पूर्वी काय घडले ते विचारू नका! ( भाग १ )
( काल्पनिक कथा )
सुजय एक लघुउद्योजक होता. गेली अनेक वर्ष स्वतःचा व्यवसाय त्याने अतिशय कष्टाने उभा केला होता. त्याच्यासाठी त्याने प्रचंड धडपड केली होती. आता या कष्टाची फळे त्याला मिळू लागली होती. संपन्न आयुष्य, सुखी कुटुंब याचा आनंद तो आता घेत होता. समाधानाची साय त्याच्या आयुष्यावर आता जमली होती.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
या सगळ्याचा आनंद घेत असताना त्याच्या मनात व्यवसायाच्या व्यतिरिक्त वेगवेगळे विचार, उपक्रम येत असत. दुसऱ्यासाठी काही करावं असं त्याला सतत वाटे. नेहमीच तो स्वतःचं कामधाम सांभाळून आणि अगदीच क्वचित प्रसंगी स्वतःच्या कामाला मुरड घालून, पदर मोड करून लोकांच्या उपयोगी पडत असे. लोकांची छोटी मोठी कामे तो स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण करीत असे. त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच त्याचं हे वागणं अतिशय आनंद देऊन जात असे. क्वचित प्रसंगी घरी थोडी नाराजी झाली तरी ती फारशी मनाला लावू न देता तो अशी कामे करतच राही.
व्यवसायात जसा जम बसला तशी त्याने एक मोटर गाडी विकत घेतली. आता थोडा आरामात प्रवास तो करू शकत होता. हिंडू फिरू शकत होता. नवीन गाडीची सजावट करायला गाडी त्याने एका दुकानात दिली. काय काय सजावट करता येईल याची माहिती त्या दुकानाचा मालक सुजयला देत होता. त्यातील काही गोष्टी हव्यात आणि काही गोष्टी नकोत असे सुजयने त्या दुकानदाराला सांगितले. परंतु गाडीच्या मागच्या काचेवर काय लिहायचे असे विचारल्यानंतर सुजय पटकन बोलून गेला, " मागच्या काचेवर एकच वाक्य लिहायचे. ते म्हणजे 'पूर्वी काय घडले ते विचारू नका!'". सुजयचे हे उत्तर ऐकून दुकानदार चमकला. त्याने आतापर्यंत अनेक गाड्यांची सजावट केली होती. त्यामुळे गाडीच्या मागच्या काचेवर साधारणपणे काय काय लिहिले जाऊ शकते किंवा लिहले जाते याचा त्याला अंदाज होता. परंतु सुजयने सांगितलेले वाक्य मात्र अगदीच वेगळे होते. यासारखे वाक्य लिहायला यापूर्वी कोणीच सांगितले नव्हते. म्हणून तो दुकानदार थोडा आश्चर्यचकित झाला. त्याने पुन्हा एकदा विचारून सुजयकडून खात्री करून घेतली. सुजयनेदेखील, " हो! असेच वाक्य लिहायचे." हे सांगितले. त्यानंतर तो दुकानदार सजावटीच्या कामाला लागला. सजावट पूर्ण करून गाडी जेव्हा सुजयला मिळाली तेव्हा तो पत्नी आणि दोन्ही मुले यांना घेऊन देवळात निघाला. बायकोनेदेखील हे वाक्य वाचले पण गाडीच्या मागे हे वाक्य लिहिण्यामागे काय कारण असावे याचा तिला अंदाज होता. त्यामुळे ती याविषयी फारसे काही बोलले बोलली नाही. ते सर्वजण देवदर्शन करून परत आले.
सुजयची गाडी सगळीकडे त्याच्या कामानिमित्ताने फिरू लागली. पहिल्यांदा त्याची गाडी बघणाऱ्याच्या डोक्यात मागील काचेवरचे वाक्य पाहून प्रश्न येत असे. कुणी कुणी विचारतदेखील असत. पण सुजय काहीतरी उडवाउडवीचे उत्तर देऊन ती वेळ निभावून नेत असे. सुजयच्या व्यवसायातील अभय हा एक त्याचा सहकारी होता. व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांची ओळख झाली होती. पण पुढे पुढे दोघांची हळूहळू चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे व्यवसायाव्यतिरिक्त देखील या दोघांच्यात बोलणे होत असे. एके दिवशी अभयने थोडा निवांतपणा पाहून ," हा मजकूर का लिहिला?" असा प्रश्न सुजयला विचारला. अभयने विचारलेल्या प्रश्नामुळे सुजय एकदम गंभीर झाला.
अभयचे आणि त्याचे संबंध आता खूपच जिव्हाळ्याचे झाले होते. त्यामुळे हा प्रश्न उडवाउडवी करून टाळता येणार नाही हे सुजयच्या लक्षात आले. सुजय विचारात पडला आहे हे पाहून अभयदेखील थोडा गंभीर झाला आणि सुजय आता काय उत्तर देतो याची तो वाट पाहू लागला.
कुठून सुरुवात करावी याच्या विचारात सुजय बराच वेळ होता. त्यामुळे अभयदेखील आता काय ऐकायला मिळते आहे या विचाराने थोडा बेचैन झाला. परंतु सुजयची धडपड, त्याचे कष्ट , फक्त स्वतःपुरता किंवा कुटुंबापुरता विचार न करता बाकीच्या लोकांचा विचार करण्याचा त्याचा स्वभाव, त्यांच्यासाठी शक्य ती खटपट करण्याची करण्याची सुजयची वृत्ती अभयलादेखील चांगली माहित होती. त्यामुळे तोही थोडा शांत झाला. एका ताणलेल्या शांततेत एक एक सेकंद पुढे सरकू लागला. पण सुजयने विचार केला की सगळं सांगायचं तर त्यासाठी आत्ता वेळ कदाचित पुरणार नाही. त्यामुळे तो म्हणाला," असं करू अभय , आज संध्याकाळी आपण आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटूया." अभयलादेखील ते सोयीचे वाटलं. तो हो म्हणाला आणि संध्याकाळच्या भेटीची वाट पाहू लागला.
( क्रमशः)
सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
सुंदर कथा....आहे आता माझी उत्सुकता वाढली पूर्वी काय घडले ते विचारू नका याचे मागचे कारण🙏
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDelete