वैयक्तिक दुःखाचे हलाहल पचवून समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

     नुकताच श्रावण मास सुरू झाला आहे. हिंदू समाजात हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. अनेक व्रत वैकल्ये या महिन्यात केली जातात. भगवान शंकर यांची विशेष आराधना या महिन्यातील सोमवारी केली जाते. या भगवान शंकरांची ज्यांनी निस्सीम आराधना केली अशा १८ व्या शतकातील कर्तृत्ववान महान महिला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर! त्यांचे चरित्र ऐकत असताना मला भगवान शंकरांच्या नीळकंठ या विशेषणाची आठवण झाली. भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे हलाहल प्राशन करून जगाचे कल्याण केले त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यात अहिल्याबाईंना देखील दुःखाचे हलाहल प्राशन करावे लागले.

   ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

        महाराष्ट्रातील चौंडी या गावी जन्मलेल्या अहिल्याबाई यांचे तेज थोरले बाजीराव पेशवे यांचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या नजरेत भरले. आपला मुलगा खंडेराव याच्याशी त्यांनी अहिल्याबाई यांचा विवाह लावून दिला. आपल्या अंगभूत गुणांमुळे महत्त्वाचे अहिल्याबाई विवाहानंतर आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या आणि पुढची अनेक दशके होळकरांच्या जहागिरीचा कारभार समर्थपणे पाहणाऱ्या अहिल्याबाईंनी आपले विचार, कर्तृत्व, दातृत्वा यांचा उपयोग आपल्या जहागिरीच्या भौगोलिक सीमांच्या पलिकडे जाऊन केला. अत्यंत धार्मिक वृत्तीच्या असलेल्या अहिल्याबाईंनी देशभरात वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, नाशिक, जेजुरी अशा अनेक तीर्थक्षेत्री मंदिरांचा जीर्णोद्धार, बांधकाम अशी कामे केली. अनेक लोकांच्या सोयीसाठी नद्यांना घाट बांधले, धर्मशाळा उघडल्या. पाणपोयांची सोय केली. अनिष्ट रूढींना छेद दिला. नवीन पद्धती निर्माण केल्या. कलाकारांना प्रेरणा दिली. व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले. 

       लोकसेवेचे विलक्षण काम करून काळाच्या पटलावर ठसा उमटवणाऱ्या अहिल्याबाई यांच्या वैयक्तिक जीवनात मात्र त्यांना अनेक दु:खांचा वेदनांचा, कटू प्रसंगांचा अनुभव आला. पती, मुलगा दोघेही व्यसनांच्या आहारी गेल्याचे त्यांना बघावे लागले. सुभेदार मल्हारराव यांचा विश्वास मुलापेक्षाही सूनबाईंवर जास्त होता‌. त्यामुळे जहागिरीचे काम त्यांनी अहिल्याबाईंवर सोपवले होते. एके दिवशी पती खंडेराव होळकर यांनी वैयक्तिक खर्चासाठी जहागिरीच्या खजिन्यातील पैसे मागितले पण ते देण्यास अहिल्याबाई यांनी ठामपणे नकार दिला. कसाही असला तरी 'पती हा परमेश्वर' अशी समजूत ज्या मध्ययुगीन काळात रूढ होती त्या काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्याबाई यांचे धैर्य उठून दिसते. हा कर्तव्य कठोर निर्णय घेत असताना अहिल्याबाई यांनी भगवान शंकराप्रमाणे जणू हलाहलच प्राशन केले.

       ऐन तारुण्यात पतीचे निधन झाले. त्यावेळी अहिल्याबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु सासरे मल्हारराव होळकर यांच्या आग्रही आज्ञेनेनुसार त्यांनी हा निर्णय अमलात आणला नाही आणि वैयक्तिक दुःखाचे हलाहल स्वतः पुरते ठेवले. प्रजेच्या कल्याणासाठी त्या राज्यकारभार पाहू लागल्या.

  अहिल्याबाई यांचा मुलगा मालेराव मोठा होत असताना जणू वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून मोठा झाला. त्याला देखील व्यसने लागली. छंद जडले. अशा प्रसंगीदेखील एक आई म्हणून त्यांनी मुलाच्या बाजूने विचार न करता कर्तव्य कठोर निर्णय अहिल्याबाई यांनी घेतला. पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यात हलाहल प्राशन केले. त्यांच्या प्रयत्नांना यश न येता मुलगा देखील अकाली मरण पावला. आता जहागिरीचा कारभार त्या व्रतस्थपणे सांभाळू लागल्या. प्रजेच्या कल्याणासाठी आवश्यक ते निर्णय त्या घेऊ लागल्या.

     दुर्गम रानावनात जनतेवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्याशी आपल्या मुलीचा विवाह लावून देऊ अशी दवंडी अहिल्याबाई यांनी पिटवली. यशवंतराव फणसे या पराक्रमी तरुणाने हे करून दाखवताच त्याची जात पात न पाहता त्याला आपला जावई करून घेतले. मान मरातब दिला. परंतु दुर्दैवाचा फेरा अजून पुरा झाला नव्हता. नातू नाथ्याबा ह्याचा बालवयातच दुर्दैवी मृत्यू झाला. जावईदेखील मृत्युमुखी पडला. त्यांची मुलगी मुक्ताबाई , आईची इच्छा मोडून मुलगी जनरुढीला शरण जाऊन सती गेली.

    एखाद्या सामान्य माणसांच्या आयुष्यात याप्रकारे दु:खांची मालिका चालू राहिली असती तर तो कोसळून गेला असता. परंतु वैयक्तिक दुर्दैवी प्रसंग एकामागून एक घडत असतानादेखील अहिल्याबाई यांनी सर्वोच्च प्राधान्य प्रजेचे पालन ,देव धर्म कार्य यांच्याकडेच दिले. जणू भगवान शंकराच्या प्रमाणेच हलाहल स्वतःकडेच ठेवले. 

    प्रजेच्या म्हणजेच नागरिकांच्या कल्याणाचा सदैव विचार करण्याची अहिल्याबाई होळकर यांची वृत्ती, कृती आणि चरित्र हे सर्व कालासाठी प्रेरणादायक आहे. 

  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  यांच्या जन्मत्रिशताब्दीचे हे वर्ष आहे. त्यांच्या गुणांची आठवण सदोदित जागी ठेवणे आणि त्यांचे अनुसरण करणे हीच त्यांना खरोखर आदरांजली ठरेल. 

 सुधीर गाडे,‌ पुणे

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नाही.)

Comments

  1. खूप सुंदर लेख आहे.. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल बरीच माहिती या लेखातून मिळाली....

    ReplyDelete
  2. सुधीर, छान लिहिलेस

    ReplyDelete
  3. लोकसेवा करणे त्या काळी स्त्रियांसाठी सोपे नव्हते. दुःख सोसून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ते केले. खरच प्रेरणादायी आहे. लिखाणात सर्व महत्त्वाचे मुद्दे उत्तमप्रकारे मांडलेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख