स्वामी विवेकानंद : अनोखे जीवन
१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. भारताला दीर्घकाळ प्रेरणा देत राहिलेल्या आणि भविष्यातही प्रेरणा देत राहणाऱ्या महापुरुषाचा हा जन्मदिवस. या जन्मदिवसाचा निमित्ताने स्वामीजींच्या जीवनाचे आणि विचारांचे स्मरण करताना नेहमीच आनंद मिळतो. मनामध्ये प्रेरणा जागते.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
स्वामी विवेकानंदांचे वडील बाबू विश्वनाथ दत्त हे त्या काळाच्या मानाने आधुनिक विचार करणारे, विशेषतः इंग्रजांच्या विचारसरणीचा मनावरती पगडा असलेले, दुष्ट रूढींना प्रश्न विचारणारे व्यक्तिमत्व होते. उदार अंतःकरण हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अजून एक वैशिष्ट्य! स्वामीजींच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी या पारंपारिक रूढी परंपरा यांचे दृढतेने आचरण करणाऱ्या हिंदू माता. सश्रद्ध मन हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य! या दोघांच्याही गुणांचा संयोग स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वात झालेला पाहायला मिळतो. यामुळे स्वामीजींचे व्यक्तिमत्व उदार,मनमिळावू, चांगल्या परंपरेचा सार्थ अभिमान असणारे, तर्कशुद्ध विचार करणारे आणि भारताचे संचित ही जगाची केवढी मोठी देणगी आहे याची पुरेशी जाणीव असणारा माणूस अशा पद्धतीचे घडत गेले. या सर्वातून स्वामीजींचे व्यक्तिमत्व बहरत गेले.
मनुष्यजन्म, मोक्षाची इच्छा आणि महापुरुषांचा सहवास या तीनही गोष्टी अतिशय भाग्याने मिळतात असे सांगणारे एक संस्कृत सुभाषित आहे. तसेच भारतात जन्म मिळणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे असे देखील सांगणारे एक संस्कृत सुभाषित आहे. स्वामीजींच्या जीवनात या सर्व गोष्टी तंतोतंत खऱ्या झाल्याचे आढळते. त्यांच्या आयुष्यात श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी संबंध येणे आणि तिथून जीवनाला विलक्षण कलाटणी मिळण्याचा प्रारंभ होणे ही घटना केवळ स्वामीजी, त्यांचे परिजन, तत्कालीन बंगाली माणसे , तत्कालीन भारतीय जनता यांच्यासाठीच महत्त्वाची नसून ती जगासाठी देखील महत्त्वाची ठरली आहे हे ठामपणे म्हणता येते.
पाश्चात्यांनी वंश श्रेष्ठत्वाचा गंड मनामध्ये धरून सर्व जगभर आक्रमण केले. विज्ञान तंत्रज्ञान यातील प्रगतीच्या आधारावर जवळजवळ सगळ्या जगाला गुलाम केले. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या मनात आपणच अतिश्रेष्ठ असल्याची भावना निर्माण झाली. जगभर त्यांनी ज्या धूर्तपणे आणि कुटीलपणे प्रयत्न केले त्यामुळे गुलामीत खितपत पडलेल्यांच्या मनामध्ये अतिनीचत्त्वाची भावना निर्माण झाली. जणू काही एका बाजूला गुणांचा उत्तुंग असा पर्वत आणि दुसऱ्या बाजूला दुर्गुणांची खोलवर गेलेली दरी. असेच चित्रण इतिहासात साधारणपणे पाहायला मिळते.
यात काही अपवाद देखील होते. ते दोन्ही बाजूंचे गुण अवगुण लक्षात घेऊ शकत होते. त्यांचा योग्य अन्वयार्थ लावू शकत होते. परंतु अशा मूठभरांच्या कर्तृत्वाचा विचाराचा जगावर फार प्रभाव पडला असे म्हणता येत नाही. पूर्व आणि पश्चिम यांच्या सद्गुणांचा संयोग घडवून आणणे आणि उच्च विचारांच्या आचाराच्या आधारावर जगभर सहजीवनाची सुरुवात करूया या उत्तुंग ध्येयाचा उद्घोष करण्याचे भाग्य जणू नियतीने स्वामीजींच्याच भाळी कोरलेले होते. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्व आणि पश्चिम यातील चांगल्या गोष्टींचा मनोहर संगम झाल्याचे बघायला मिळते. ज्या मूर्तीपूजेच्या बाबत पाश्चात्त्यांनी टीकेची झोड उठवली त्या मूर्ती पूजेतूनच श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारखी विभूती अवतीर्ण झाल्याचे स्वामीजींनी स्वतः अनुभवले. त्यामुळे मूर्तीपूजेच्याद्वारे जर अशी विभूती घडत असेल तर मूर्तिपूजक बनणे काय वाईट असा रोखठोक प्रश्न स्वामीजींनी विचारला. भारताला तत्त्वज्ञान, विचार नाही असे म्हणणाऱ्यांना स्वतःच्या अभ्यासाने आणि विद्वत्तेने उत्तर दिले. पाश्चात्त्यांचे सर्वच श्रेष्ठ या त्यांच्या अहंगंडाला त्यांनी आव्हान दिले. त्यांच्या विचारातील विसंगती , कृतीतील क्रूरता अमानुषपणा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांच्यापुढे मांडला. दुसऱ्या बाजूला शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ या समजुतीने माणुसकीला कलंक अशा प्रथा परंपरा भारताच्या आध्यात्मिक भूमीमध्ये खोलवर रुजल्या. या परंपरांनी माणसाला माणूस म्हणणे नाकारले. याचा स्वामीजींनी स्पष्ट शब्दात धिक्कार केला. गतानुगतिक पद्धतीने हीन दर्जाचे आयुष्य न जगता संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा भारतीय यांच्यामध्ये जागवली. त्यामुळेच स्वामीजी म्हणत असत भारताचे अध्यात्म आणि पश्चिमेचे विज्ञान यांचा संगम झाला पाहिजे. या संगमामधूनच माणूस उच्च, सुखी, समाधानी जीवन जगू शकेल. स्वामीजींच्या विचारांमध्ये प्राचीन काळी गवसलेले सत्य जसे उच्चारले गेले तसेच काळाच्या प्रवाहात उदयाला आलेल्या मनुष्यजीवन उन्नत करणाऱ्या नवकल्पनादेखील त्यांच्या विचारात सांगितल्या गेल्या.
अशा विलक्षण व्यक्तिमत्वाचे स्वामी विवेकानंद हे आपणा भारतीयांसाठी तसेच सर्व जगासाठी यापुढेही सदैव प्रेरणास्त्रोत राहणार आहेत. या प्रेरणास्त्रोताकडून आपण काय शिकतो आणि त्याच्यातील काय आचरतो यावर येणाऱ्या काळातील आव्हानांना मिळणारे उत्तर अवलंबून असणार आहे. स्वामीजींच्या जन्मामुळे हा जो भारतभूमीचा स्वाभिमान, जीवित कार्य उजळून निघाले त्याच्या प्रकाशातच यापुढे पुढची वाटचाल होणार आहे.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. स्वामी विवेकानंद यांचे हे वाक्य मला सदैव प्रेरणा देत.. सुंदर लेख आहे सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteसुंदर लेख सुधीर जी
ReplyDeleteसत्यजितजी धन्यवाद
ReplyDelete