विजयाचा क्षण
काही दिवसांपूर्वीच पॅरिस येथे ऑलिंपिकच्या स्पर्धा पार पडल्या. दर चार वर्षांनी हा खेळांचा जागतिक महाकुंभ भरत असतो. यामध्ये अनेक खेळ खेळले जातात. अनेक घटना घडत असतात. काही जण विजयी होतात तर काहीजण पराभूत होतात. यानिमित्ताने काही विचार डोक्यात आले.
( छायाचित्र यूट्यूबरून साभार )
बऱ्याच वर्षांनी मी टेनिसचा सामना बघत होतो. नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेज यांच्यातील सामना अतिशय चुरशीने चालू होता. दोघांनाही एकमेकांची सर्विस काही भेदता आली नाही. त्यामुळे प्रत्येक सेट हा टायब्रेकरमध्ये गेला. जोकोविचला अल्कारेज याने हैराण करून सोडले होते. आता जोकोविचची सर्व्हिस भेदली जाईल असे वाटता वाटता जोकोविचने नाही बाजी पलटवली आणि गुण मिळवला. असे बऱ्याच वेळा होत होते. शेवटी नवागत तारुण्याचा उर्जेवर अनुभवी विजेत्याने मात केली आणि हा सामना जोकोविचने जिंकला. सामना जिंकल्यानंतर लगेचच तो आपल्या जागेवर जाऊन बसला आणि त्याला रडू फुटले. आपल्या डोक्यावर टॉवेल घेऊन त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली. आत्तापर्यंत जोकोविचने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सुरुवातीच्या काळात होणारी चेष्टा मागे पडून टेनिसच्या इतिहासात स्वतःची कामगिरी त्याने खणखणीतपणे नोंदवली आहे. परंतु या सगळ्या प्रवासात ऑलिंपिकमधील सुवर्णपदक काही तो मिळवू शकला नव्हता. त्यामुळे या विजयाचा आनंद काही निराळाच होता. आता तर त्याच्या निवृत्तीच्या चर्चादेखील रंगायला लागल्या आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना असा विजय हा हवाहवासा वाटणारा आणि खूप प्रतीक्षेनंतर परिश्रमांनी मिळवलेला होता. जोकोविचचा हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये त्याचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. सहाजिकच आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याचे कुटुंबीय त्याच्यासोबत होते. परंतु मॅच जिंकल्या क्षणी तो त्याच्या कुटुंबीयांकडे गेला नाही किंवा जाऊ शकला नाही. माणसांच्या गर्दीमध्ये एकट्यानेच त्याने आपल्या भावनांना मोकळीक करून दिली. यावेळी मला वाटलं की 'विजयाच्या क्षणी माणूस एकटाच'! थोड्या वेळाने भावनावेग ओसरला आणि जोकोविच आपल्या कुटुंबीयांना जाऊन भेटला ते क्षणदेखील भावुक करणारे होते. आता जोकोविच एकटा नव्हता पण विजयाचा नेमका क्षण उलटून गेला होता. पुरुषांच्या टेनिसमधील सर्वाधिक वयाचा विजेता होण्याचा विक्रम नोवाक जोकोविच याच्या नावे करून तो क्षण इतिहासजमा झाला होता.
( छायाचित्र यूट्यूबरून साभार )
त्यानंतर एक दोन दिवसांनी भारताच्या पुरुषांच्या हॉकीच्या संघाचे सामने बघितले उपांत्य फेरीत भारताचा अगदी निसटता पराभव झाला. आता लढत होती की तिसऱ्या स्थानासाठी ब्रॉंझ पदक मिळवण्यासाठी आपले खेळाडू अतिशय जिद्दीने, चपळाईने खेळत होते. प्रतिस्पर्धी देखील जिद्दीने आणि चपळाईने डाव पलटवायचा प्रयत्न करत होते. परंतु भारताच्या खेळाडूंचे प्रयत्न यशस्वी झाले. भारताने हा सामना जिंकला आणि ब्रॉंझ पदकावर आपले नाव कोरले. भारताचा गोलरक्षक श्रीजेश याचा हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्याची निवृत्ती विजयी सामन्याने करायची या जिद्दीने सर्वच संघ खेळत होता. खेळाची निर्धारित वेळ संपली आणि सर्व भारतीय खेळाडूंनी श्रीजेशला गराडा घातला आणि जल्लोष साजरा केला. हा सांघिक खेळ असल्यामुळे विजयाच्या क्षणी कोणीही एकटा नव्हता, तर सर्वजण एकमेकांच्या सोबत होते आणि विजयाचा आनंद अनुभवत होते.
खेळाच्या प्रकाराप्रमाणे विजयाचा क्षण हा एकट्याने किंवा सांघिकपणे अनुभवता येतो. हल्लीच्या काळात प्रत्यक्ष खेळ जरी एकटी व्यक्ती खेळत असली तरी तिच्या मागे मदत करणारे , मार्गदर्शन करणारे यांचा संघच असतो. त्यामुळे हे सर्व प्रयत्न सांघिकच असतात. सांघिक खेळात तर सर्व संघ एकत्रच खेळत असतो.
विजयाचा क्षण विजेत्याला आनंद निश्चितपणे देऊन जातो. काही जणांसाठी विजय हा स्वाभाविक असतो तर काहीजणांसाठी ते एक आश्चर्य असते. काही जण सहजच विजयी होतात तर काही जणांना खडतर वाटचालीनंतर विजय प्राप्त होतो. विजयाच्या क्षणी वाटणारा आनंद काही जणांच्या बाबतीत त्यांच्या क्षमतेवरचे शिक्कामोर्तब असते तर काहीजणांसाठी ती अनोखी भेट असते. विजयाच्या क्षणी कुणाचे डोळे पाणावतात. कोणाच्या तोंडून आनंदाचे चित्कार बाहेर पडतात. कोणी कोणी विजयाने नम्र होतो. यशाने मोहरून जातो तर काही जणांच्या बाबतीत विजयाने अहंकार बळावतो. विजय डोक्यात जातो. विजयाच्या क्षणी विजेत्याचे व्यक्तिमत्व, त्याचा तिथपर्यंतचा प्रवास हे त्याच्या प्रतिक्रियेतून प्रकट होत असते. पाहणाऱ्यांना त्याचा आनंद मिळतो आणि जर पाहणारे विजेत्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून असतील तर त्यांना निराशाही घेरते. परंतु खेळाचे चक्र, प्रवास तसाच पुढे सुरू राहतो. नवीन विजेते तयार करण्यासाठी. नवीन उच्चांक घडविण्यासाठी नव्याने आनंद देण्यासाठी.
विजयाचा क्षण काही जणांना सहज किंवा परिश्रमाने अनुभवता आला तरी त्याची पुनरावृत्ती करणे हे अतिशय अवघड असते. त्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य, परिश्रम, स्वतःच्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची यशस्वी धडपड, कधीकधी मुळातून बदल करणे अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात. हे जे करून दाखवतात त्यांचे नाव निश्चितपणे इतिहासात कोरले जाते. त्यांची कामगिरी मानदंड मानली जाते. पुढील खेळाडू हा मानदंड एक प्रेरणा आणि आव्हान म्हणून स्वीकारतात. खेळाचा प्रवास चालूच राहतो. विजयाचे नवनवे क्षण नोंदवण्यासाठी!
सुधीर गाडे, पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
अगदी खरे आहे....मनाला भावणारे लेखन
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसुंदर लेखन केले सर खेळाडूचा प्रवास सरावापासून विजयापर्यंतची सुंदर मांडणी केली आहे.🙏
ReplyDeleteसर, धन्यवाद!
ReplyDeleteछान लेख, विजयी खेळाडूच्या प्रतिक्रियेत त्याचा प्रवास दिसतो ही सत्य कल्पना आवडली.
ReplyDeleteधन्यवाद!
Delete