जादूटोणा ?!
जगामध्ये चमत्कार, जादूटोणा यांची खूप चर्चा होत असते. आहेत की नाहीत अशा दोन्ही बाजूंनी भरपूर सांगितले जाते. परंतु जगभर याप्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. जनमानसावर त्याचा विलक्षण पगडा असतो. विशेषतः ऐतिहासिक काळात तर याबाबत बरेच गूढ वातावरण होते. इतके की एका माहितीनुसार युरोपमध्ये चौदावे ते अठरावे शतक या मध्ययुगीन काळात हजारो जणांवर खटले चालवले गेले . त्यातील अनेकांना दोषी ठरवून जिवंत जाळणे, शिरच्छेद किंवा फाशी अशा शिक्षा देण्यात आल्या. भारतातही गौड बंगाल, काळी जादू, जादूटोणा, भानामती या नावांनी अशा गोष्टी प्रचलित आहेत.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
सध्याचे हिंदी भाषेतील आघाडीचे लेखक, चित्रपट कथाकार श्री.अक्षत गुप्ता यांच्या काही मुलाखती नुकत्याच ऐकल्या. त्यामध्ये त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. २०१४ पासून त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या. घटस्फोट झाला, चांगला चालत असलेला हॉटेल व्यवसाय नुकसानीत गेला, अपघात झाला,आत्महत्येचाही अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या धाकट्या भावाने यावर तोडगा काढण्यासाठी कर्नाटकात शिवमोगा या शहराजवळ एका बाबांना भेटायला जाऊया असा आग्रह धरला. पण त्यांचा विश्वास नसल्याने ते गेले नाहीत. भाऊ आणि वहिनी गेले. त्या बाबांनी हा तुमच्या जवळच्या व्यक्तिने केलेला जादूटोण्याचा प्रकार आहे. थांबवता येणार नाही पण उलटवता येईल असे सांगितले. अक्षत यांच्या भावाने तसे करायला सांगितले. त्या बाबांनी सांगितले, "मंत्राने मी तो उलटवला आहे. लवकरच ज्याने तो केला आहे त्याच्या आयुष्यात अशाच गोष्टी होतील. त्यावरून कोणी हा प्रकार केला आहे हे तुम्हाला समजेल. " अक्षत गुप्ता म्हणाले, " अगदी तसेच झाले. आमच्या जवळच्या एका व्यक्तिच्या आयुष्यात त्याच क्रमाने गोष्टी घडल्या. ती व्यक्ती दूर गेली आणि माझे आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलून गेले. हा माझा वैयक्तिक अनुभव असल्याने याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे."
अशाच प्रकारची एक घटना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात नोंदवली गेली आहे. या काळात स्वामीजी काश्मीरमध्ये वास्तव्यास होते. तेव्हा एक मुस्लिम व्यक्ती स्वामीजींच्या संपर्कात आला. स्वामीजींच्या विचारांनी तो भारून गेला. सतत त्यांच्यासोबत राहू लागला. तेव्हा त्याचा जो उस्ताद होता तो संतापला. त्याने स्वामीजींवर करणी केली. त्याचा स्वामीजींना खूप त्रास होऊ लागला. तो टाळण्यासाठी स्वामीजींनी आपले काश्मीरमधील वास्तव्य आटोपते घेतले आणि ते पुढे मार्गस्थ झाले.
ऐतिहासिक काळात अशी आणखी एक गोष्ट नोंदवली गेली आहे. औरंगजेब याच्या आज्ञेने मिर्झा राजा जयसिंग हे शिवाजी महाराजांवर चालून येऊ लागले. या स्वारीसाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच हे त्यांचे उद्दिष्ट होते. छावणी बुऱ्हाणपूर येथे पडली असताना तेथील एका मांत्रिकाबाबत त्याने ऐकले. मांत्रिकाने चेटूक करण्याची तयारी दाखवली. पण चेटूक करताना शिवाजी महाराजांची निश्चित जन्मतिथी माहिती पाहिजे अन्यथा हे चेटूक उलटेल असे त्या मांत्रिकाने सांगितले. जयसिंगाने मिळालेली माहिती खरी मानून ती सांगितली. चेटूक झाले. पण नंतर काय इतिहास घडला तो सर्वांना माहित आहे. शिवरायांची जन्मतिथी चुकीची सांगितली गेली होती. सुरूवातीला विजयी भासणारी मोहिम शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेनंतर पराभवाची ठरली. संशयी, पाताळयंत्री औरंगजेबाने जयसिंग शिवरायांना सामील झाले आहेत असा समज करून घेतला. जयसिंगाच्या दिवाणाला प्रलोभने दाखवून फितवले. या दिवाणाने जयसिंगावर विष प्रयोग केला. रक्ताच्या उलट्या होऊन जयसिंगाचा बऱ्हाणपुरातच मृत्यू झाला. हा प्रकार समजल्ययावर जयसिंगाची मंडळी दिवाणाच्या मागे लागली. पण त्याने मुसलमान धर्म स्वीकारून स्वतःचा जीव वाचवला. जयसिंगाने करवलेले चेटूक त्याच्यावरच उलटले.
वेगवेगळ्या कालखंडातील अशा प्रकारच्या घटना वाचल्या त्यात योगायोग किती आणि खरेच घडवून आणले का असा विचार करून बुचकळ्यात पडायला होते. विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
सुधीर गाडे, पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
अतिशय रंजक इतिहासात घडलेले दाखले जेणेकरून हा लेख अतिशय रंजक झाला आहे धन्यवाद सर🙏
ReplyDeleteआभारी आहे सर🙏🙏
Deleteअतिशय सुंदर लेखन
ReplyDelete