सभागृहाच्या आठवणी...!
आज म.ए.सो.गरवारे महाविद्यालयाचे सभागृह पाडले गेले.२००५ मध्ये सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी या सभागृहासाठी सुयोग्य अशा संस्कृत ओळी संस्थेचे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे माजी प्रा.जे.पी. गद्रे यांनी लिहून दिल्या होत्या. त्या ओळींतील भावनांचा आशय व्यक्त करणाऱ्या पुढील ओळी या सभागृहासाठी प्रा.रामभाऊ डिंबळे यांनी लिहून दिल्या होत्या.
पवित्रं प्रसन्नं गुणोत्कर्षकारी |
इदं मंदिरं स्यात् वयःशक्तिपीठम् |
त्या विद्यार्थ्यांना कलागुणांचा उत्कर्ष करण्यासाठी प्रेरणा देत होत्या.
गेली जवळपास ७ दशके ज्या सभागृहाने विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ दिले, विविध तज्ज्ञ ,विचारवंत, अभ्यासक यांची विद्वत्तापूर्ण भाषणे ऐकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, आपल्या कल्पना प्रकल्प रूपाने सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली, सामाजिक बांधिलकीतून चालणाऱ्या अनेक उपक्रमांचे ,घडामोडींचे, समारंभचे जे सभागृह साक्षीदार होते, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील दिग्गज गायकांनी ज्या मंचावरती आपली कला सादर केली तो मंच असलेले सभागृह आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. आज तिथे उरला आहे फक्त ढिगारा. परंतु ही मोडतोड अपरिहार्यपणे झाली आहे ती नव्या निर्मितीसाठी! आता त्याच ठिकाणी एक टोलेजंग वास्तू उभी राहील. त्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनवीन अभ्यासक्रम अभ्यासता येतील. अर्थातच या वास्तूमध्ये सभागृह देखील असणार आहे. या पडलेल्या ढिगार्यातून होणाऱ्या नवनिर्मितीतील ते सभागृहदेखील विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देतील. परंतु ते होईल यथावकाश. आज मात्र ती वास्तू जमीनदोस्त झाली आहे हे सत्य आहे!
या सभागृहाशी अनेकांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आठवणी निश्चितच जोडल्या गेल्या आहेत. १९७२ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला.त्यावेळी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून शिकणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांच्यासाठी भोजनाची व्यवस्था प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन केली. " प्राध्यापकांचे प्रेमाने जेवण वाढणे इतके मनाला भिडले की डोळ्यात पाणी आले. जेवण गेले नाही, पण पोट मात्र भरले."अशी आठवण बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू व महाविद्यालयाचे व वसतिगृहाचे माजी विद्यार्थी डॉ. गंगाधर शिरूडे यांनी मला सांगितली होती. अशा असंख्य आठवणी निघतील.
माझ्या अशाच काही आठवणींची छायाचित्रे सोबत आहेत.
सुधीर गाडे पुणे
सभागृह पाडण्यात आले नवनिर्मितीसाठी. आनंदाची बाब आहे नवीन भव्य दिव्य इमारत सुद्धा होईल पण ती वास्तु सदैव मनात घर करून राहील🙏
ReplyDeleteमहाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक अरुण सोनवणे लिहितात.
ReplyDeleteहर्षद कॉलेज मध्ये असताना फिरोदिया करंडक कॉलेज ला मिळाला, त्याची प्रॅक्टिस रात्री हॉल मध्ये व्हायची .
माझा एक चतुर्थी उद्यापन कार्यक्रम याच हॉल मध्ये झाला.
हर्षद ने नोकरीत असताना गायन आणि नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पण फायनल गरवारे मध्येच घ्यायचे कारण फिरोदिया करंडक आणि पू. ल. ची म्हैस एकांकिंका मध्ये त्याने अर्जुन हवालदार ची भूमिका केली होती. त्याची फायनल याच हॉल मध्ये झाली.
अशा अनेक आठवणी आहेत. वरील आठवणी या माझ्याशी संबधीत आहेत.
मिलिंद वेर्लेकर लिहितात.
ReplyDeleteओह्ह्ह्ह
तिथं आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्वा सावरकर वक्तृत्व स्पर्धा व्हायची ,
तिचं 91 साली प्रथम पारितोषिक पटकावलं होतं मी मुंबईवरून येऊन ,
नंतर ज्या ज्या वेळी त्या सभागृहात यायचो काहीनाकाही कार्यक्रमांसाठी तेव्हा स्वामीकार रणजित देसाईंच्या हस्ते पहिलं पारितोषिक स्वीकारण्याचा तो क्षण मी मनाने अनुभवायचो त्या त्या वेळी ,
आता राहतील स्मृती 😊😊😊😊
श्री.विकास फडके यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteपुणे विश्व संवाद केंद्राची पहिली माध्यम संवाद परिषद डिसेंबर 2019 मध्ये इथेच झाली आणि पुढे ती मालिका गेली 3 वर्षे सुरु आहे.
विश्वसंवाद केंद्र पुणे
योगेंद्र कुंटे यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteसर,माझ्या सुद्धा या सभागृहाच्या आठवणी आहेत ,मी शाळेत असताना या सभागृहात गरवारे कंपनी तर्फे अनेक कार्यक्रम केले ,सगळ्यात मोठी आठवण म्हणजे बाबाच्या गरवारे कंपनीतील श्री.मराठे यांनी गायलेल्या राज कपूर यांच्या मेरा जुता हैं जपानी ,या गाण्यावर मी तशीच वेशभूषा करून नृत्य सादर केले होते,त्यानंतर विज्ञान भारती चे अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले त्यात माझा वाटा होताच ,आता नवीन वास्तू अशीच चांगली होईल 🙏🙏👍
आमचा महाविद्यालयातील पहिला दिवस हा सभागृहातूनच सुरु झाला.१९६८ यावर्षीच्या जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी त्यावेळचे प्राचार्य जमदग्नी सर आणि उपप्राचार्य नातू आणि लागू सर यांच्या स्वागत पर भाषणाने आणि उपदेश पर सल्ल्याने माझ्या महाविद्यालयीन जीवनाचा प्रारंभ झाला. अर्थातच त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वर्गात बसण्यास सुरुवात झाली.
ReplyDeleteआमच्या वेळेस सभागृहामध्ये फक्त महाविद्यालयाचेच अनेक कार्यक्रम होत असत. आमच्या वेळेस महाविद्यालयाच्या आर्ट सर्कलच्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्याच विद्यार्थी कलाकारांनी अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केले. त्यामुळे माझ्यात संगीत आणि नाटक याची आवड निर्माण झाली. अजूनही आठवणीत आहे ते म्हणजे पहिल्याच आर्ट सर्कलच्या कार्यक्रमांमध्ये राज कपूरच्या चित्रपटातील *आजा रे मेरा दिल पुकारे रो रो के गम भी हारे* हे गाणे अतिशय सुंदर आवाजात व भावुकतेने सादर केले होते परिणामी त्या काळच्या जुन्या हिंदी चित्रपटाचे म्हणजे मॅटीनीचा मी फॅन होऊन आजीवन सदस्यच झालो. महाविद्यालयात मी दोनच वर्षे होतो परंतु दोन्ही वर्षाचे स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम सभागृहामध्ये फारच बहारदार झाले होते.
१९७० हे वर्ष महाविद्यालयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. त्या कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थ्यांना आवर्जून आमंत्रण दिले गेले होते व सभागृहांमध्येच दिवसभर पारंपारिक पद्धतीने शुद्ध महाराष्ट्रीयन पद्धतीने भोजन समारंभ अगदी बैठ्या पंगतीने साजरा झाला होता. अक्षरशः हजारो माजी विद्यार्थी त्यावेळेस आले होते
शेवटची आठवण म्हणजे ५जानेवारी २०२४ यावर्षी याच सभागृहांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला होता व मी त्यास आवर्जून हजर राहिलो होतो. कार्यक्रम सुरू होण्याआधी जवळजवळ अर्धा तासभर संस्थेच्या माजी विद्यार्थीनी सध्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, त्यावेळचा माझा सहकारी मित्र उदय सोहोनी आणि मी असे आम्ही तिघेजण अनेक विषयावर गप्पा मारत बसलो होतो.
असो महाविद्यालयाच्या बरोबरच
वसतीगृहाच्याही अनेक हृद्य आठवणी आहेत. जागवाव्या तेवढ्या कमीच.
अर्थातच जेंव्हा जेंव्हा महाविद्यालयाची आठवण येईल तेंव्हा निश्चितपणे डोळ्यासमोर सभागृह येणार हेही तितकेच खरे.
डॉ.किरण शहा.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व उप प्राचार्य मीनल वाळिंबे फणसळकर लिहितात.
ReplyDeleteमाझ्यासारख्या असंख्य माजी हॉस्टेल वासियांसाठी ती एक जिव्हाळ्याची वास्तू होती . hostel day आणि वार्षिक स्नेहसंमेलन या शिवाय आम्ही मुलींनी पाच वर्षे तिथे हरतालिकेचे खेळ खेळलेले आहेत. मनसोक्त खेळ खेळून झाल्यानंतर सीनियर मुली सर्वांना साबुदाणा खिचडी देवून कित्येक मुलींचे निर्जळी उपवास सोडत असु. कित्येक एकांकिका , त्याची rehearsal, त्याचे सादरीकरण, आम्ही इथेच केले आणि आमच्या त्या कलेला ह्याच वास्तूने तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला आहे . वसतिगृहाचे बक्षीस वितरण , पुढे मग admission process , पालक शिक्षक सभा , प्राचार्यांचे अभिभाषण , अनेक विद्वानांची व्याख्याने , सांस्कृतिक कार्यक्रम ह्या वास्तूच्या साक्षीने आम्ही अनुभवले . आधी pavilion आणि आता assembly hall इतिहासजमा होणार . जसा अस्सल पुणेकर जुन्या पुण्याच्या आठवणीने गहिवरतो तसे अस्सल garwarians आज नक्की गहिवरले असतील .