संत गाडगेबाबांची शिकवण
हल्ली जिकडे तिकडे माणसे मोबाईल मध्ये तासनतास गुंतून पडलेली दिसतात. त्यामुळे वेगळा विचार मनात येणे, त्याच्यावर काही चिंतन करणे आणि त्यातून काही निष्पन्न होऊन आयुष्याला दिशा मिळणे अशा गोष्टी कमी होत चाललेल्या दिसतात. अशी माणसे बघितली की बऱ्याच वेळा मला गाडगेबाबांची हमखास आठवण येते. गाडगेबाबांच्या एकांतातील चिंतनातून त्यांचे स्वयंभू व्यक्तिमत्त्व घडले असे मला वाटते. यामुळेच अशी मोबाईलमध्ये सतत गुंतलेली माणसे दिसली की गाडगेबाबांची आठवण येते.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
माणूस शिक्षणाने प्रगल्भ होत जातो असे म्हणतात. परंतु सर्वच माणसे शिक्षणामुळे प्रगल्भ झाली आहेत काय असा प्रश्न मनात येण्यासारख्या घटना आजूबाजूला घडताना दिसतात. जे रूढार्थाने शिकले नाहीत त्यांच्यातदेखील शहाणपण असते. प्रगल्भता असते. नव्हे नव्हे काहीजण तर शिकलेल्यांपेक्षाही अधिक प्रगल्भ दिसतात. अशाच मालिकेतील एक नाव म्हणजे संत गाडगेबाबांचे! रूढार्थाने त्यांचे शिक्षण झाले नाही. परंतु लहानपणी गावाबाहेर जाऊन जनावरांना चरायला घेऊन जाणे हे त्यांचे काम होते. या कामात ते तासनतास एकटे असत. अशाच वेळी त्यांची आंतरीक चिंतन प्रक्रिया सुरू झाली असली पाहिजे. त्यातून एक लोकविलक्षण जीवन घडले. या जीवनाने आपल्या हयातीत तर लोकांना मार्ग दाखविलाच परंतु ते गेल्यानंतरही त्यांचे विचार, त्यांचा त्यांचे कार्य समाजाला प्रेरणा देतच आहे.
सध्या समाजासमोर असलेल्या अनेक समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे व्यसनाधीनतेची होय. दिवसेंदिवस व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढतच चाललेले दिसते. जनजागृतीचे प्रयत्नदेखील होतात. परंतु त्यांचा प्रभाव पुरेसा पडत नाही असे चित्र दिसते. उलट एकंदरीत समाजात आर्थिक उन्नती झाल्याने व्यसनांचा विळखा जास्तच घट्ट होताना दिसतो आहे. ही चिंतेची बाब आहे. गाडगेबाबा ज्या समाजात जन्मले त्या समाजात त्याकाळी घरच्या शुभप्रसंगी समाजातील लोकांना दारू पाजणे ही रुढी अगदी घट्ट झाली होती. परंतु गाडगेबाबांनी आपल्या अपत्याच्या नामकरणाच्या वेळी निग्रहाने सांगितले की या समारंभात दारू देणार नाही. त्यावेळी बहिष्कार टाकू असा इशारादेखील त्यांना मिळाला. परंतु त्यांनी तो जुमानला नाही हे. जीवनाचे शहाणपण आपल्याकडे आहे का असा प्रश्न पडतो ? आता अनेक ठिकाणी शुभ प्रसंग साजरा करायचा म्हणजे दारू हवीच अशी समजूत मूळ धरते आहे किंवा काही प्रमाणात रुजली आहे. याच गोष्टीला सरकार दरबारीदेखील प्रोत्साहन मिळते. दारू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर सरकारची नजर आहे. त्यामुळे त्यासाठी त्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. सरकारी निर्णय घेतले जातात. ज्या महामानवाने दारू पिण्याचा तीव्र निषेध केला त्या महामानवाच्या प्रेरणेने जर काही कार्य करायचे असेल तर ते हे कार्य आहे असे वाटते. समाजानेदेखील स्वत:च्या दारू तसेच अन्य मादक पदार्थांच्या आसक्तीच्या वर्तनात बदल घडवणे ही प्रेरणा घेतली पाहिजे.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
संत गाडगेबाबांचा दुसरा एक पैलू म्हणजे त्यांनी स्वच्छतेची हाती घेतलेली मोहीम हा होय! कोणत्याही गावी कीर्तनाचा कार्यक्रम असेल तर स्वतःहून हातात झाडू , खराटा अशा गोष्टी घेऊन ते स्वच्छतेच्या कामी लागत. ही गोष्ट तर समाजाला माहिती आहेच. परंतु सध्या समाजात स्वच्छतेची सवय एका चौकटीपलीकडे, विशेषतः स्वतःच्या घराच्या पलीकडे, पाळताना किती जण दिसतात हे आपल्याला सर्वांना समजते आहेच. त्यामुळे जिकडे तिकडे कचरा आणि चिरंजीव झालेले प्लास्टिक आपल्याला दिसते. कोणत्याही गावाबाहेर पडलो की रस्त्याच्या कडेने कचरा दिसतो. अर्थात कचऱ्याच्या विल्हेवाटीची मोठी यंत्रणा उभारणे हा देखील सरकारच्या अखत्यारीतला एक मुद्दा आहे. पण यासाठीची शिस्त बाणवून घेणे ही समाजाची जबाबदारी आहे. संत गाडगेबाबांचा आदर्श याबाबतीत सरकार आणि समाज या दोघांनाही मार्गदर्शक आहे.
संत गाडगेबाबांचे अजून एक महत्त्वाचे योगदान हे त्यांच्या आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहसंबंधातून झालेले आहे. हिंदू धर्मातील अन्याय्य वागणुकीला कंटाळून जेव्हा हिंदू धर्म सोडण्याची प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली. तेव्हा याबाबत त्यांनी गाडगेबाबांशी आवर्जून चर्चा केली होती. गाडगेबाबांनी आपल्या चिंतनातून त्यांना भारतीय भूमीतीलच एखादा धर्म निवडण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. अर्थात बाबासाहेबांनी स्वतःच्या चिंतनानेदेखील हाच निष्कर्ष काढला होता. त्यामुळे त्यांचे धर्मांतर बौद्ध धर्मात झाले. ही भारतीय समाजाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घटना आहे. दोघांनीही धार्मिक आचरणाचा आग्रह धरला आहे . या दोघांचा जिव्हाळ्याचा संबंध मनाला भारून टाकतो.
संत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू भावणारे आहेत. सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहेत. संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
छान लेख आहे सर
ReplyDeleteसर धन्यवाद!
Deleteकोणी तुम्हाला जात विचारली, तू कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही.
ReplyDeleteगाडगे बाबा यांचं वरील वाक्य मला खूप वास्तववादी आणि सकारात्मक आहे.. सुंदर लेख लिहिलाय सर
सर धन्यवाद!
Delete👌🏽👌🏽
ReplyDeleteस्वधर्म म्हणजे आज माझ्यापुढे समाजाच्या दृष्टीने काय कामकरणं गरजेचे आहे ते करत राहणे. त्यासाठी गाडगे बाबांच्या शिकवनिप्रमाणे एकांतात वेळ काढून अंतर्मुख होण्याची गरज आहे.
🙏🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसंत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जसे की त्यांनी हाती घेतलेली व्यसनमुक्ती ,स्वच्छता मोहीम तुम्ही या लेखात स्पष्ट केली आहे. खूपच सुंदर लेख....
ReplyDeleteसर धन्यवाद!
Delete