आगळी राखीपौर्णिमा

                      कथा

       " ताई, अगं राखी पौर्णिमेला तू येशील. परंतु मला ओवाळून घ्यायला जागा कुठंय? इथे माझ्या खोलीवर काही व्यवस्था नाही." शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाचं वाक्य जयवंतरावांच्या कानावर आदळलं आणि त्यांनी चमकून पाहिलं. एक विशीतला तरुण त्याच्या मोबाईलवर बोलत होता. पुढे जाणारे जयवंतराव तिथंच थबकले. थोडा वेळ ते तिथेच थांबले. काही मिनिटांत त्या तरुणाचं बोलणं संपलं. जयवंतराव त्याच्याकडे बघतच होते. त्याच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. ते त्याच्या जवळ गेले आणि विचारू लागले, " अरे मुला, काय झालं?" त्या तरुणांना सांगितलं. शिकण्यासाठी तो शहरात आला होता. हे त्याचं पहिलंच वर्ष. एका खोलीवर राहून तो शिकत होता. राखीपौर्णिमेला घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याच्या बहिणीचा फोन त्याला आला होता. " राखी पौर्णिमेला तू येत नाहीस तर मी तिकडे येऊन तुला राखी बांधते." असं ती म्हणत होती. पण राखी कुठे बांधणार कारण त्याच्या खोलीवर तशी व्यवस्था नव्हती.


( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)

       सगळा प्रकार जयवंतरावांच्या लक्षात आला. त्यांचंही मन व्याकुळ झालं. नुकतंच त्यांच्या बहिणीचं निधन झालं होतं आणि आता ही पहिलीच राखीपर्णिमा. आता त्यांची आक्का राखी बांधण्यासाठी या जगात नव्हती. वेगळ्या परिस्थितीत या तरुणावरही तीच वेळ आली होती. काय करावे बरं असं त्यांच्या मनात आलं. मग त्यांनी चौकशी सुरू केली आणि त्यांच्या लक्षात आलं की परिसरात अशी अनेक तरुण मुलं-मुली राहतात. त्यांना राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या बहीण भावाबरोबर राखी पौर्णिमा साजरी करता येणार नव्हती. काय करावे याचा विचार जयवंतरावांच्या मनात सुरू झाला. त्यांनी त्या तरुणाचं नाव, त्याचा शहरातला पत्ता त्याचा फोन नंबर आपल्या जवळ घेतला. " निघेल मार्ग काहीतरी." असं बोलून ते पुढे निघाले. 

      पण त्याच्या मनातलं विचार काही थांबले नाहीत. घरी पोहोचल्यावरदेखील ते अस्वस्थ होते. काय करावे म्हणजे या सर्व मुलामुलींच्या अडचणीवर मार्ग निघेल या विचारातच ते बुडालेले होते. रंजनावहिनी त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होत्या. त्यांचं कशात लक्ष नाही हे त्यांनी बरोबर ओळखले. थोडा वेळ धीर धरला. जयवंतरावांनी स्वतःहून सांगण्याची त्या वाट पाहिल्या वाहत राहिल्या. थोड्या वेळाने जयवंतराव स्वतःच बोलू लागले. त्यांनी आपली पत्नी रंजना हिला सर्व परिस्थिती सांगितली आणि आता याच्यातून मार्ग कसा काढायचा हे सुचत नाही हेही सांगितलं. रंजनावहिनी म्हणाल्या, " त्यात काय एवढं? त्या मुलाला आपल्या घरी बोलवा. आपल्या घरीच त्याची राखी पौर्णिमा करू." " अगं,पण प्रश्न एकट्याचा नाही. अशी ४०-५० मुलं मुली आजूबाजूला राहतात. आपण एकटे त्यांच्यासाठी काय करू शकणार?" जयवंतराव म्हणाले. रंजनाताईंनादेखील प्रश्नाची जाणीव झाली. त्याही विचारात पडल्या. " बघूया काहीतरी." असं जयंतराव म्हणाले आणि रात्रीचं जेवण करून झोपी गेले. 

     दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच त्यांना जाग आली. अजून रंजनाताई उठायच्या होत्या . पण ते उठून आवरावरी करू लागले. थोड्या वेळात रंजनाताई उठल्या आणि नेहमीच्या कामाला लागल्या. पण जयवंतरावांकडे बघताना त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं सुचल्याची चमक दिसतेय हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी विचारलं, " अहो विचार काय?" जयवंतराव म्हणाले , " दुपारी परत आलो की सांगतो." कामाच्या धबडग्यात रंजनाताईदेखील विसरून गेल्या. सगळं आवरून जयवंतराव नेहमीसारखे बाहेर पडले ते दुपारीच घरी जेवायला आले. आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ते म्हणाले, " अगं ऐकलस का? व्यवस्था झाली." " कशाची?" "अगं, राखी पौर्णिमेची!" " म्हणजे काय?" " अगं, म्हणजे आपल्या शेजारच्या मंदिराच्या विश्वस्तांशी मी बोललो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनादेखील या प्रश्नाची माहिती झाली. मी सुचवलं आपण आपल्या मंदिरात अनेक कार्यक्रम आपण करत असतो. त्यातच हा एक राखी पौर्णिमेचा कार्यक्रम. थोडा वेळ चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं. आता या मुला-मली सोय झाली बर का." " अगबाई बरं झालं. मी एक सांगू का? या सगळ्या मुलांसाठी आपण त्या दिवशी थोडी गोडाधोडाची व्यवस्था करूया." " अगदी माझ्या मनात मनातलं बोललीस." जयवंतराव खुश होऊन म्हणाले. 

   जयवंतराव आता कामाला लागले. त्यांनी लगेच त्या मुलाला, अनिलला, फोन केला त्याला सर्व सांगितलं आणि आपल्या घरी भेटायला बोलवलं. तोही लगबगिने आला. तो म्हणाला, " काका, मी माझ्या ओळखीतल्या बाकीच्या मुला-मुलींना देखील सांगतो. पण मला माहित नसलेले आणखी काही मुलं-मुली या भागात शिक्षणासाठी राहतात. त्यांना कसं हे कळेल?" जयवंतराव म्हणाले, " खरंच की!". त्यावर तो म्हणाला, " मी एक सुचवू का ?" "सांग ना." " आपण बॅनर तयार करून घेऊ. त्यावर सर्वांसाठी ही माहिती लिहू आणि परिसरात दोन चार ठिकाणी हे बॅनर लावू." "अरे वा!, चांगली कल्पना सुचवली स तू. आता याची जबाबदारी तुझीच आणि याचा सगळा खर्च मी करणार बरं." मग काय जयवंतराव, अनिल आणि त्याचे मित्र मंडळ सगळेच कामाला लागले. परिसरात बॅनर लागले. या आयोजनाबद्दल सर्व मुला मुलींना कळालं. निरंजन ,आरतीच ताट, हळद कुंकू या सगळ्याची व्यवस्था मंदिरात येणाऱ्या भाविकांनी स्वतःकडे घेतली. जयवंतरावंनी रंजनाताईंच्या सूचनेनुसार सर्वांचे तोंड गोड करायचं म्हणून पेढ्यांची व्यवस्था केली. राखी पौर्णिमेचा दिवस उजाडला आणि सकाळपासूनच जयवंतराव ,अनिल या सगळ्यांची धांदल उडाली. सकाळपासूनच भाविकांबरोबर या भावा-बहिणीची मंदिरात ये ज सुरू झाली. जयवंतराव अतिशय आनंदाने या सगळ्यात सहभागी झाले.  दुपारच्या सुमाराला अनिलची बहिण आली. अनिलने जयवंतरावांशी तिची ओळख करून दिली. जयवंतराव म्हणाले, ," गुणी आहे बर का तुझा भाऊ. सगळ्या कामात त्यानं मला खूप मदत केली." तिलादेखील आनंद झाला. 

      जयवंतराव दिवसभर मंदिरातच थांबले होते. काय हवं नको यात स्वतः लक्ष घालत होते. रंजनाताईंनीदेखील त्यांना घरी येण्याचा आग्रह केला नाही. रात्री उशिरा ते घरी पोहोचल्यावर रंजनाताईंनी त्यांना प्रेमाने जेवायला वाढलं. एक आगळी राखी पौर्णिमा साजरी केल्याचं समाधान नवरा-बायकोच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते.


सुधीर गाडे पुणे 


( पुण्यातील नवी पेठ विठ्ठल मंदिरातील राखीपौर्णिमे बाबत लावलेला फलक पाहून सुचलेली कथा जयवंतराव रंजनाताई ,अनिल ही नावे काल्पनिक आहेत.)


( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. खूपच छान कथा. असे उपक्रम गावोगावी झाली पाहिजेत.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. बऱ्याच शहरात खोली करून राहणाऱ्या मुलांची अशी अडचण होते.

      धन्यवाद डॉक्टर!

      Delete
  2. छान उपक्रम आहे

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लेखन केले सर.... 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख