माणसाच्या जिवाची किंमत ५० रुपये?
काही दिवसांपूर्वी सांगली येथील बातमी वाचली. काही शाळकरी मुलांना मोबाईलचा स्क्रीन गार्ड बदलून हवे होते. दुकानदाराने त्याची किंमत १५० रुपये सांगितली. पण मुलांना ते १०० रुपयातच हवे होते. त्यातून वाद सुरू झाला. शब्दाला शब्द वाढत गेला. भांडण विकोपाला गेले आणि मुलांनी मिळून त्या दुकानदाराला ठार मारले.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
ही बातमी अस्वस्थ करणारी आहे. तसं बघायला गेलं तर वाद किती रुपयांचा होता तर फक्त पन्नास रुपयांचा. पण त्यातून एका माणसाला आपला जीव गमवावा लागला. म्हणून बातमी वाचल्यावर पहिला विचार मनात आला की माणसाच्या जिवाची किंमत फक्त पन्नास रुपये आहे का?
या घटनेची कारणमीमांसा करताना वेगवेगळी कारणे सांगता येतील. या अल्पवयीन मुलांवर असलेला समाज माध्यमांचा पगडा किंवा वेड, कोणताही नकार न बसवण्याची त्यांची वृत्ती, वयासोबत न वाढलेले शहाणपण अंगात असलेल्या शक्तीचा गर्व, वेगवेगळे चित्रपट मालिका यातून पाहिलेला भरमसाठ हिंसाचार , यातून झालेली हिंसाचारी मनोवृत्ती किंवा बोटचेप्या भावना, कदाचित पालकांचे झालेले दुर्लक्ष, कदाचित त्यांना मायेची भासत असलेली उणीव अशी वेगवेगळी कारणे सांगता येतील.
ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याने कदाचित वस्तुची किंमत तुलनेने खूप जास्त सांगितली असेल, त्याने कदाचित वेडेवाकडे शब्द वापरले असतील, शब्दाला शब्द वाढत गेला असेल, त्याने कदाचित सुरुवातीला हात उचलला असेल अशी पण कारणे कदाचित येऊ शकतात. परंतु यातूनही सत्य एवढेच उरते की एका माणसाचा जीव गेला.
या बातमीच्या निमित्ताने जुन्या पाठ्यपुस्तकातील एक बोधकथा आठवली. एक धडधाकट मणूस भीक मागत असतो. त्याला श्रीमंत माणूस तुझे अवयव मला दे त्या बदल्यात मी तुला भरपूर पैसे देईन असे सांगतो. श्रीमंताची मागणी ऐकून त्या भिकारी माणसाला आपल्या शरीराची किंमत कळते. तो म्हणतो, " माझे अवयव देणार नाही." मग श्रीमंत माणूस हातांनी काम करून स्वावलंबी हो असे सांगतो. यातून माणसाच्या शरीराची किंमत अनमोल असल्याचा दाखला मिळतो.
जगभरात आजपर्यंत पैशांच्या हव्यासापोटी अगणित मृत्यू झाले आहेत. पण त्यातील रकमा हजारो, लाखो किंवा कोटींच्या घरात असतील. किंवा पैशाची रक्कम आज कमी वाटली तर त्या काळी तिचे मूल्य फार असेल अशा वेळी केवळ पन्नास रुपयांच्या वादातून जीव जाणं वेदनादायक आहे.
ही कारणे विचारात घेत असताना हळूहळू वेगवेगळे विचार मनात येत गेले. माणसाचं स्वरुप हे चांगल्या विचाराला प्राधान्य देणारं आहे की वाईट, हिंसक विचाराला? इंग्लिश भाषेत एक कादंबरी आहे. तिचे नाव 'लॉर्ड ऑफ फ्लाइज'. विल्यम गोल्डिंग हे तिचे लेखक आहेत. त्या कादंबरीवर याच नावाचा एक चित्रपट येऊन गेला आहे. यातील मध्यवर्ती कल्पना अशी की एक अपघात होतो आणि काही उच्चवर्गीय किशोरवयीन मुले एका निर्जन बेटावर पोचतात. हळूहळू त्यांच्यात गट तयार होतात. काही मुले आपल्या शारीरिक सामर्थ्यावर त्या गटावर राज्य करतात. यातून शेवटी काही मुलेच एकमेकांचा जीव घेतात. यातून लेखकाला असे सांगायचे आहे की माणसाची मूळ प्रवृत्ती हिंसक आहे.
तर दुसऱ्या बाजूला आजपर्यंत जगात सर्वत्र चांगल्या माणसांचीही उदाहरणे पहायला मिळतात. ही माणसे कोणत्याही मोबदल्याशिवाय चांगलं काम करत असतात. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'तुका म्हणे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती'
त्यामुळे सर्वत्र, सर्वकाळ चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारची माणसे असतात. त्या त्या क्षणी कोण कोणाच्या सहवासात येतो यावर परिणाम ठरतो.
इतकी सगळी चर्चा करूनही शेवटी संबंधित बातमीमुळे प्रश्न उरतोच की ' माणसाच्या जिवाची किंमत फक्त पन्नास रुपये?'
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
सुंदर लेख विचार करण्याला लावणारा. मुळात संस्कार कमी पडतात आजच्या पिढीला
ReplyDeleteखरंय सर.
ReplyDeleteधन्यवाद!