छ. शिवराय: दुर्दम्य इच्छाशक्ती
स्वतःच्या कर्तृत्वाने अजरामर झालेल्या छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्वाचे किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडतात! त्यांच्या जीवनाबाबत विचार करताना वेगवेगळे मुद्दे समोर येतात. त्यांच्या यशस्वी युगप्रवर्तक जीवनाची गुरुकिल्ली कोणती? असे म्हटले तर अनेक उत्तरे बरोबर असू शकतात. परंतु त्यांची जी दुर्दम्य इच्छाशक्ती होती ती कधीही क्षीण झाली नाही! त्यामुळे प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगात अभिनव विचार करून त्यांनी मार्ग काढला असे लक्षात येते.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
अगदी बालवयातच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेऊन वचनबद्ध झालेल्या शिवरायांनी आपल्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे धोरण अमलात आणले. तत्कालीन महाराष्ट्रावर विजापूरच्या आदिलशहाचा जवळपास एकछत्री अंमल होता. त्यामुळे त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटणे शक्य नव्हते. त्याच्या सत्तेला दिले गेलेले हे आव्हान तो दुर्लक्षित करेल हे देखील शक्य नव्हते. त्यामुळे शिवरायांवरती दबाव आणावा या हेतूने शहाजीराजांना कपटाने कैद करण्यात आले. यामागे आदिलशहाच्या दरबारातील राजकारण, तेथील गटातटांच्या एकमेकांवर चाललेल्या कुरघोड्या हेदेखील एक कारण होते. परंतु पराक्रमी , पूजनीय वडिलांचा जीव वाचवायचा की ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायची असा विलक्षण पेच तरुण शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहिला. परंतु शिवरायांनी आपल्या बुद्धीचातुर्याने दिल्लीची पातशाही आणि आदिलशाही यांच्यात संघर्ष होण्याची स्थिती निर्माण करून शिताफीने आपली सुटका करून घेतली. स्वतःला सोडवून घेण्यासाठीची ही एक शिवरायांची चाल होती हे लक्षात घेतले पाहिजे.
असेच पुढचे स्वराज्यावरती चालून आलेले प्राणघातक संकट म्हणजे अफजलखानाची स्वारी हे होय! स्वतःला 'बुत् शिकन' म्हणजे मूर्तीभंजक हे बिरूद अभिमानाने मिरवणारा अफजलखान हा तत्कालीन भारतातील एक ख्यातनाम लढवय्या सेनानी होता. औरंगजेब शहजादा असताना त्यांने औरंगजेबालादेखील कोंडीत पकडले होते. स्वतःच्या पराक्रमाने, धूर्तपणाने आणि क्रूरपणाने त्याने अनेक राजे, सत्ताधीश संस्थानिक यांना यमसदनास पाठवले होते. प्रचंड साधनसामुग्री घेऊन चालून येणारा अफजलखान हा जणू स्वराज्याचा घास घेण्यासाठी जबडा वासून वाटचाल करीत होता. परंतु माता भवानीच्या कृपेने आपण या संकटातून पार पडणार हा दुर्दम्य आशावाद शिवरायांच्या मध्ये होता. त्यांनी त्याच बळावर बिनचूक तपशीलवार योजना करून अफजलखानाचा वध केला आणि तीच संधी साधून स्वराज्याचा मोठा विस्तारदेखील केला.
अफजलखानाच्या स्वारीनंतरचे असेच एक प्राणांतिक संकट म्हणजे पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले शिवराय! सिद्दी जौहर हा पराक्रमी पठाण चिकाटीने पन्हाळ्याला वेढा घालून बसला. पन्हाळा जिद्दीने लढवायला सुरुवात झाली. हेन्री रेव्हिंगटन या संधीसाधू, लोभी इंग्रजांची मदत घेऊन त्यावेळच्या सर्वात जास्त संहारकक्षमता असणाऱ्या तोफांचा मारादेखील पन्हाळ्याच्या तटबंदीवर झाला. शिवरायांना या वेढ्यातून सोडवण्याचा नेतोजी पालकर यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. झोडपून काढणाऱ्या मान्सूनच्या पावसालादेखील दाद न देता सिद्धी जौहर याने वेढा तसाच पुढे चालू ठेवला. आता याच वेढ्यात प्राणार्पण पण किंवा शरणागती हेच पर्याय आहेत असे अनेकांना वाटत होते. परंतु शिवरायांनी अतिशय कल्पकतेने आपली सुटका करून घेतली. परंतु या सुटकेसाठी शिवा काशीद ,बाजीप्रभू देशपांडे शंभू सिंग जाधवराव असे मोहरे आणि शेकडो मावळेदेखील शिवरायांना गमवावे लागले. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे' ही उक्ती प्रत्यक्षात उतरली. दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने शिवराय सुखरूप सुटले ही मोठीच घटना घडली.
मिर्झाराजा जयसिंग यांची स्वारी हादेखील स्वराज्यावर फिरणारा एक वरवंटा होता. ज्यात चिरडून स्वराज्यातील प्रजाजन मरणासन्न झाले होते. या प्रसंगी तह करून माघार घ्यावी लागली. पराक्रम गाजवून कमावलेला मोठा मुलुख आणि गड द्यावे लागले. शिवरायांच्याकडे यावेळी असलेल्या प्रदेशाच्या जवळपास तीन चतुर्थांश इतका मुलुख द्यावा लागला. ही एखाद्या कमकुवत माणसाला खचवून टाकणारी गोष्ट होती. पण शिवराय खचले नाहीत. मिर्झाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय आग्र्याला गेले. धूर्त , कपटी धर्मांध औरंगजेबाने त्यांना कोंडून टाकले. ज्याने स्वतःचा बाप, भाऊ, एक मुलगा यांना जिवंत सोडले नाही अशा औरंगजेबाच्या कैदेत असतानादेखील शिवरायांचा दुर्दम्य आशावाद क्षीण झाला नाही. अतिशय अक्कल हुशारीने त्यांनी केवळ स्वतःच्या नव्हे तर सोबतच्या सर्वांच्याच सुटकेची विलक्षण योजना आखली. सर्व बरोबर नेलेल्या सर्व माणसांना तर सुखरूप परत आणलेच परंतु बरोबर नेलेला हत्ती घोडे हा लवाजमादेखील सुरक्षितपणे स्वराज्यात परत आणला. या प्रसंगाने त्यांची कीर्ती भारताच्या सीमा ओलांडून जगभर पसरली.
दुर्दम्य आशावादी शिवरायांची ही वृत्ती सदैव ध्यानात ठेवली पाहिजे. आयुष्यातील निराशेच्या, अपमानाच्या, अधिक्षेपाच्या प्रसंगी ही वृत्ती सदैव मार्गदर्शक राहील आणि स्वाभिमानी वृत्तीला ती चिरकाल प्रेरणा देत राहील. अशा या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे स्वाभिमानाचे धैर्याचे आणि आशावादी वृत्तीचे अप्रतिम वर्णन केली आहे सर🙏
ReplyDeleteछत्रपती शिवाजी महाराज यांनी बालवयात घेतलेली हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ
ReplyDeleteआणि वचन , ते वचन पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची आशावादी, स्वाभिमानी,वृत्ती किती महत्त्वाची आहे हे संदर्भासहित स्पष्ट केले आहेत सर तुम्ही या लेखात.खूपच सुंदर लेख आहे सर...
🙏शिवरायांना कोटी कोटी प्रणाम..🙏
हो सर धैर्य आणि आशावाद
ReplyDelete