पुस्तके विकणारे गुरूजी
( काल्पनिक कथा )
" अहो, आज आठवडी बाजाराला गेला नाहीत तर चालणार नाही का?" माईंनी विचारलं. पण आबा म्हणाले, " इतक्या वर्षांची सवय अशी आज बरं थांबवता येईल." " अहो, नेहमीची गोष्ट वेगळी पण चारच दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधान इंदिराजींची हत्या नाही का झाली. सगळीकडे कसं तणावाचं वातावरण आहे. एक रविवार गेला नाहीत तर फार काही बिघडणार नाही." माई म्हणाल्या. "अगं, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे असं संतवचन आहेच ना! स्वीकारलेले काम चालू ठेवायलाच हवे. " आबा उत्तरले. " बघा बाई, मी तर सांगितले. पण तुम्ही ऐकतच नाही!" माई नाईलाज होऊन नाराजीने बोलल्या. आबांची निघायची तयारी सुरूच राहिली.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
आबा आणि माई एका छोट्याशा खेड्यात राहत होते. आबांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले होते. ते पूर्ण करून आबा जवळच्या एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. वारकऱ्यांच्या घरात जन्मलेल्या आबांच्या गळ्यात घरच्या रीतीनुसार लहानपणीच तुळशी माळ घातली गेली होती. तेव्हापासून एकादशीचा उपवास कधी चुकला नव्हता. महाविद्यालयात शिक्षण चालू असताना दोन चार वेळा आषाढी वारीपण घडली होती. नंतर शिक्षकाची नोकरी सुरू झाली आणि रजा मिळेनाशी झाली. त्यामुळे वारीला जाता येत नसे. पण वारीच्या आधीच्या किंवा नंतरच्या रविवारी जाऊन आबा पंढरपूरला जाऊन विठोबाच्या पायावर डोकं टेकवून येत. रोजचा हरीपाठ कधी चुकला नाही. दरवर्षी गावात होणाऱ्या ज्ञानेश्वर पारायण सप्ताहात आबांचा मनापासून, श्रद्धेने सहभाग असायचा.
यथावकाश लग्न झालं. चालीरीती, सणवार, प्रथा परंपरा पाळणाऱ्या सुसंस्कृत घरातील माईंनी आबांच्या घरात प्रवेश केला. संसाराचा गाडा पुढे चालू लागला. संसारवेलीवर दोन मुलांच्या रूपाने फुलेदेखील उमलली.
उंचेपुरे, गोरेपान, धोतर, सदरा, टोपी घातलेले, टिळा लावलेले आबा दररोज सायकलवर बसून शाळेत जात असत. आपल्या विद्यार्थ्यांना भाषा, संस्कृती परंपरा याची माहिती व्हावी यासाठी खूप खटपट करीत.
आपण अजून काहीतरी केलं पाहिजे असं त्यांच्या मनात नेहमी येई. काय करावे म्हणजे केवळ विद्यार्थी सोडून सर्व लोकांना फायदा होईल असा विचार नेहमी त्यांच्या मनात चालत असे. या विचारातूनच त्यांना एक कल्पना सुचली की पुस्तकांच्या माध्यमातून समाजामध्ये या सगळ्या गोष्टी पोहोचवणं सोपं होईल. या विचाराने मनात घर केले आणि आबांनी तयारीला सुरुवात केली. छोट्या गावात जास्तीत जास्त लोक नेहमी कधी एकत्रित असतात तर आठवडी बाजार हे ठिकाण. त्यामुळे आठवडी बाजारात पुस्तक विक्रीचे दुकान लावायचे त्यांनी ठरवले. त्यांच्या गावाच्या जवळच आठवडी बाजाराचे ठिकाण होते. दर रविवारी मोठा भाजी बाजार तेथे भरत असे. या बाजारातच दुकान थाटायचे त्यांनी ठरवले. थोडे पैसे जमवले. मोठ्या शहरात जाऊन पुस्तके विकत आणली. त्यामध्ये प्रामुख्याने संत साहित्य, संतांची चरित्रे, बोधपर पुस्तके अशी त्यांनी विकत आणली. दोन मोठ्या थैल्या भरून पुस्तके झाली. आता हे दुकान कुठे लावायचं? आठवडी बाजारच्या गावी एका व्यापाऱ्यांशी बोलून त्यांच्या दुकानासमोर हे दुकान लावायचं ठरवलं. पुस्तकांच्या दुकानांबरोबरच, देवदेवतांच्या तसबिरींची विक्री करण्याचेदेखील त्यांनी ठरवले. आबांना सोयीचे म्हणजे हा बाजार रविवारी भरायचा. त्यामुळे शाळेतून वेगळी सुट्टी घेण्याची गरज नव्हती. रविवारच्या सुट्टीचाच उपयोग होणार होता.
आबांनी दुकान लावायला सुरुवात केली. काही दिवस लोकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या. कुणी काहीबाही शेरे मारले. कुणी प्रोत्साहन दिले. पण आबांनी त्याकडे विशेष लक्ष न देता आपले काम सुरू ठेवले
हळूहळू त्या आठवडी बाजारात आबांच्या पुस्तकविक्रीच्या दुकानाने वेगळे स्थान निर्माण केले. कारण त्या बाजारात पुस्तक विकत मिळण्याचे ते एकमेव ठिकाण होते. लोक येत जात असत. पुस्तके चाळत असत. कुणी कुणी विकतही घेत असत. आबांचा लोकसंग्रह त्यानिमित्ताने वाढू लागला. त्यांच्या धडपडीला थोडे फळ मिळाले.
जवळपास वीस पंचवीस वर्षे आबा हे काम करीत होते. मग एके दिवशी सुरुवातीचा संवाद घडला. परंतु आपण घेतलेला वसा कशीही परिस्थिती असली तरी चालू ठेवायचा या निर्धाराने आबा त्यादिवशी देखील बाजारात गेले. सर्वत्र घडलेल्या हत्येचीच चर्चा सुरू होती. परंतु आबांनी मात्र आपले दुकान सुरू ठेवले.
वयोमानानुसार शाळेतून निवृत्त झाल्यानंतरदेखील आबा पुस्तक विक्रीचे दुकान चालवत असत. त्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या, नोकरीच्या वेगळ्या वाटा धरल्या. गावातून ते शहरात नोकरीला गेले. हळूहळू आबा थकले आणि आता या दुकानाचे काय करायचे? पूर्वीसारखे कष्ट झेपत नाहीत असे त्यांना वाटत होते. बाजारात येणारे गावकरीदेखील हे बघत होते. बोलता बोलता एके दिवशी एका तरुणापाशी हा विषय निघाला आणि तो म्हणाला, " आबा, तुमच्याकडची पुस्तके वाचून मी मोठा झालो. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी समजल्या. तुमचा हा वसा मी पुढे चालू ठेवतो." आबांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. त्या तरुणाने पुस्तक विक्री हातात घेतल्यानंतरही आबा जमेल तसे तेथे जात असत. त्याला मदत करत असत. एक चांगले काम पुढे चालू राहिल्याचा आनंद ते अनुभवत राहिले. एका कृतार्थ अनुभवाने त्यांचे आयुष्य संपन्न झाले.
सुधीर गाडे, पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
खूप छान व उद्बोधक कथा..
ReplyDeleteसर धन्यवाद
Deleteप्रेरणादायी 👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखूप वास्तववादी कथा..
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete