भावनांचा पेच (भाग २ )

          समीरच्या हातात जे पत्र पडले होते ते वाचल्यावर जणू कुणीतरी आपल्यावरती डोंगरच ढकलला आहे असे त्याला वाटले. ते पत्र प्रकाशने मीनाक्षीला लिहिलेले होते. आपल्या प्रेम भावना प्रकाशने त्या पत्रात मोकळेपणाने व्यक्त केल्या होत्या. आपल्या आताच्या पत्नीचे आणि आपल्या भावाचे प्रेम संबंध आहेत ही भावनाच समीरला उध्वस्त करून टाकणारी होती.

 ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

     पत्र वाचून झाल्यानंतर काही क्षण समीर तसाच स्तब्ध बसला. सर्व जग जणू गरागरा फिरते आहे असे त्याला वाटले. थोड्या वेळाने तो थोडा सावरला. त्याने पत्र वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आले की हे पत्र त्याचे आणि प्रमिलाचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी लिहिले गेले होते. 

    समीर पुन्हा कपाटात शोधाशोध करू लागला. तर त्याला तसेच आणखी एक पत्र मिळाले. आता अजून काय वाचायला मिळतंय या विचाराने त्याच्या पोटात धस्स झाले. पण तसाच धीर एकवटून तो ते पत्र वाचू लागला.

      हे पत्रदेखील प्रकाशने मीनाक्षीला लिहिलेले होते. परंतु याच्यातला मजकूर अगदीच वेगळा होता. प्रमिलाच्या मृत्यूनंतर जेव्हा समीर आणि मीनाक्षी यांचे लग्न करायचे ठरले त्या वेळचे हे पत्र होते. त्या पत्रामध्ये प्रकाशने लिहिले होते की, " आपले दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. परंतु आता ही विलक्षण परिस्थिती उद्भवली आहे. यावेळी आपल्याला लहानग्या वरदचा जास्त विचार करणे आवश्यक आहे. आपल्या प्रेमाच्या पूर्ततेपेक्षाही त्याला आईच्या मायेची उब कशी मिळेल हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे वरदचे लालन पालन करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रेमाचा त्याग करणे गरजेचेच आहे. त्यामुळे आपण दोघांनी मिळून घेतलेल्या या निर्णयावर आता शंका नको माघार नको."

         समीर जसजसा या पत्रातील ओळी वाचत गेला तसतसं त्याचं मन भरून आलं. भरलेलं मन डोळ्यांतील अश्रुंवाटे घळाघळा वाहू लागलं. आपण ज्यांना धाकटे समजतो,  ज्यांना चेष्टा मस्करीची खूप आवड आहे ते या प्रकारचा मोठा विचार करून आपल्या प्रेमाचा होम करून बसले. परंतु आपल्याला त्याची चाहूलदेखील लागली नाही. इतके कसे आपण स्वतःच्या दुःखात हरवून बसलो होतो? सगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या तरीदेखील आपल्या काहीच कसे लक्षात आले नाही? असे वेगवेगळे विचार त्याच्या मनात फेर धरू लागले आणि आता कधी एकदा प्रकाश आणि मीनाक्षीशी बोलतो आहोत असे त्याला झाले. 

         बराच वेळ तसेच बसल्यानंतर समीर थोडा सावरला. आता या दोघांशी लगेचच बोलायचेच असे ठरवून त्याने प्रकाश आणि मीनाक्षी दोघांनाही बोलावले. प्रकाश आला आणि वरदला घेऊन मीनाक्षीदेखील आली. आल्या आल्या दोघांचीही नजर समीरच्या हातामध्ये असलेल्या पत्रांवर गेली. दोघांची नजरानजर झाली आणि दोघांनाही कळून चुकले की समीरला सर्वकाही समजले आहे.

        बराच वेळ शांतता राहिली. कुणी काहीच बोलेना. बऱ्याच वेळानंतर समीर एकदम गहिवरलेल्या आवाजात म्हणाला, " प्रकाश, मीनाक्षी, अरे काय करून बसलात दोघं? मी प्रमिलाच्या दुःखात होतो. परंतु तुम्ही मोकळेपणाने मला सांगू शकला असतात. मीदेखील तुम्हाला समजून घेऊ शकलो असतो. परंतु तुम्ही काहीच कसे बोलला नाहीत?"

     समीरच्या या प्रश्नावर दोघंही क्षणभर स्तब्ध राहिले आणि प्रकाश म्हणाला, " अरे दादा, तुझं दुःख बघून तुझ्याशी काही बोलायची हिंमतच झाली नाही. जेव्हा तुझ्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट निघाली तेव्हा सुरुवातीला आम्हालादेखील सगळं सांगून टाकावसं वाटलं. पण आम्ही नंतर विचार केला की मीनाक्षीच तुझ्याशी लग्न झालं तरच छोटा वरद तिच्याकडे ओढला जाईल. लहानग्या वरदपुढे आम्हा दोघांना आमच्या प्रेमाची काहीही फिकीर वाटली नाही. आम्हालाही खूप खूप वाईट वाटलं असलं तरीदेखील हा निर्णय आम्ही मनापासून घेतला होता.  आमच्या प्रेमाच्या पूर्ततेच्या सुखापेक्षा वरदच्या पालनाचे कर्तव्य आम्हाला वाटलं." 

    प्रकाशच्या या उत्तराला मीनाक्षीनंदेखील दुजोरा दिला. ती म्हणाली, " अहो, वरद जन्मल्यापासून माझ्या इतका जवळचा आहे की त्याच्या ओढीनं मी माझ्या प्रेमाला तिलांजली दिली. "

     दोघांचीही उत्तरं ऐकून समीर एकदम थक्क झाला. धाकट्या दोघांच्या विचारांच्या उंचीचा त्याला अभिमान वाटला. परंतु वरदच्या पालनाच्या कर्तव्यामध्ये दोघांच्या प्रेमाची आहुती पडली ही भावना मात्र त्याला अस्वस्थ करू लागली. वरदच्या पालनासाठी आपल्या प्रेमावर पाणी सोडणाऱ्या दोघांच्या कर्तव्य भावनेला श्रेष्ठ मानून आपला मीनाक्षीबरोबरचा संसार तसाच पुढे चालू ठेवावा की आता सत्य समजल्यामुळे त्या दोघांना एकत्र येण्याची संधी देऊन आपण आपलं मोठेपण दाखवावं. या विचारांचं उलटसुलट आंदोलन त्याच्या मनात सुरू झालं. कर्तव्याची भावना आणि प्रेम भावनेचा मोठाच पेच निर्माण झाला होता. आता यावर उत्तर काय हे कोण सांगणार होतं? कदाचित काळाच्या पोटातच या प्रश्नाचे उत्तर दडलं होतं. 

( समाप्त)

सुधीर गाडे पुणे 

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

    

Comments

  1. प्रेमापेक्षा कर्तव्य महत्वाचे.. स्वतःच्या इच्छेला मुरड घालून दुसऱ्याचे आयुष्य घडवणे यासारखं सुंदर कार्य कुठलंच नाही🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

समासाच्या निमित्ताने...