लेकीवरच्या मायेसाठी ( भाग २ )
( काल्पनिक कथा )
वंदना काकींचे उत्तर ऐकून सायलीला आनंद झाला. परंतु काकींच्या चेहऱ्यावरील सूक्ष्मशी छटा तिच्या मनात घर करून राहिली. उशीर झाला होता. त्यामुळे ती पटकन साक्षीला घेऊन घरी गेली. जाता जाता तोच विचार करत होती की काकींच्या चेहऱ्यावर जे भाव आपण बघितले त्याचा नेमका अर्थ काय लावायचा.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
तीन-चार दिवस असेच गेले आणि तिच्या मनात आलं की उद्या सुट्टी आहे. परत एकदा सवडीने काकींना भेटून त्यांचे आभार मानावेत. म्हणून तिने साक्षीला सांगितले की , "उद्या काकीआजींना भेटायला जायचे आहे."
साक्षीलादेखील आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सायलीने काकींसाठी साजुक तुपात शिरा केला आणि तो डबा घेऊन ती साक्षीबरोबर काकींच्या दुकानात पोचली. सवडीने काकींशी ती बोलू लागली. काकींनी शिरा खाल्ला आणि त्या म्हणाल्या, " फारच चविष्ट केला आहेस गं तू शिरा!" साक्षीकडे वळून त्या म्हणाल्या, " मग काय मजेत आहे ना स्वारी?" साक्षी म्हणाली, " आज आहे सुट्टी. मी फक्त मजा आणि मजा करणार. "
साक्षी स्वतःच काहीतरी खेळू लागली आणि दोघींचू बोलणं सुरू झालं. सायली म्हणाली, " परवा तुम्ही दिवसभर साक्षीला ठेवून घेतलं. आम्ही जाताना तुम्ही म्हणाला सारं काही केले ते लेकीसाठी. त्या वेळचे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच वाटले म्हणून मी आज पुन्हा विचारते तुम्ही असं का म्हणालात?" काकींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्यामध्ये थोडी खिन्नतेची छटा आली. त्या सायलीला सांगू लागल्या , " दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट! आमची मुलगी कीर्ती. तिचं आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे लग्न लावून दिलं. तिचा सुखाचा संसार सुरू झाला. नवरा बायको दोघेही नोकरी करत होते. लग्नानंतर दोन वर्षांनी घरात पाळणा हल्ला हलला आणि एक गोड मुलगा झाला त्याचं नाव वेदांत ठेवण्यात आलं. छोट्या बाळाला सांभाळत, धावपळ करत कीर्तीची नोकरी सुरू होती. घरचे सगळे करून , बाळाला कसं बसं कामवालीच्या भरवशावर घरी सोडून ती नोकरीवर जात असे. नोकरी संसार, आला गेला पै पाहुणे , सणवार सगळं करता करता तिची त्रेधातिरपीट उडत असेल. तसं बसा ते सगळं पार पाडत असायची. एके दिवशी असं झालं बाळाच्या म्हणजे आमच्या वेदांतच्या सांभाळण्याची काही व्यवस्था झाली नाही. नाईलाज झाला. मग आयत्या वेळी काय करायचं म्हणून कीर्ती घरीच राहिली. नेमका तो दिवस महत्त्वाच्या कामाचा होता. त्यादिवशी घरी राहिल्याबद्दल कीर्तीला नोकरी सोडण्याची वेळ आली. खूप खटपट करूनही दुसरी नोकरी मिळाली नाही."
काकींचा स्वर जरा जड झाला होता. काकी पुढे सांगू लागल्या, " तेव्हापासून कीर्ती मनाने थोडीथोडी खचत गेली. आम्ही सर्वांनी पुष्कळ प्रयत्न केले परंतु ती मात्र आतल्याआत कुढतच राहिली. घरातलं वातावरणच बदललं. जावईबापूंनी तिला सावरायचे खूप प्रयत्न केले. पण तिच्या मनाची निरगाठ सुटली नाही. तेव्हापासून खचून गेलेली कीर्ती एके दिवशी अचानक आम्हाला......"
काकींना हुंदका फुटला. सायलीने पटकन उठून त्यांचा हात हातात घेतला आणि घट्ट धरून ठेवला. तिच्याही डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. काही मिनिटे दोघीही भावनाविवश होऊन अश्रू ढाळतच राहिल्या. तेवढ्यात साक्षीने हाक मारली, " आई, मला भूक लागली." सायलीने गडबडीने आपले अश्रू पुसले आणि ती म्हणाली, " बाळा देते गं खायला लगेच." तिनं डबा काढून साक्षीलाही शिरा खायला दिला.
वंदनाकाकीदेखील सावरल्या. पटकन दुकानासमोर उभं राहून चेहऱ्यावरून पाण्याने हात फिरवून परत आत आल्या. साक्षी आता शिरा खाण्यात गुंग झाली होती. काकी पुन्हा बोलू लागल्या, " कीर्ती गेली तेव्हापासून मला भेटणाऱ्या प्रत्येक नोकरदार तरूणीत मला तीच दिसते. अशा तरूणींना मी माझ्या परीने शक्य तितकी मदत करते आणि मीच माझ्या मनाचं समाधान करून घेते."
सायलीदेखील गंभीर झाली होती. काय बोलावं ते तिला सुचत नव्हतं. अचानक दोनचार ग्राहक एकदम दुकानात आले. त्यांना काय हवे ते बघण्यात काकी गढून गेल्या. जराशी सवड सापडली तेव्हा सायली इतकंच म्हणाली, " उद्याची तयारी करायचीए काकी. निघते. " साक्षीने आनंदाने काकींना टाटा केला आणि दोघी मायलेकी निघाल्या. सायली जाताजाता मनात विचार करत होती काकी प्रत्येकीत त्यांच्या कीर्तिला बघतात. मीदेखील काहीतरी करू शकते! मनातले विचार हळूहळू स्पष्ट होत गेले आणि तिला वाटलं, " काकी करतात ते सारंकाही लेकीसाठी. आता मीही करेन त्यांच्यातल्या आईसाठी!"
सुधीर गाडे, पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
तुमचं लेखन इतकं सुरेख आहे की सगळी पात्र डोळ्यासमोर उभी राहिली ,आणि वंदना काकी सदैव स्मरणात राहतील.. 🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteखूपच छान आणि मन हेलावून टाकणारी कथा. आपल्यावर कोसळलेल्या दुःखातून सावरायचा एकमेव उपाय म्हणजे समदु,:खी माणसाचे दुःख निवारण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे हा संदेश आपण आपल्या कथेतून दिला आहात. आपले दुःख निवारण करण्याचा यापेक्षा दुसरा कुठलाही चांगला उपाय असू शकत नाही. सरांच्या लेखन शैलीचे खूप खूप कौतुक. धन्यवाद सर.
ReplyDeleteडॉक्टर नमस्कार आणि आभार!
Deleteसुंदर लिहिलं आहे सर, चित्र डोळ्या समोर आले 👌🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Delete