संवादातील सहजपणा

     माणसाचा अभिमान ही तशी स्वाभाविक म्हणावी अशी गोष्ट आहे. याचे कारण प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. एका अर्थाने प्रत्येक जण हा 'एकमेवाद्वितीय' असतो. यामुळेच की काय स्वतःच्या दिसण्याचा, ज्ञानाचा, संपत्तीचा, पदाचा, सत्तेचा अभिमान माणसांमध्ये सहजपणे तयार होतो.  हा तयार झालेला अभिमान कळत नकळत अहंकारामध्ये रूपांतरित होतो. जवळ असलेल्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतरांच्यापेक्षा आपण कोणीतरी खूप वेगळे आहोत अशी भावना माणसांच्या मनात निर्माण होते आणि त्यातून स्वतःच्या वरचढपणाचा अहंकार तयार होतो. असा वरचढपणा अंगात भिनला की मग काहीजणांना सर्वांशी बरोबरीच्या भूमिकेतून संवाद करणे शक्य होत नाही. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे संवाद ऐकू येतात. या संवादातून बहुदा बरेच जळ स्वतःचा वेगळेपणा ठसवत असतात किंवा ठसवण्याचा प्रयत्न करत असतो.

    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

     याला अपवाद असणारी मोठी माणसे आपला मोठेपणा सहजपणे विसरून इतरांच्यामध्ये मिसळून जातात. काही वर्षांपूर्वी एआरडीइ या संरक्षण खात्याच्या संशोधन संस्थेतून संचालक म्हणून निवृत्त झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. काशिनाथ देवधर यांच्याशी मी बोलत होतो. त्यावेळी त्यांनी त्यांचा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी कामानिमित्ताने आलेला संबंध सांगितला. ज्या विषयाचे संशोधन सुरू होते त्या विषयात आढावा घेणारी सभा असेल तर त्यामध्ये कलामांशी त्यांची भेट होत असे. कामाबद्दल चर्चा तर व्हायची. परंतु आवर्जून त्यांनी हे सांगितले की कलाम सर्वांशी सहज संवाद साधायचे. स्वतःच्या मोठेपणाची कोणतीही पर्वा न करता किंवा त्याचे समोरच्या व्यक्तीवर दडपण न येऊ देता ते संवाद साधत असत. स्वतःच्या ज्ञानाची अनुभवाची कौशल्याची बढाई स्वतःच मारणे हा प्रकार त्यांच्या संवादात कधीही नसे. यातूनच त्यांच्या मोठेपणाचा वेगळा पैलू समोर येतो.  'विद्या विनयन शोभते' म्हणतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

   भारताच्या इतिहासात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे असे कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दलदेखील हेच सांगता येईल. याबाबतीत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावरची 'आंबोळीचे शेत' ही कथा अतिशय प्रसिद्ध आहे. एके दिवशी शाहू महाराज एकटेच घोड्यावर स्वार होऊन जात असताना त्यांना वाटेत एक गरीब महिला भेटली. त्यावेळी त्यांना भूक लागली होती . या महिलेशी त्यांनी सहज संवाद साधला. त्या महिलेला हे महाराज आहेत हे माहिती नव्हते. एक भुकेला वाटसरू जेवायला मागतो आहे असे समजून तिने स्वतः जवळच्या आंबोळ्या त्यांना प्रेमाने खायला दिल्या. महाराजांनीदेखील तिच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यावेळी " आंबोळीला भोके कशी काय पडतात?" असे महाराजांनी गंमतीने विचारले. तिनेही अगदी सहजपणे आंबोळी कशी तयार करतात हे सांगितले. दुसऱ्या दिवशी महाराजांनी तिला नवऱ्यासह जोडीने दरबारात बोलावून घेतले. साडीचोळी देऊन सन्मान केला. महाराजांनी तिला कसायला शेतजमीन दिली. त्यालाच 'आंबोळीच शेत' असं म्हटलं जाते. 

      अशा सहज संवादाचा एक वेगळा फायदा होतो तो म्हणजे सहज संवादामुळे जास्त चांगली जवळीक साधली जाते हे तर खरे आहेच. परंतु काही प्रमाणात याचा उपयोग खरी खरी माहिती मिळते. मनातल्या भावना समजून घ्यायलादेखील मदत होते. हा देखील एक फायदाच आहे.

      खरे तर माणासाची प्रतिष्ठा कशात आहे असा मुद्दा नेहमी समाजात दिसून येतो. माणसाची प्रतिष्ठा सौंदर्य, संपत्ती, ज्ञान, पद, अधिकार यामध्ये आहे अशी काहीशी भूमिका काही जणांच्या वागण्याबोलण्यात दिसते. पण माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या माणूसपणातच आहे. ही भूमिका मोठ्या माणसांच्या सहजपणे वागण्याच्या भूमिकेतून दिसून येते. असा सहजपणा या माणसांचा मोठेपणा दर्शवतो आणि आपल्याला नतमस्तक व्हायला भाग पाडतो.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. छान विवेचन सुधीर.

    ReplyDelete
  2. सहज संवादातून बऱ्याच वेळा खूप चांगल्या गोष्टी घडल्याचा अनुभव येतो...छान लेख सर 👌👍💐

    ReplyDelete
  3. संवेदनशील मन असलेले उत्तम शास्त्रज्ञ... सर्वांना आपलंसं करण्याची भावना हे डॉ.अब्दुल कलाम यांचे वैशिष्ट्य.... सुंदर सादरीकरण केले सर 🙏

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर विवेचन. सहज आणि मनाला भावेल अशा विषयांची सोप्या भाषेत सादरीकरण करण्याची विलक्षण हातोटी सुधीर गाडे सरांच्यात आहे. धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख