भावनांचा पेच (भाग १)

         ( काल्पनिक कथा )

      " अगं मीनाक्षी, कुठं आहेस? मला माझे कागद पाहिजे आहेत." समीर हाका मारत तिला घरभर शोधत होता. शोधता शोधता तो बेडरूममध्ये पोचला. तिथल्या कपाटात तो आपले कागद शोधू लागला. काही महत्त्वाचे कागद तो शोधत होता. कपाटातील सर्व कप्प्यात तो ते शोधू लागला. शोधता शोधता तो मनाशी विचार करू लागला.

( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

       ' वर्ष २००० आणि २००१ ही दोन वर्षे एकदम रोलरकोस्टर सारखी गेली. किती झपाट्याने घटना घडल्या.' 

       समीर आणि प्रकाश ही नाना आणि माईंची दोन मुले. नाना आणि माई यांनी खटपट करून आपल्या मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं स्वतःच्या पायांवर उभे केले. एकाच आईबापांच्या पोटी जन्माला आलेली ही दोन मुले. पण स्वभाव, वागणं बोलणं यात मात्र किती फरक. समीर हा मोठा नेहमी शांत, गंभीर , मोजकं बोलणारा, आपलं काम बरं आणि आपण बरं अशा स्वभावाचा. तर दुसरीकडे प्रकाश मात्र उत्साही, बडबड्या सगळ्या गोष्टीत लक्ष घालणारा ,‌सतत काही ना काही खटपट करत असणारा‌. स्वभाव वेगवेगळे असले तरी दोन्ही भाऊ मात्र एकमेकांवर अतिशय प्रेम असणारे. दोघांचं गूळपीठ चांगलं होतं. 

      बघताबघता दोघेही मोठे झाले. समीर एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागला. वयाच्या थोड्या उशीराच्या टप्प्यात मुलांचा जन्म दिल्याने माई मुलं मोठी होता होता थकलेल्या होत्या. वरचेवर घरात काम करणं त्यांना कष्टाचं होत होतं. आता त्यांना लवकर मदतीसाठी कुणीतरी हवं होतं. त्यामुळे जगरहाटीच्या मानाने समीरचं लग्न तसं लवकरच करण्यात आलं. योगदेखील असे की एका चांगल्या कुटुंबातील प्रमिला त्याची पत्नी झाली. सुस्वभावी, हसतमुख प्रमिला अतिशय मनमिळावू होती. तिचे आईवडील म्हणजे ताई आणि काका ह्यांना दोन मुलीच प्रमिला आणि मीनाक्षी. स्वभावाने प्रमिला आणि मीनाक्षीदेखील वेगवेगळ्या होत्या. जणू समीर आणि प्रकाश यांच्या जोडीसारखाच ह्या दोघींचा स्वभाव होता. 

      २००० मध्ये समीर आणि प्रमिलाचं लग्न जनरीतीप्रमाणे झालं. नवा संसार सुरू झाला आणि एकामागून एक घटना घडत गेल्या. लग्नानंतर ४-५ महिन्यातच प्रमिलाला दिवस गेले आणि या बातमीने दोन्ही कडची मंडळी सुखावली. पण हा सुखाचा क्षण अनुभवत असतानाच जणू नियतीने जाळं विणायला सुरुवात केली होती. थोड्याशा आजारपणाचं निमित्त झालं आणि माई तडकाफडकी गेल्या. माईंची कमतरता क्षणोक्षणी जाणवत होती. पण दुःखाच्या या प्रसंगी बाळाच्या जन्माकडं दुर्लक्ष नको म्हणून ताई आणि काकांनी प्रमिलाला बाळंतपणासाठी माहेरी नेलं. ही तर काय सगळीकडची प्रथा होती. गोंडस मूल जन्माला आलं आणि नाव वरद ठेवण्यात आलं. पण वरद अगदी लहान असतानाच प्रमिलाला कसलातरी जंतुसंसर्ग झाला आणि वरद तीन महिन्यांचा असतानाच प्रमिलाचा अचानक मृत्यू झाला.

     दोन्ही घरांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. समीर तर मनानं खचला. आई आणि पत्नीच्या लागोपाठच्या मृत्यूंमुळे तो अधिकच अबोल झाला. त्यानं स्वतःला कामात गाडून घेतलं.

    लहानग्या वरदला सांभाळायचं काम अतिशय नाजूक होतं. पण मीनाक्षीनं ते खूपच मनावर घेतलं. अनुभवी ताईंच्या देखरेखीखाली ती वरदला अगदी मायेनं सांभाळत होती.

      आपल्या दोन्ही घरांवर आलेल्या या अनपेक्षित संकटांमुळे काका हादरून गेले होते. पण ते तसे मनानं खंबीर आणि व्यावहारिक विचार करणारे होते. लहानग्या वरदचं पुढं कसं होणार, तरूण समीरचं आयुष्य पुढे कसं जाणार असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात फेर धरत होते. घरातली परिस्थिती तर ते रोज पहातच होते. यावर उपाय काय असा प्रश्न ते स्वतःला परतपरत विचारत होते. विचार करता करता त्यांना एक विलक्षण पर्याय सुचला. ते लगेच नानांना भेटायला गेले. काकांनी सुचवलेला पर्याय ऐकून तर नाना स्तब्धच झाले. पण काकांनी धीर धरत त्यांची समजूत परतपरत घातली. त्यासाठी परतपरत ते नानांकडे येत राहिले. क्रमाक्रमाने त्यांनी सर्वांची समजूत घातली आणि तो पर्याय प्रत्यक्षात आला. तो म्हणजे समीर आणि मीनाक्षीचे लग्न! या लग्नाला आता एक वर्ष झाले होते. वरद आता दीड वर्षाचा झाला होता.

          काही मिनिटांमध्ये हा सगळा घटनाक्रम समीरच्या डोळ्यासमोरून तरळत गेला. मग पुन्हा त्याच्या मनात शब्द उमटले की, " कशी ती दोन वर्षे गेली!".

         हा विचार चालू असतानाच समीर एक एक कप्पा शोधत होता. पण त्याला हवे ते कागद मिळत नव्हते. अचानक शेवटच्या कप्प्यात तळाशी एक फिकट गुलाबी रंगाचं पाकिट त्याला दिसलं. हातात घेतलं तर मंद सुगंध आला. पाकिटावर काहीच लिहिलेलं नव्हतं पण पाकिट मात्र फोडलेलं होते. आत काय आहे हे समीर उत्सुकतेने पाहू लागला. तर आत गुलाबी रंगाच्या कागदावर लिहिलेलं एक पत्र होतं. पत्रातील मजकुरावर नजर फिरू लागली तसं हे अक्षर ओळखीचं आहे हे समीरच्या लक्षात आलं. मजकूर वाचता वाचता तो एकदम गंभीर होत गेला. पत्र वाचून संपलं तसं तो एकदम दिग्मूढ झाला आणि तिथंच मटकन खाली बसला.

( क्रमश: )


सुधीर गाडे, पुणे 

 ( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

समासाच्या निमित्ताने...