प्रेरणास्रोत: राणी मां गायडिनल्यू

              भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकानेक व्यक्तिंनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. आपण नि:संशयपणे त्यांचे ऋणी आहोत. परंतु भारताची विशालता, इतिहासाची माहिती देण्याचे तुटपुंजे प्रयत्न, अनास्था अशा अनेक कारणांमुळे सामान्य माणसांना इतिहासाची अगदी मोजकी माहिती असते. तीदेखील प्रामुख्याने आपल्या परिसरातील व्यक्तिंची.  अशाच अपरिचित व्यक्तिंपैकी एक आहेत नागा जनजातीमधील तेजशलाका राणी मां गायडिनल्यू! 

        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

         २६ जानेवारी १९१५ हा त्यांचा जन्मदिवस! नागा जनजातीमधील रोंगमेई समाजात पिता लोथोनांग व आई  केलुवतलिनलयू यांच्या पोटी त्यांचा जन्म सध्याच्या मणिपूरमध्ये झाला. असे सांगितले जाते असे की जन्माच्या वेळी नाळेचा वेढा त्यांच्याभोवती मानेभोवती पडला होता. तो सोडवून त्यांचा जन्म झाला. त्यामुळे ही मुलगी आयुष्यात काहीतरी विलक्षण करून दाखवेल अशी आई-वडिलांची खात्री पटली‌ त्यामुळे त्यांचे नाव ठेवण्यात आले गायडिनल्यू!  यातील 'गाय' म्हणजे 'चांगला' 'डिन' म्हणजे 'मार्ग'.  म्हणजेच त्यांच्या नावाचा अर्थ चांगला मार्ग दाखवणारी असा होतो. आई-वडिलांनी दिलेले हे नाव त्यांनी पुढे सार्थ करून दाखवले.

    भारताच्या पारतंत्र्याचा तो काळ होता. इंग्रजांच्या दडपशाहीचा आणि धर्मांध ख्रिश्चन पाद्र्यांच्या कुटील कारवायांचा काळ.  या सगळ्या अन्याय , अत्याचारांची समज गायडिनल्यू यांना अगदी लहानपणापासूनच आली होती असे म्हणायला हवे. कारण या सर्व दडपशाहीचा प्रतिकार करणारे त्यांचे दूरच्या नात्यातील भाऊ जादोनांग यांनी सुरू केलेल्या प्रतिकाराच्या चळवळीत त्या वयाच्या तेराव्या वर्षापासूनच झाल्या. 

     नागा जनजातीची 'हेराका' उपासनापद्धती ही ख्रिश्चन मताप्रमाणे पेगन होती. त्यामुळे ही उपासना पद्धती सोडून या जनजातीतील लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न ख्रिश्चन पाद्री करत होते. इंग्रज राज्यकर्ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करत होते. या सगळ्या अन्यायाचा प्रतिकार जादोनांग यांनी सुरू केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व जनजातीय समाज एकत्रित येत होता. या चळवळीचा इंग्रज राज्यकर्त्यांनी धसका घेतला. ही चळवळ मोडून काढण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या उपायांचा अवलंब केला. शेवटी १९३१ मध्ये जादोनांग यांना पकडून फासावर लटकवण्यात आले.

      आता या चळवळीचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा गायडिनल्यू ह्या पुढे झाल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सर्वांनाच सर्वांवरच पडला आणि प्रतिकाराची चळवळ आणखीनच जोमाने सुरू झाली. या चळवळीने जनजातीय समाजात पेटलेला स्वातंत्र्याचा अग्नी अधिकच प्रज्वलित झाला होता. सर्व प्रकारचे प्रयत्न पुन्हा इंग्रज सरकारकडून सुरू झाले. त्यांना पकडून देणाऱ्याला मोठे इनाम जाहीर झाले आणि फितुरीच्या शापाने ग्रासलेल्या समाजाचा पुन्हा एकदा घात झाला. तटबंदी उभारून प्रतिकार चालू ठेवू पाहणाऱ्या गायडिनल्यू यांना १९३२ मध्ये पकडण्यात आले आणि तुरुंगात डांबण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची तुरुंगात भेट घेतली सुटकेचे काही प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. पंडितजींनी त्यांना 'नागांची राणी ' असे संबोधले.

      गायडिनल्यू यंच्यात काही दैवी शक्ती आहे हा समज दृढ झाला. त्यांना समाजाने आदरयुक्त प्रेमाने 'राणी मां' असे म्हणणे सुरू केले. 

     तुरुंगात वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसोयी , अत्याचार होत होते. ते सर्व अत्याचार त्यांनी धीराने सोसले .१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच त्यांची सुटका झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जवळपास १५ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर गायडिनल्यू यांची सुटका झाली. 

         सुटकेनंतर नागा जनजातीय समाज बांधवांनी त्यांचे जल्लोषात ,उत्साहाने स्वागत केले. इंग्रजांनी पेरलेल्या दुहीच्या बीजातून फुटीरतावादी चळवळी राहिल्या. आपले नागालँड हे राष्ट्र स्वतंत्र आहे असे त्यांनी घोषित केले आणि कारवाया सुरू केल्या. आपल्या पूर्वजांच्या परंपरेची यथार्थ जाणीव असलेल्या राणी मां गायडिनल्यू यांनी या फुटीरतावादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. भूमिगत राहून प्रतिकार केला. आवश्यक ते सर्व सहकार्य सरकारला केले. या सर्व प्रयत्नांना हळूहळू यश मिळत गेले आणि फुटीरतावादी चळवळ मोडून पडली.

        स्वातंत्र्यानंतरही धर्मांध मिशनऱ्यांचा धर्मप्रसार चालूच होता. आपल्या पारंपारिक धार्मिक श्रद्धांजली असलेले हे आव्हान राणी मां गायडिनल्यू यांनी स्वीकारले. विवेकानंद केंद्र, विश्व हिंदू परिषद अशा विविध अन्य संस्थांशी त्यांनी सहकार्य केले. या साऱ्याच्या माध्यमातून त्यांनी अनिर्बंध चाललेल्या धर्मांतराच्या विरोधात आघाडी उघडली. आपल्या पारंपारिक श्रद्धा अभंग‌ रहाव्यात यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.  आपल्या समाजबांधवांमध्ये धर्मश्रद्धा अखंड रहावी यासाठी आजीवन प्रयत्न केले.

       या वाटचालीत मिळालेले स्वातंत्र्यसेनानी ताम्रपट, पद्मभूषण, विवेकानंद सेवा सन्मान यासारखे पुरस्कार त्यांनी विनम्रपणे स्वीकारले. या कृतार्थ जीवनाची अखेर १७ फेब्रुवारी १९९३ मध्ये झाली. त्यांना मरणोपरांत बिरसा मुंडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९९६ मध्ये पोस्ट तिकीट  तर २०१५ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नाणे काढून त्यांचा सन्मान करण्यात आला.

             स्वातंत्र्य आणि धर्मश्रद्धा यासाठी आपले जीवन वेचणाऱ्या या महान विभुतीला विनम्र अभिवादन!


सुधीर गाडे पुणे 


( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )


     


 संस्थांच्या माध्यमातून त्यांनी याच्या विरोधासाठी आघाडी उडघली. आपल्या पारंपारिक श्रद्धा अभंग‌ रहाव्यात या


     


Comments

  1. राणी मां गायडिनल्यू हे स्वातंत्र्यांमधील योगदान याबद्दल मी प्रथमच वाचलं धन्यवाद सर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असे हरपलेली रत्न याबद्दल आवर्जून लिहा🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

समासाच्या निमित्ताने...