खेळ नियतीचा
( काल्पनिक कथा )
कागदावर लिहिलेल्या गोळ्यांचं नाव आणि संख्या वाचून औषधांच्या दुकानदारानं मोठ्या आवाजात विचारलं " अरे तुझं नाव काय? पत्ता सांग." "सांगतो ना." असं विशाल म्हणाला. तेवढ्यात त्याची नजर दुकानदाराच्या चेहऱ्यावर गेली आणि त्याच्या हातातील कागद पेनदेखील विशालने पाहिला. काहीतरी गडबड होते आहे हे ध्यानात आले आणि त्याने लगबगीने दुकानदाराच्या हातातला औषधाचा कागद ओढला आणि तो पसार झाला. दुकानदार आपला नाव पत्ता घेऊन पोलिसांना सांगणार हे विशालच्या लक्षात आल्याने तो पसार झाला होता.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
दुकानापासून थोड्या दूर असलेल्या एका गल्लीत जाऊन तो उभा राहिला आणि काय काय झाले ह्याचा विचार करू लागला. काही दिवसांपूर्वीची आपली मनस्थिती त्याला आठवली.
" संपवावं आता सगळं. " विशालच्या मनात विचार आला. एक क्षणभर तो दचकला आणि हा कसला विचार आपल्या मनात आला म्हणून चमकला. हा विचार झटकून टाकायचा प्रयत्न त्याने केला. पण हळूहळू या विचाराने त्याच्या मनात घर केले. आतापर्यंत आपण काय करू शकलो? हे त्याच्या मनात येऊ लागले. दादा माई यांनी कष्ट करून, गरीबीत दिवस काढून आपल्याला शिकवले. आपल्या सगळ्या इच्छा जमेल तशा पूर्ण करायचा प्रयत्न केला. नोकरीसाठी आपण किती खटपट केली. पण जिकडं तिकडं अनुभव, वशिला ओळखपाळख यापैकी काहीच नसल्याने कुठेही डाळ शिजली नाही. बऱ्याच महिन्यांनी नोकरी लागली. पण तिथल्या अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे ती गेली सुद्धा! परत ठीकठिकाणी अर्ज करणे सुरू झाले. दादा माई यांनी तर हायच खाल्ली. पुन्हा काही ते नीट सावरले नाहीत. नोकरी लागण्याची वाट बघून बघून बघून शेवटी गेले बिचारे! धीर देणारी मैत्रीण म्हणून संजना पाठीशी होती. एकमेकांच्या प्रेमाच्या आणाभाकादेखील झाल्या होत्या. पण तिच्या घरच्यांनी तिचं एक चांगली नोकरी करणारा मुलगा बघून एके दिवशी तिचं लग्न लावून दिलं. ज्यांच्यासाठी जगावं असं आत आता आयुष्यात काहीच राहिले नाही या विचाराने तर आपण इथपर्यंत आलो. मरण्याचा कमीत कमी वेदनादायक पर्याय म्हणून झोपेच्या गोळ्या विकत घ्यायला गेलो तर तिथे हा प्रकार!
संध्याकाळ झाली होती. असे प्रयत्न सोडून चालणार नाही हे त्याच्या मनाने घेतले. आता कोणता मार्ग निवडायचा याचा तो विचार करू लागला. तेव्हा त्याला आठवले की आपल्या खिशात बऱ्याच दिवसांपासून एक ब्लेड ठेवलं आहे. आता ते मनगटावर फिरवून नस कापून घ्यायची म्हणजे संपेल सारं. तो इकडे तिकडे बघू लागला. दिवेलागण झाली होती. लोक लगबगीने इकडे तिकडे करत होते. या गर्दीत असं करायला लागलो तर कोणी ना कोणी आपल्याला आडवेल हे लक्षात घेऊन विशाल निवांत जागा शोधू लागला. चालतचालत थोडे दूर आल्यानंतर एक दुमजली इमारत त्याला दिसली. बाहेरच्या पटांगणात थोडी जागा होती. तिथे एका झाडाच्या आडोशाला उभे राहता येईल हे त्याने हेरले. तिथे तो पोचला आणि मनगटावर ब्लेड फिरवू लागला. पण बरेच दिवसांपूर्वीचे ब्लेड असल्याने त्याची धार निघून गेली होती आणि हातावर थोडा ओरखडा उमटण्यापलीकडे दुसरे काही झाले नाही. हात तिच्या हादेखील प्रयत्न फसला. आता काय करावे असा विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात , "थांब! असा जीव देऊ नको. काहीतरी करून दाखव!" असे शब्द त्याच्या कानावर पडले आणि चमकून तो इकडे तिकडे पाहू लागला. तर शेजारच्या इमारतीत एक समाजसेवी संस्था होती. तिथे एक कार्यक्रम चालू होता. त्या कार्यक्रमात चाळीशीतील एक माणूस उभा राहून बोलत होता. त्याचे शब्द आपल्या कानावर पडले हे विशालच्या लक्षात आले. जीव देण्याचा उल्लेख आल्याने तो कान टवकारून ऐकू लागला. बोलणारा माणूस आपल्या मनात विचार कसे आले आणि आपण त्यातून बाहेर पडून कसा मार्ग काढला हे सांगत होता. त्याचे बोलणे ऐकता ऐकता विशालच्या मनात आले , 'आपलेदेखील आयुष्य या माणसाच्या पूर्वायुष्यासारखे अपयशीच आहे. पण त्याच्या आयुष्यात त्याने संयमाने, धीराने मार्ग काढला आणि तो आता चांगले आयुष्य जगतो आहे. मी देखील जगू शकतो. मी देखील काहीतरी करू शकतो.' विशालच्या मनात या विचाराने उचल खाल्ली.
आता मरण्याचा विचार सोडून द्यायचा, जगण्याचा विचार करायचा म्हणून निश्चयाने विशाल परत वस्तीकडे जाऊ लागला. काही वेळातच धाडदिशी आवाज झाला. "मेला! मेला!" म्हणून लोक आरडाओरडा करत धावून आले. गर्दी जमली. एका पैसेवाल्या माणसाच्या तरुण मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून विशालला धडक दिली होती. काही अंतर फरपटत नेले होते. शेवटी रस्ते दुभाजकाला धडकून गाडी थांबली. जगण्याचा विचार करणाऱ्या विशालला अचानक मृत्यूने उचलून नेले होते.
सुधीर गाडे, पुणे
( प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ हेन्री याच्या कथेवरून प्रेरित )
( कथा आवडल्यास कृपया पुढे पाठवा. यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteहृदयस्पर्शी कथा.. पण ज्याने मृत्यूचा विचार सोडून पुन्हा जगण्याचा मार्ग पत्करला त्याच्या बाबतीत असं होणं मनाला चटका लावून जातो..
ReplyDeleteछान कथा 🙏
सर धन्यवाद
Delete