पूर्वी काय घडले ते विचारू नका! ( भाग २ )
संध्याकाळी सुजय आणि अभय आपापली कामे आटोपून नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटले. दिवसभर काय झालं, कोण भेटलं याबद्दल थोडं बोलणं झालं. सुजय स्वतःहून सांगायला सुरुवात करेल याची अभय मनातून वाट पाहत होता. तर नेमकं कुठून सांगायला सुरुवात करावी याची जुळवाजुळव सुजय करत होता. बोलताबोलता दोघंही एकदम गप्प झाले.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
" झालेले संस्कार माणूस कसा विसरतो?" सुजय एकदम म्हणाला आणि तो पुढं बोलू लागला. "अभय, आमचं घर म्हणजे छोट्या गावातील खाऊन पिऊन सुखी असलेलं कुटुंब. आईबाबा दोघेही शांत, समजूतदार आणि विचारी. भलं बुरं कसं ओळखायचं, कसं वागायचं हे त्यांनी मला शिकवलं. गावात शिक्षणाची सोय नाही म्हणून मी शाळा संपली की शहरात शिकायला आलो. शहरातला चकचकाट, धावपळ यांनी तसा भांबावून गेलो. अशातच मला विजय भेटला. माझ्याबरोबरच शिकायला होता. पण त्याच्या घरची परिस्थिती अगदी वेगळी होती. खूप श्रीमंत घरात त्याचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्याला कशाचीच कमतरता पडली नव्हती. आईवडिलांनी त्याचे सगळे हट्ट, मागण्या अगदी हसतहसत पुऱ्या केल्या होत्या. त्यामुळे कशासाठीच नकार ऐकून घ्यायची त्याला सवय नव्हती."
एवढा वेळ बोलून सुजय क्षणभर थबकला आणि त्यानं थोडं पाणी पिलं. अभयदेखील लक्ष देऊन ऐकत होता. सुजय किंचित शांत झाला आणि पुढं बोलू लागला. " विजय तसा दिलदार माणूस. पाहिजे त्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने तो कमालीचा हट्टी झाला. तरूणपण , पैसा ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की बरेचदा जे घडतं तेच विजयच्या आयुष्यात घडलं. एकामागून एक व्यसनं, छंद सुरू झालं. विजयची आणि माझी ओळख योगायोगाने झाली. जसजसं आम्ही एकमेकांच्या सहवासात आलो तसतसं आमचं दोघांचंही चांगलं जमू लागलं. आम्ही अगदी सगळीकडे बरोबरच असायचो. सुरुवातीसुरुवातीला माझ्या संस्कारांमुळे मला त्याच्याबरोबर काही ठिकाणी जाताना अस्वस्थ व्हायचं. आपण यात पडायला नको असं माझं मन सांगायचं. पण मला कशी भूल पडली मलाच कळलं नाही. मी त्याच्याबरोबर वहावत जाऊ लागलो. विजय मूळचाच दिलदार असल्याने तो त्याच्याबरोबर माझाही खर्च करायचा. पण असं किती दिवस चालणार? त्यासाठी मला घरी जादा पैसे मागणं बरोबर वाटत नव्हतं आणि मी मागितले तरी ते देणं बाबांना शक्य नव्हतं."
" मी विचार करू लागलो आणि मग एक गोष्ट मला सुचली की या व्यसनांच्याच उलाढालीतून आपण पैसे मिळवू शकतो. मी पद्धतशीरपणे त्याच्याशी संबंधित लोकांशी जवळीक वाढवली आणि मीही जणू त्यांच्यातलाच होऊन गेलो. मलाही पैसे मिळू लागले. विजयच्या पैशावर मला अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही."
जसजसं सुजय सांगत होता तसतसा अभय चकित होत गेला. एका गुणी माणसाच्या आयुष्यात कशा गोष्टी घडल्या होत्या याचं त्याला दुःख वाटत होतं.
सुजय बोलतच होता, " पण एकेदिवशी मी खडबडून जागा झालो. माझ्या माहितीतील एक मुलगी अगदी लहान वयात या सगळ्याची शिकार झाली. पण मी आता त्या चक्रव्यूहात अडकलो होतो. मला एकट्याला त्यातून बाहेर पडणं शक्य नव्हते. पण कापरेकाकांसारखा देवमाणूस माझ्या आयुष्यात आला आणि मला हळूहळू सुटकेचा मार्ग दिसू लागला. व्यसनमुक्ती संघटनेचे काम करणाऱ्या कापरेकाकांनी मला आपुलकीने , प्रयत्नांनी त्यातून बाहेर काढलं. माझा जणू नवा जन्मच झाला! जुनं सगळं पुसून मी माझं नवं आयुष्य घडवत इथपर्यंत आलो. परिस्थिती इतकी बिघडली होती की त्या शहरात मी राहू शकत नव्हतो. ते सोडून मी इथं आलो. इथं मी नव्याने मी घडलो."
सुजयच्या आयुष्यातले हा उतारचढ ऐकून अभय थक्क झाला होता. पण सुजयचा निग्रह, त्याचे कष्ट यांमुळे तो मनातून खूप खूष झाला होता.
पुन्हा सुजय बोलू लागला. " मधून मधून मला माझे ते दिवस आठवतात. पुन्हा काहीतरी घडून मी त्या दुष्टचक्रात अडकेन का ही भीती वाटते. कुणाला फार मोकळेपणाने सांगायचा माझा स्वभाव नाही. पण माझी मलाच आठवण रहावी आणि सांगायची वेळ येऊ नये म्हणून मी हे वाक्य लिहिले. "
सुजयचं बोलणं थांबलं. बराचवेळ अभयदेखील शांत होता. काय बोलावं यासाठी शब्द जुळवत होता. पण शब्द सुचत नव्हते. थोड्या वेळाने त्यानं सुजयचा हात हातात घेतला आणि घट्ट धरून ठेवला. त्या स्पर्शात आश्चर्य, दु:ख, सहवेदना,कौतुक अशा सगळ्या भावना मिसळल्या होत्या.
( समाप्त)
( एक दोन महिन्यांपूर्वी एका गाडीवर 'इतिहास विचारू नका.' असे वाक्य वाचल्यावर सुचलेली कथा. )
सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
सुंदर कथा🙏
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखुप सुंदर आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete