकीत योग्य ते बदल केले तर पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य कमी होईल असे वाटते.

सुधीर गाडे पुणे

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा.  त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. पाण्याचे महत्व खूप सुंदर रित्या सादर केले सर🙏

    ReplyDelete
  2. श्री. प्रमोद बेहेरे यांची प्रतिक्रिया 👇
    ऊत्तम. 👌
    याच विषयावर पुष्कळजणांनी खूप लिहिले असले तरीही हा व असे पर्यावरण, पंचमहाभूते इ. यावर असे लेखन सतत वाचनात आले तर कधीतरी, कोणालातरी, केव्हातरी याप्रमाणे कृती करण्याची बुध्दी होईल व त्यामुळे लेखनाचा हेतू अंशतः सफल असेच म्हणावे लागेल.
    या विषया बाबत थोरांच्या/ मोठ्यांच्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत त्यांचेही संकलन केल्यसही चांगले काम होईल.
    महात्मा गांधींची अशीच एक कथा.... (ऐकीव) एकदा प्रयागराजला काॅग्रसच्या अधिवेशनातील भोजना नंतर जवाहरलाल व गांधीजी भोजन संपवून एकदम् उठले व हात धुण्यासाठी त्यावेळच्या मान देण्याच्या प्रथेनुसार जवाहरलालजींनी गांधीजींच्या हातावर पाण्याची मोठी /अनावश्यक धार धरल्यावर गांधीजींनी त्यांना कमी पाणी ओतण्यास सांगितले. जवाहरलालजी म्हणाले तूम्ही त्याची (पाण्याची) चिंता करू नका गंगा बारा महिने तशीच भरभरून वाहणार आहे.... त्यावर गांधीजी म्हणाले की पण हे सर्व पाणी तू आपल्यासाठी आहे असे का समजतोस? यावर उगमापासून समुद्रापर्यंत अनेकांचा हक्क आहे हे ध्यानात ठेव.....
    अशाच अनेक बोधकथा. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख