व्यसन सोडण्याचा क्षण

       'एकच प्याला' हे राम गणेश गडकरी यांनी विसाव्या शतकात लिहिलेले अतिशय प्रसिद्ध संगीत नाटक आहे. व्यसनामुळे माणसाच्या आयुष्याची कशी धूळधाण होते हे या नाटकाचे सूत्र आहे. नवरा कसाही असला तरीही तो म्हणजेच सर्वस्व ही पारंपरिक हिंदू विचारसरणी आत्मसात करणारी पत्नीदेखील या नाटकात दाखवली आहे. सुप्रसिद्ध कलाकार बालगंधर्व यांनी ही भूमिका अजरामर केली आहे. " दारू सोडण्याचा क्षण हा दारूचा पहिला प्याला उचलण्यापूर्वी असतो." या नाटकात अशा आशयाचे एक व्याक्य आहे. एकदा व्यसन‌ लागले की ते सुटत नाही असे सांगणारे हे वाक्य. पण याला काही अपवादही असतात. 


         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

           सुप्रसिद्ध कलाकार अमिताभ बच्चन यांचे वडील हरीवंशराय बच्चन हे ख्यातनाम हिंदी कवी. पण अमिताभ यांनी चित्रपट सृष्टीत आपले आयुष्य घडवायचा निर्णय घेतला‌. तत्कालीन पंतप्रधान यांची मैत्रीण असलेली‌ आपली आई तेजी बच्चन अथवा वडील यांची शिफारस न घेता स्वतःच्या क्षमतेवर कामे मिळवायची असा अमिताभ यांचा ठाम निर्णय. परंतु आपल्या व्यावसायिक आयुष्यच्या सुरूवातीला त्यांना फारशा भूमिका मिळेनात. याच दरम्यान दारू सिगारेट यांच्या व्यसनाला सुरूवात झाली. अशातच एक चित्रपट मिळाला 'सात हिंदुस्थानी ' . यात एक भूमिका मिळाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सहकलाकर अन्वर यांच्या सोबत एका संध्याकाळी अमिताभ दारू पिण्यासाठी गेले. तेव्हा अन्वर म्हणाले, " तुझ्यात खूप क्षमता आहेस. तू खूप प्रगती करशील पण त्यासाठी व्यसन सोडायला हवे. " हे वाक्य अमिताभ यांच्या मनावर कोरले गेले. क्षणार्धात मनाचा निश्चय झाला आणि त्याक्षणी त्यांनी दोन्ही व्यसने सोडली. अमिताभ यांचे पुढचे यशस्वी आयुष्य सर्वांना माहिती आहेच.

        अशीच एक गोष्ट मला काही वर्षांपूर्वी समजली. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुढारी. त्यांचा मतदारसंघ राखीव झाला. त्यांना स्वतःला तिथून निवडणूक लढवता येणार नव्हती. पण ज्याच्यावर पूर्ण विश्वास टाकता येईल अशा माणसाचा शोध त्यांनी सुरू केला. असा माणूस त्यांना सापडला. त्यांच्याच शिक्षण संस्थेत नोकरी करणारे शिक्षक त्यांच्या लक्षात आले. त्या शिक्षकांना बंगल्यावर बोलावून घेण्यात आले हे सगळे होईतोपर्यंत रात्र झाली होती. आपल्याला साहेबांनी का बोलावले याची कोणतीही कल्पना त्या शिक्षकांना नव्हती. परंतु साहेबांचा दरारा एवढा होता की आपल्या हातून काहीतरी नक्कीच चूक झाली म्हणून आपल्याला एवढ्या रात्री बोलावले असे शिक्षकांना वाटले. ते बंगल्यावर पोचल्यानंतर त्यांनी साहेबांचे पाय धरले आणि, " माफ करा! माफ करा !" असा जप सुरू केला. साहेबांनी त्यांच्या खांद्याला धरून त्यांना उभे केले आणि ते म्हटले, " माफ करा म्हणण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही लोकप्रतिनिधी होणार." त्या शिक्षकांना विश्वास बसला नाही. परंतु साहेबांनी त्यांना सर्व समजावून सांगितले आणि साहेबांनी पुढचा प्रश्न विचारला, " आता दारू कधी सोडणार?". साहेबांना सर्वच माहिती होते. शिक्षकानीदेखील क्षणार्धात विचार केला आणि सांगितले, " आतापासून सोडली." खरच तेव्हापासून जवळपास पंधरा वर्षे शिक्षक निर्व्यसनी आहेत. हा क्षण त्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरला. अर्थातच ते त्या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. आता परत परत निवडून येतात. 

      परंतु अशी उदाहरणे ही अगदी कमी. काही जणांच्या बाबतीत व्यसन सुटायला उशीर होतो. माझ्या माहितीचे एक शिपाई. व्यसन लागले . त्यात वाहवत गेले. परंतु एका टप्प्यावर जाणीव झाली. 'अल्कोहोलिक ॲनोनिमस' या व्यसनविरोधी संस्थेशी संबंध आला. व्यसन सोडले. परंतु उशीर झाला होता. त्या व्यसनातूनच त्यांचा मृत्यू ओढावला. समाजातील सध्या परिस्थिती भयंकर आहे. हीपरिस्थिती बघता हे चित्र 'आणखी किती बिघडणार?' असा एक प्रश्न मनात सतत येत राहतो. अशा वेळी अपवादांसारखी आढळणारी ही उदाहरणे काळ्याकुट्ट अंधारात उजळलेल्या पणतीसारखी वाटतात!

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा.‌ त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. श्री.अतुल ऐनापुरे यांनी लिहिले.

    अतिशय चांगला लेख. हा नक्कीच वाचकाला चांगले विचार देईलच. तसेच निर्व्यसनी बनण्यास प्रोत्साहन देईल. फॅशन किंवा तथाकथित शिष्टाचार म्हणून सुरू केलेली दारू कधी व्यसन बनते ते भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. आता आरोग्यासाठी जागरूकता खूपच वाढली आहे. धूम्र व मद्यपान कमी होऊन शुद्धीकारक detox पेय, हर्बल चहा, विना-साखर-दूध ब्लॅक कॉफी, एकभुक्त किंवा प्रतिदिन दोनदा जेवण (नंतर पाण्याव्यतिरिक्त न खाणे पिणे) , योगासने, व तत्सम यांची लोकमान्यता / आवड वाढत आहे.
    आता सर्वांना याची जाणीव झाली आहे की दारू कितीही कमी प्रमाणात घेतली तरी त्याचा आरोग्यावर वाईटच परिणाम होतो.
    असे असतानाही दारूविक्री दुकान कितीही छोटे व अनाकर्षक असले तरी संध्याकाळी ते उशिरा रात्री पर्यंत उडालेली झुंबड ही अनाकलनीय आहे.

    ReplyDelete
  2. डोळ्यामध्ये अंजन घालणारा लेख अतिशय सुंदर सादरीकरण.... व्यसन कुठलंही शरीराला घातकच आहे.🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख