प्रतिसाद (भाग ३)
पंडित गुणनिधी यांनी शेठ हिरालाल यांच्या घरच्या कार्यक्रमात बिदागीची थैली परत केली या प्रसंगाला आता पुष्कळ दिवस उलटून गेले होते. घडलेल्या प्रसंगामुळे शेठजी अतिशय अस्वस्थ होते. आपला खूप मोठा अपमान झाला असे त्यांना वाटत होते. परंतु उद्योगाचे व्याप नेहमीसारखेच सुरू राहिले . त्या धावपळीत या प्रसंगाची आठवणीत बुडून जाणे शक्य नव्हते. या धावपळीतून मधे मधे थोडे निवांत क्षण मिळाले की या प्रसंगाची आठवण पुन्हा वर येई. या प्रसंगाची आठवण झाली की कोणीतरी आपल्याला टोचते आहे अशी भावना शेठजींच्या मनात येत. हा प्रसंग घडल्या नंतरच्या दिवसात तर ही टोचणी अतिशय तीव्र होती. परंतु काळ हे दु:खावरचे औषध आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही. जसजसे दिवस उलटून गेले तसतशी ही टोचणी थोडी बोथट होत गेली. परंतु झालेल्या घटनेमुळे मनावर जो ओरखडा उमटला होता तो त्याचा व्रण मात्र कायम राहिला होता.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
आणखी काही दिवस गेले आणि मुकुंद गायन सभेच्या कार्यक्रमात पंडितजींनी ठरलेली मैफिल संपल्यावर पुन्हा एकदा कोणतीही वेगळी बिदागी न घेता लगेच दुसरी मैफिल केली ही बातमी शेठजींपर्यंत पोचली. ही बातमी हस्ते परहस्ते शेठजींपर्यंत पोचली. मानवी स्वभावानुसार या बातमीत काही जणांनी आपल्या कल्पनेने भोर टाकली. ही टाकलेली भर या प्रसंगाला अधिकच उठावदार करणारी ठरली. आपल्या संपत्तीला पंडितजी काहीही किंमत दिली नाही अशा प्रकारची भावना पुन्हा एकदा शेठजींच्या मनामध्ये निर्माण झाली. ही बाब अधिकच अस्वस्थ करणारी होती. कारण मानवी स्वभावाचा एक पैलू असा की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही आणि ती दुसऱ्याला मिळाली तर त्यामुळे अधिकच दुःख होते. अपमान झाल्याची भावना मनामध्ये निर्माण होते. एखाद्या विझत चाललेल्या आगीमध्ये पुन्हा एकदा तेल टाकले जावे आणि त्या आगीचा पुन्हा एकदा भडका उडावा अशी स्थिती झाली. अपमानच्या भावनेने शेठजींना अधिकच घेरुन टाकले. या अपमानाची परतफेड कशी करायची याच विवंचनेत ते होते. उद्योग धंद्याचे व्यवहार चालूच होते परंतु तळाशी कुठेतरी ही खदखद निद्रिस्त ज्वालामुखीसारखी दडून राहिलेली होती.
एके दिवशी शेठ हिरालाल आपल्या उद्योगाच्या कामासाठी परगावी निघाले होते. अर्थातच नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन केले होते. प्रवासादरम्यान करण्याच्या गोष्टी त्यांनी ठरवून ठेवल्या होत्या आणि त्या करण्यामध्ये गुंतले होते. विमानतळावर विमानाची वाट पाहत असताना अचानक त्यांना सदानंद भेटला. सदानंद हा त्यांचा जुना मित्र होता. खूप दिवसांनी अचानक भेट झाल्याचा दोघांनाही खूपच आनंद झाला होता. त्या आनंदातच सुरुवातीला ख्यालीखुशालीची चौकशी झाली आणि गप्पा सुरू झाल्या. योगायोगाने दोघांच्याही विमानाला थोडा उशीर झाला होता. याचा फायदा घेऊन दोघांच्याही गप्पा रंगू लागल्या.
सदानंद आपली पत्नी विनया आणि अंगद, सुजय या दोन मुलांबरोबर सुट्टीसाठी निघाला होता. दोन्ही मुले शाळकरी वयाची होती. दोन्ही सख्खी भावंडे वेगवेगळ्या स्वभावाची होती. अंगद अतिशय खोडकर आणि गडबड्या स्वभावाचा होता. तर सुजय शांत आणि स्थिर होत. सदानंदबरोबर गप्पा चालू असताना विनया या दोघांकडे लक्ष देत होती. शेठजींचेदेखील अधून मधून त्यांच्याकडे लक्ष जात होते. विनया कशी वागते आहे याच्याकडे शेठजी थोडे बारकाईने बघत होते. बघता बघता गप्पांमध्ये वेळ निघून गेला आणि हिरालाल आणि सदानंद आपापल्या विमानांकडे निघून गेले.
थोड्याच वेळात विमानाने उड्डाण केले. आता जवळपास दीड तासाचा प्रवास होता. या प्रवासात वेगळे काही करण्यासारखे नव्हते. त्यामुळे शेठ हिरालाल थोडेसे निवांत झाले. या निवांतपणामध्ये त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. वेगवेगळे प्रसंग तुटक तुटकपणाने डोळ्यासमोर येऊ लागले. मग हळूहळू काही प्रसंगातील सुसंगती जाणवते आहे असे शेठजींच्या लक्षात आले. विनया आणि सदानंद यांची नुकतीच भेट झाली होती. विनया आणि सदानंद यांच्या पोटी अंगद आणि सुजय ही दोन वेगवेगळ्या स्वभावाची मुले जन्माला आली होती. विचार करता करता शेठजींच्या हे लक्षात आले की विनया दोघांचीही आई होती आहे. परंतु आपल्याच दोघा मुलांसोबत मात्र ती वेगवेगळ्या पद्धतीने वागत होती. अंगदला थोडेसे दटावणी रागावणे असे करून ती शांत बसायला भाग पाडत होती. तर सुजयला मात्र अगदी थोड्या सूचना अगदी अधून मधून देत होती. जशी मुलांची प्रवृत्ती होती तसा आईचा प्रतिसाद होता. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शेठजींना पंडित गुणनिधी यांची आठवण झाली. आपल्याकडची बिदागीची थैली नाकारताना ते म्हणाले होते की, " मैफिलीचे काही नियम असतात ते मी पाळणार आहे." आपण एखाद्या खाष्ट व्यावसायिकाप्रमाणे दिलेल्या पैशांचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी ते लगेच परत केले. गायन सभेत मात्र मैफिल संपल्यानंतर गाण्याची अतिशय आवड असलेल्या कोणा एका मुलीसाठी त्यांनी परत मैफिल रंगवली. आपण त्यांच्या कलेची किंमत पैशात मोजायचा प्रयत्न करून नाही म्हटलं तरी चूकच केली हा विचार एकदम विजेसारखा शेठजींच्या मनात चमकून गेला आणि मग त्यांच्या लक्षात आले की सर्वच गोष्टींचे मोल पैशात शकत नाही हे आपण विसरलो. आपली चूक ध्यानात आल्यानंतर शेठजी अतिशय अस्वस्थ झाले. त्यांच्या काटेकोर वृत्तीनुसार चूक ध्यानात आल्यानंतर तिची ताबडतोब दुरुस्ती केली पाहिजे हेदेखील त्यांच्या मनाने घेतले. परंतु आता सलग काही दिवसांच्या व्यावसायिक दौऱ्यावर निघाल्यामुळे पंडितजींची ताबडतोब भेट घेणे शक्य नव्हते. या गोष्टीची हुरहूर शेठजींना लागून राहिली.
ठरलेला व्यावसायिक दौरा पूर्ण करून शेठजी शहरात परत आले. आल्या आल्या त्यांनी पंडितजी शहरात आहेत का याची चौकशी केली. पंडितजी एक दोन दिवसानंतर परत येणार आहेत याची माहिती त्यांना मिळाली आणि शेठजी थोडेसे अस्वस्थ झाले. परंतु कामाच्या रगाड्यात हे दोन दिवसदेखील सरले. शेठजी स्वतःहून पंडितजींच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले. शेठजी आपल्या घरी आले आहे हे कळताच पंडितजींना थोडेसे आश्चर्य वाटले. आता आणखी काय प्रकार होतोय असे त्यांना वाटून गेले. परंतु शेठजींनी भेट झाल्या झाल्या आपल्या वागण्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली आणि पंडितजींना नम्रतेने नमस्कार केला. मग दोघांची चर्चा पुढे सुरू झाली. चर्चेच्या ओघात पंडितजींच्या डोळ्यासमोर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत याचा विषय निघाला आणि शेठजी चटकन म्हणाले, " या सगळ्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. बरोबर राहीन तो पैशांचा माज दाखवण्यासाठी नाही तर तुम्ही जी कलेची सेवा करता आहात त्याचा सन्मान करण्यासाठी! तुम्ही कृपया उदार अंतःकरणाने माझी चूक विसरून मला हे करण्याची संधी द्यावी." शेठजींच्या तोंडून निघालेले हे कळकळीचे उद्गार ऐकून पंडितजींनीदेखील प्रसन्नतेने त्याला संमती दिली. शेठजींनी मदत करण्याची संधी मागण्याची साद घातली त्याला पंडितजींनी आनंदाने प्रतिसाद दिला.
( समाप्त )
सुधीर गाडे, पुणे
( कथा आवडल्यास कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
कलेचे मोल पैशात मोजणे शक्य नाही. खूप सुंदर लेख आहे सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Delete