पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर काही जीवन प्रसंग
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या व्यक्तिच्या जीवनाला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला असतो. पारलौकिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणाऱ्या अशा व्यक्तिंनाही व्यावहारिक पातळीवर बरे वाईट अनुभव येत असतात. अशा वेळी आपल्या दिव्यत्वाची कास न सोडता अशा प्रसंगांना त्या सामोरे जात असतात. अहिल्याबाई यांच्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडले.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
अहिल्याबाई यांचे पती खंडेराव यांचे ऐन तारुण्यात निधन झाले. कर्तबगार सासरे मल्हारराव होळकर यांचेही काही वर्षांनंतर निधन झाले. पेशव्यांनी अल्पवयीन मुलगा मालेराव याला जहागिरीचा वारसदार नेमले. तोही अकाली मरण पावला. सर्व राज्य कारभार अहिल्याबाई बघत होत्या. लष्करी आघाडी सांभाळण्यासाठी नातेवाईक तुकोजी होळकर यांना सेनापती म्हणून नेमले. होळकर आणि शिंदे मिळून उत्तर भारताचे राजकारण चालवत होते. तुकोजी यांनी लष्करी आघाडी सांभाळायची आणि अहिल्याबाई यांनी प्रशासन अशी योजना होती. पण हळूहळू तुकोजी अहिल्याबाई यांना पुरेसा मान देईनासे झाले. सहकार्य करनेसा झू. मोहिमेचा खर्च , त्यातून मिळालेले उत्पन्न याची माहिती देईनात. मिळालेले उत्पन्न संस्थानकडे जमा करीनात. उलट सैन्याच्या खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करू लागले. याबाबत चर्चा करण्यासाठी कर्तबगार सरदार महादजी शिंदे आले. होताहोता चर्चा अशा वळणावर आली की ते म्हणू लागले , " तुम्ही एक स्त्री आहात. आम्ही दोघे मिळून तुम्हाला राज्यकारभारापासून दूर करू शकतो. यावेळी अहिल्याबाई यांनी एक तीव्र कटाक्ष टाकला आणि ठामपणे म्हणाल्या, " मी स्त्री असले तरी मी रणांगणात तुम्हाला नामोहरम करीन. तुम्हाला बेअदबीची शिक्षादेखील करीन." हे बाणेदार उद्गार ऐकताच दोघेही चपापले. त्यांना आपली चूक कळून आली.
तुकोजी यांनी अहिल्याबाई आपल्याला सैन्याच्या खर्चासाठी पैसे देत नाहीत. म्हणून आपण मोहिमेत सामील होऊ शकत नाही. तसेच संस्थानाच्या उत्पन्नातील पेशव्यांकडे भरण्याच्या रकमेतून अहिल्याबाई होळकर या दानधर्म यासाठी खर्च करतात अशी तक्रार पुण्याला पेशव्यांकडे केली. त्यावेळी नाना फडणवीस यांच्या हाती कारभार होता. त्यांनी खलिता पाठवून याबाबतचा खुलासा अहिल्याबाई यांना विचारला. त्यावर अहिल्याबाई यांनी, " याची जरूर तपासणी करावी. काही तफावत आढळली तर त्याची दहापट भरपाई करून देऊ." असे कळवले. तपासणीसाठी पुण्यातून लोक पाठवले गेले. त्यांनी दप्तराची कसून तपासणी केली. पण काहीही गैरव्यवहार आढळला नाही. त्यांना तसे मान्य करावे लागले. याचे कारण म्हणजे अहिल्याबाई सगळा दानधर्म त्यांच्या खाजगी संपत्तीतून करत होत्या.
अहिल्याबाई यांचा मुलगा मालेराव यांच्या मृत्यूनंतर संस्थानला वारस हवा अशी चर्चा सुरू झाली. दिवाण चंद्रचूड यांनी आपल्या नात्यातील मुलाला दत्तक घ्यावे असा प्रस्ताव दिला. पण अहिल्याबाई यांनी तो फेटाळला. यामुळे नाराज होऊन चंद्रचूड याने राघोबादादा पेशवे यांच्याशी हातमिळवणी करण्याचे ठरवून इंदूर ताब्यात घ्यावे असे सुचवले. त्यांनी इंदूरवर हल्ला करण्याची तयारी केली. अहिल्याबाई यांना इंदूर हवाली करण्याचा निरोप पाठवला. मर्दुमकीसाठी भारतभर प्रसिद्ध असलेल्या राघोबादादा यांच्या निरोपाने अहिल्याबाई अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांनी उत्तर पाठवले, " तुमचे अन्यायकारक म्हणणे मान्य करता येणार नाही. लढाईला तर आहोत. पण तुम्ही विचार करा. माझा पराभव झाला तर लोक म्हणतील एका स्त्रीला हरवण्यात कसला आलाय पराक्रम. पण जर मी तुमचा पराभव केला तर एका स्त्रीकडून पराभव पत्करावा लागला म्हणून तुमची किती छी थू होईल याचा विचार करा." अहिल्याबाई यांच्या निरोपाने जणू राघोबादादा यांची कान उघाडणीच केली आणि लढाईचा प्रसंग टळला.
असे प्रसंग समजले की वाटत अशा सर्व प्रसंगांमध्येदेखील अहिल्याबाई किती खंबीर राहिल्या. मनाचा तोल त्यांनी जाऊ दिला नाही. ' समत्वं योग उच्चते ' असे म्हटले जाते. या अर्थाने अहिल्याबाई यांनी योग आत्मसात केला होता असे म्हणता येईल.
अशा अनेक प्रसंगांत अहिल्याबाई स्थिर राहिल्या. त्यांच्या धैर्याचा परिचय आपल्याला नतमस्तक व्हायला भाग पाडतो.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल खूप सुंदर माहिती तुम्ही मांडली तुमचे लेख खूप प्रेरणादायी आणि इतिहासाचे प्रत्येक पैलू बारकाईने मांडणारे आहेत🙏
ReplyDeleteसर धन्यवाद!
Deleteखूप छान लेख सर
ReplyDeleteसर, धन्यवाद!
ReplyDeleteछान माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteधन्यवाद!
Delete