आजारपण, माणसांचा सहवास
एक जुने बालगीत आहे. ' पडू आजारी मौज हीच वाटे भारी '. लहान मुलाला वाटते की आजारपण आल्यावर घरातील सगळेजण आपली जास्त काळजी घेतात. हवे नको ते पुरवतात त्यामुळे आजारपणाची गंमत वाटते असा काहीसा त्याचा असे आशय आहे.
हे बालगीत एकदम आठवण्याचे कारण असे की काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली. जपानमध्ये कैकोक्यान (Kaikyokan) येथील मत्स्यालयात एक नवीन मासा (sunfish) आणण्यात आला. मत्स्यालयात पर्यटकांची गर्दी असे. काही कारणांनी मत्स्यालय बंद करण्याचे ठरले. सहाजिकच पर्यटकदेखील येईनासे झाले. त्यामुळे हा मासा काही खाईना, टॅंकच्या काचेला अंग घासू लागला. त्याला बरे नाही असे वाटून त्याला खाणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही उपचार करायला सुरुवात केली. पण तरी देखील त्याचे खाणे काही वाढेना? मग यावर चर्चा झाली. एका कर्मचाऱ्याने असे सुचवले की या माशाला रोज माणसांना बघायची सवय होती. अचानक आता माणसे दिसेनाशी झाल्यामुळे तो मासा अस्वस्थ झाला असेल. अधिकाऱ्यांनीदेखील ही सूचना उडवून न लावता काय करता येईल याची चर्चा केली. त्यातून एक उपाय निघाला तो म्हणजे माणसांचे 'कट आउट' लावायचे. हा उपाय अमलात आणला गेला. त्यानंतर हळूहळू मासा आता हालचाल करू लागला आहे अशी ती बातमी होती. किती विलक्षण नाही!
आजारपणाने त्रस्त असलेला माणूस मनाने देखील हळवा झालेला असतो. अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलावे. त्यांनी आपल्याबरोबर अधिकाधिक वेळ घालवावा अशी आजारी माणसाची इच्छा असते. त्यामुळे आजारपणात जवळची माणसेदेखील जास्त वेळ सहवास वाढवण्याचा प्रयत्न करतात.
फार वर्षापूर्वी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांच्या आत्मचरित्राचा काही भाग वाचण्यात आला. त्या काळात भारत सरकार हे सोवियत रशियाचे अनुकरण करण्यात मग्न होते. त्याचा एक भाग म्हणून साहित्यिकांचे दौरे एकमेकांच्या देशात आयोजित केले जात असत. अशाच एका दौऱ्यामध्ये हरिवंशराय बच्चन रशियाला गेले असताना आजारी पडले. तेथील साम्यवादी राजवटीच्या व्यवस्थेप्रमाणे त्यांना पुढील वागणूक मिळाली. ताबडतोब रुग्णालयात नेले गेले. निदान करून उपचार सुरू झाले. परंतु रशियन भाषा येत नसल्याने बच्चन संवाद साधू शकत नसत. रुग्णालयातील मंडळींना हिंदी येण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे मोठ्या खटपटीने संवाद साधायला लागायचा. अजून एक नियम होता तो म्हणजे आजारी व्यक्तीला अन्य कुणीही भेटायला यायचे नाही. त्यावेळी हरिवंशराय बच्चन यांना असे वाटून गेले की ओळखीच्या व्यक्ती भेटल्या तर आपला आजार लवकर बरा झाला असता.
असाच एक वेगळा प्रसंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या चरित्रात आहे. संघाची स्थापना केल्यापासून हेडगेवार यांनी संघाची वाढ व्हावी यासाठी अतोनात कष्ट केले. वेगवेगळ्या गावी जाऊन ते सतत प्रयत्न करत असत. अशाच एका प्रवासामध्ये ते सांगलीमध्ये आले आणि पुष्कळ आजारी पडले. उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी निदान केले आणि सांगितले की , 'यांना संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. यांना अजिबात बोलू देऊ नये.' परंतु लोकसंग्रहाचा ध्यास घेतलेल्या हेडगेवारांनी न भेटण्याचा व न बोलण्याचा नियम पाळला नाही. सदैव त्यांच्या भेटी स्वयंसेवकांचा राबता असे. चर्चा,गप्पा , गोष्टी होत असत. बोलायचे नाही असे पथ्य होते. परंतु भरपूर बोलणे होत असे त्यामुळे काही जणांनी या आजाराला 'बोलका आजार' असे नाव दिले.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
आजारी माणसाची शुश्रुषा सोबतच्या व्यक्तीला करावी लागते. स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या पूर्वी भारत भ्रमण करत होते. हाथरस येथील स्टेशन मास्तर शरतचंद्र गुप्त त्यांचे शिष्य बनून त्यांच्याबरोबर निघाले. हे गुरु शिष्य हिमालयाकडे वाटचाल करू लागले. वाटेतील श्रम आणि वातावरण यांनी सुरुवातीला स्वामी विवेकानंद आजारी पडले. त्यावेळी शरतचंद्र गुप्त यांनी स्वामीजींची सेवा केली. तर नंतर ज्यावेळी शरतचंद्र अतिशय आजारी पडले त्यावेळी स्वामीजींनी अतिशय काळजीपूर्वक स्नेहाने आपल्या शिष्याची शुश्रुषा केली आणि त्याला आजारपणातून बरे केले. आपल्या शिष्याची सेवा करणारा हा गुरु विरळाच!
आजारपण, माणसांचा सहवास याचे हे काही प्रसंग सहज मनात आले. प्रत्येक प्रसंगाचा वेगळा विचारतरंग मनात उमटतो.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
भूतलावरच्या प्राण्यांपासून माणसांपर्यंत सहवास आणि प्रेम याचे अतूट नाते आहे. तिन्ही उदाहरणाद्वारे तुम्ही याची खूप सुंदर मांडणी केली आहे सर🙏
ReplyDeleteसर, धन्यवाद 🙏
Delete