लेकीवरच्या मायेसाठी (भाग १ )
( काल्पनिक कथा )
"काय गं सायली? चेहरा एकदम पडलाय तुझा!" वंदनाकाकींनी विचारलं. सायली म्हणाली, " अहो, काकी काय सांगू? उद्या लेकीला अचानक सुट्टी आहे. आत्ताच समजलं. मला तर कामावर यावेच लागणार आहे . सुशीलला नाही जमणार. तो कंपनीच्या कामासाठी टूरवर निघालाय आणि साक्षीचे आजी आजोबादेखील शेतीच्या कामासाठी कालच गावाकडे गेलेत. आता उद्या तिला घरी एकटीला कसं सोडायचं? कारण आमच्या सोसायटीत बहुतेक सगळेजण नोकरीवर जातात. दिवसभर तसं कोणी नसतं."
( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले छायाचित्र )
वंदनाकाकी आणि सायलीच्यात नेहमीच बोलणे होत असे. सायलीच्या कंपनीजवळच काकींचं छोटसं दुकान होतं. कामावरून येता जाता सायली छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांच्याकडून विकत घेऊन जायची. त्यातूनच दोघींची ओळख वाढत गेली. याला तसे फार दिवस झाले नव्हते. जेमतेम एखादं वर्ष झालं असेल नसेल. परंतु सायली वंदनाकाकींशी मोकळेपणाने बोलू शकत असे. कुठलीही अडीअडचण त्यांना सहजपणाने सांगत असे. काकीदेखील आपल्या अनुभवानुसार तिला छोटा मोठा सल्ला देत असत. असा सल्ला उपयोगी पडतो हे सायलीच्या लक्षात आले होते. त्यामुळे हळूहळू दोघींमध्ये एक प्रकारचे नातं तयार झालं होतं.
अडचण निर्माण झाली होती पण परंतु त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे मात्र सायलीला सुचतं नव्हतं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखून काकींनी तिला विचारलं होतं. सायलीने अडचण सांगताच काकी पटकन म्हणाल्या, " उद्या दिवसभर तू सोड तिला माझ्याकडे. मी लक्ष ठेवेन तिच्याकडे." सायलीला जरासं हायसं वाटलं. पुढं काकी म्हणाल्या, "अगं हो! मी तुला मनापासून सांगते आहे. कोणताही संकोच न बाळगता तू तिला माझ्याकडे सोड. तिची काही पुस्तकं, आणि खेळणी घेऊन ये. मी ठेवते तिच्याकडे लक्ष."
सायलीला आपल्या मनावरचं दडपण एकदम उतरल्याचे जाणीव झाली. घरी जाताच हात पाय धुवून ती कामाला लागली. सुशील निघायच्या तयारीत होता. नेहा लेकीला सांगू लागली, " साक्षी, उद्या की नाही तुला दिवसभर काकी आजींच्याकडं जायचं आहे. तिथेच तू दिवसभर राहायचं." " कोण काकीआजी?" चिमुरड्या साक्षीने विचारलं. सुशीलच्या चेहऱ्यावरदेखील प्रश्नचिन्ह होतं. तेव्हा सायलीने वंदनाकाकी कोण , त्यांच्याशी झालेला आपला संवाद हे सगळं दोघांनाही सांगितले सुशीलला देखील अडचण दूर झाल्याचे लक्षात आले आणि बरं वाटलं. तो निश्चिंत होऊन टूरवर गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून साक्षीचा आवरून तिच्यासाठी डबा घेऊन, पुस्तक खेळणी, वगैरे घेऊन सायली जराशी लवकरच काकींच्या दुकानावर पोचली. काकींच्याकडे एक दोन ग्राहक होते ते गेल्यावर काकी प्रेमळपणे म्हणाल्या, " आली का माझी नात!" साक्षी थोडीशी बुजली. पण सायली अर्धा तास आधी आली असल्यामुळे तीसुद्धा तेवढा वेळ थांबली. हळूहळू साक्षी तिथे रुळली. ऑफिसची वेळ झाल्यावर निघताना सायली म्हणाली , "साक्षी, काकी आजींना त्रास द्यायचा नाही बरं! त्या सांगतील तसं ऐकायचं." साक्षीनं हो म्हटलं आणि सायली निघाली.
कंपनीत गेल्यावर एकामागून एक कामे सुरूच होती. सायलीला साक्षीची आठवण येत होती. ती काय करत असेल? काकींना त्रास तर देत नसेल ना? डबा संपवेल ना ? रडणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात घोळत होते. पण कामाच्या धबडग्यात यावर विचार करत रेंगाळत राहायला संधीच नव्हती.
लंच टाईममध्ये पटकन जाऊन येऊ असा विचार सायलीने केला होता. परंतु कामांची इतकी गर्दी उडाली जाता आलं नाही किंवा वेळात वेळ काढून दोन मिनिटं फोन केला आणि साक्षीशी थोडं बोलणं केलं. जेमतेम बोलता आलं. पण जाता आलं असतं तर बरं झालं असतं अशी रुखरुख सायलीला लागून राहिली.
लंच टाईम संपल्यानंतर पुन्हा कामाचं रहाटगाडगं सुरू झालं. कधी एकदा ऑफिसची वेळ संपली आणि आपण काकींच्या दुकानात जातोय असं सायलीला झालं होतं. ऑफिसचं काम सुटल्यानंतर ती गडबडीने काकींच्या दुकानाकडे गेली.
दुकानासमोर गाडी लावून सायली दुकानाकडे निघाली तर साक्षी कुठे दिसेनाच. काकी मात्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वस्तू देण्याच्या गडबडीत होत्या. सायली पटकन दुकानात पोचली आणि बघते तर काय साक्षी एकदम मन लावून तिच्या चित्रकलेच्या वहीत चित्र काढत होती. " साक्षी!" अशी तिनं हाक मारताच साक्षीने चमकून वर पाहिलं आणि गडबडीनं उठून आईला मिठी मारली. सायलीनं तिला काही विचारायच्या आहात साक्षीच म्हणाली, " किती भारी आहेत ग या काकीआजी! मी आता नेहमीच या दुकानात येणार." सायलीच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं. एवढ्यात काकींनादेखील थोडी फुरसत मिळाली. सायली म्हणाली, " काकी तुमचे आभार कसे मानावे हेच मला कळत नाही. तुम्ही एवढ्या दिवसभरात काय बरं जादू केली? कसा बरं तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढला?". काकी म्हणाल्या, " अगं मुली आभाराचं काय घेऊन बसलीयेस. मलादेखील नात भेटल्याचा आनंद झाला ना. हे केलं ते सारं काही लेकीसाठी!"
सुधीर गाडे, पुणे
( कथा आवडल्यास कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
सुंदर सादरीकरण सारी पात्रे डोळ्यासमोर उभे राहिले... प्रेम आपुलकी या नात्याने गुंफलेली मानवी मन त्याचे उत्तम सादरीकरण 🙏
ReplyDeleteधन्यवाद सर🙏
Delete